एका मराठी पर्यावरणसंशोधिकेने बार्बीला हरवलंय !!

सध्या पर्यावरणाचे संतुलन राखणे हे संपूर्ण जगासमोरील एक मोठे आव्हान बनले आहे. त्यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी अनेक शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी लोकं विविध उपाययोजना करत आहेत. पण तुम्हाला जर सांगितलं की, कुणी झाडावर चढून झाडांवर संशोधन करतंय तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

तुम्ही म्हणाल काय चेष्टा करताय भिडू, माणूस झाडांवर संशोधन करतो पण झाडावर चढून त्यावर संशोधन करणं ही काय भानगड आहे? तर भिडू लोक्स हे खरं आहे. एक ६४ वर्षीय पर्यावरणशास्त्रज्ञ गेल्या ४० वर्षांपासून झाडांवर संशोधन करताय. त्यांचं नाव नलिनी नाडकर्णी.

डॉ. नलिनी नाडकर्णी या एक वन पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आहेत. त्या झाडांच्या पानांचा अभ्यास करतात.

नलिनी नाडकर्णी यांचा जन्म १९५४ बेथेसडा, मेरीलँड येथे झालेला. त्यांचे वडील मोरेश्वर नाडकर्णी मूळचे ठाणे जिल्ह्यातील लोवा गावाचे, तर गोल्डी नाडकर्णी या रशियन आहेत. प्राथमिक शिक्षण आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर नलिनी यांनी र युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मधून पी.एचडी केली. अमेरिकेतच द एव्हरग्रीन स्टेट कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. तिथे प्राध्यापक म्हणून त्यांनी २० वर्षे सेवा दिली.

त्यांचा मुख्य अभ्यास हा झाडांचा पर्णसंभार हा आहे. झाडाच्या बुंध्यापासून जे काही जग आहे त्यात खूप काही गोष्टी घडत असतात. विषुवृत्तीय देशातील निबिड जंगलात शेकडो फुट उंचीची शेकडो वर्ष जुनी झाडे आहेत, जी झाडे निसर्गाची अनेक रहस्ये आपल्या पानामध्ये दडवून आहेत याचा शोध नलिनी घेत आहेत.

यानिमित्ताने आपल्या अनेक विद्यार्थ्यांना घेऊन ऊंच ऊंच झाडांवर चढणे त्यांचा दिवसेंदिवस अभ्यास करणे हे त्यांचे कामच आहे आणि ते अविरत सुरु आहे.

सगळीकडे तुटणारी जंगलं आणि विकासाची घोडदौड यामुळे आपल्या परिसंस्था बदलत चालल्या आहेत आणि आपल्याला अनभिज्ञ असलेलं वृक्षाच्छादन-पर्णसंभाराचं अद्वितीय जग नाहीसं होत चाललं आहे याबद्दलची खंत त्या वारंवार व्यक्त करतात. 

सध्या त्या कोस्टारिका मधील मान्टेवर्देच्या जंगलात वास्तव्यास आहेत. तिथे राहून त्या जलवायू परिवर्तनावर संशोधन करत आहेत. मान्टेवर्देच्या घनदाट जंगलात जिथे जाण्यास रस्ता नाही अशा ठिकाणी नलिनी दोरी आणि माउंटन क्लाइंबिंग साहित्याच्या साहाय्याने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात संशोधन करत असतात.

एकदा असेच संशोधन करत असतांना त्यांचा दोर तुटून त्या झाडावरून खाली पडल्या होत्या. तेव्हा त्यांच्या कमरेचे हाड मोडून त्यांच्या शरीराचा आकार बदलला होता. एवढा मोठा अपघात होऊनही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी आपलं संशोधन कार्य सुरूच ठेवलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर केवळ १% क्लाऊड फॉरेस्ट उरलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तिथल्या पशुपक्षी आणि वनस्पतींच्या प्रजाती जाती नष्ट होत आहेत.

त्यांची इच्छा आहे की, त्यांच्यासारखे इतर स्त्रियांनी देखील या क्षेत्रात काम करावं पण स्त्रियांना अशा कामात जास्त रस नाही हे त्या जाणून होत्या. बाहुल्या मुलींमध्ये फार प्रिय असल्याचं त्यांना माहिती होतच तेव्हा त्यावरून त्यांना एक आयडिया सुचली आणि ठरवलं की,

बाहुल्यांच्या माध्यमातून पर्यावरणशास्त्राचा विषय मुलींपर्यंत पोहचवायचा.

सुरुवातीला त्या वापरून टाकून दिलेल्या बाहुल्या गोळा करून त्यांना पर्यावरणशात्रज्ञाचा वेष देऊ लागल्या. त्यांना ट्री टॉप्स बार्बी असे नाव दिले. आपला कार्यक्रम असेल तिथे त्या विकू लागल्या. काही काळाने त्यांनी ही कल्पना प्रसिद्ध बार्बी डॉल्स बनवणाऱ्या mattel कंपनी पुढे सादर केली. तेव्हा कंपनीने त्यात काही इंटरेस्ट दाखवला नाही.

जेव्हा नलिनी यांच्या ट्री टॉप्स बार्बीला प्रसिद्धी मिळू लागली तेव्हा mattel कंपनीने उत्पादन थांबवण्यास सांगितले मात्र नलिनींनी त्याला स्पष्ट नकार दिला. कितीही झालं तरी मराठी रक्त आहे, कितीही मोठी कंपनी असू दे ते झुकणार नाही.  

शेवटी mattel कंपनीने हार मानली. त्यांनी नलिनी आणि नॅशनल जिओग्राफीच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरणशास्त्रज्ञांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या बार्बी डॉल्स बाजारात आणल्या. नलिनी नाडकर्णीचा विजय झाला.

हे ही वाच भिडू.