महाराष्ट्राचा कबीर सिंग :  डॉ. श्रीराम लागू 

कबीर सिंग. सध्या धुमाकूळ घालणारा पिक्चर. तेलगु पिक्चर अर्जून रेड्डीचा रिमेक. सिनेमाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. तसा हा विषय सिनेमावर चर्चा करण्याचा नाहीच पण कबीर सिंग आणि अर्जून रेड्डी नेमके असतात कसे हे सांगण गरजेच आहे. 

कबीर सिंग मेडिकल कॉलेजचा टॉपर. पण फुल्ल टू दारूडा कार्यकर्ता. चकणा, पेग सिस्टिम असल्या गोष्टी कबीर सिंगच्या डिक्शनरीत नसतात. डायरेक्ट बाटलीतून टॉप टू बॉटम मारून ऑपरेशन यशस्वी करणारा डॉक्टर. एका बाजूला टॉपर आणि दूसऱ्या बाजूला प्रिती सिक्का. “अपनी बंदी” म्हणून दादागिरीवालं प्रेम करणारा बंदा. लोकांना या सिनेमात काय आवडलं तर प्रेमात तुटून फूटून पडणं. कबीर सिंगच विक्षिप्त वागणं. त्यातही करियरच्या बाबतीत टॉपर आणि दूसरीकडे फुल्ल टू राडा करणारा बंदा. आत्ता असा अॅट्यिट्यूड आवडावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. असो तर मुळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचा कबीर सिंग कोण ? 

दारू पिवून ऑपरेशन करण्याचा एक प्रसंग आम्हाला मिळाला तो डॉ. श्रीराम लागू यांच्या लमाण या आत्मचरित्रात.

श्रीराम लागू यांची बंडखोरी पाहिली तर ते देखील कबीर सिंगपेक्षा कमी नाहीत याची जाणिव होते. फक्त कबीर सिंग सारखा त्याला उथळपणा नाही. देव मेला आहे हे सांगत माणसं जपणारे डॉक्टर आहेत यात शंका नाही. दारू पिवून ऑपरेशन करणारे डॉक्टर नाहीतच. त्यांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग चुकीतून घडला होता. आपल्या आत्मचरित्रात कोणताच आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांनी हा प्रसंग सांगितला आहे. पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी सुद्धा डॉक्टरांनी घेतली. 

असो तर प्रसंग काय होता ते सांगतो, 

डॉक्टर श्रीराम लागू तेव्हा डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होते. कॅनडामधल्या तेरा मजली उंच असणाऱ्या आणि फक्त लहान मुलांसाठी असणाऱ्या मॉट्रियाल चिल्ड्रन हॉस्पीटलमध्ये ते निवासी डॉक्टर होते. कान-नाक-घसा संबधित केसेस येत असल्याने डॉक्टरांवर ऑपरेशनचा प्रसंग तसा क्वचितच येत असे. त्यातही कुणाच्यातरी कानात पेन्सिलचा तुकडा अडकला आहे, कुणाच्या नाकाचा घोणा फुटला आहे तर कुणाच्या नाकात शेंगदाणा अडकला आहे याशिवाय विशेष अशा इमर्न्जेन्सी केसेस नसत. नवं शहर अनुभवताना डॉक्टरांना इथेच दारू प्यायला शिकले. अगदी स्कॉच प्यायची का रम. रम प्यायची असेल तर त्यात कोक मिसळावा का? वाईन किती प्रमाणात प्यावी हे बेसिकपासून डॉक्टर गिरवत होते. 

हळूहळू डॉक्टर दारू प्रकरणात एक्स्पर्ट झाले. आत्ता कामाच सांगायच झालं तर तिथे कॉल सिस्टिम होती. म्हणजे डॉक्टर कॉलवर असले की ते रुमवरच थांबून रहात पण इमर्जेन्सी असेल तर खोलीवर फोन येत आणि डॉक्टरांना त्वरीत पळाव लागायचं. 

डॉक्टर सांगतात त्या दिवशी मी कॉलवर होतो. माझा जो डॉक्टर मित्र होता तो देखील मोकळाच होता. वेळ घालवायला मी त्याच्या खोलीवर गेलो. टेलिफोन ऑपरेटरला त्याच्या खोलीचा नंबर दिला. तो खोलीत एकटाच वाचत आणि दारू पित बसला होता. मी आल्यानंतर तो उत्साहात आला. आमच्या गप्पा सुरू झाल्या. तो पक्का श्रद्धाळू आणि मी पक्का नास्तिक. बोलता बोलता कधी मी दारू घ्यायला सुरवात केली ते कळाले देखील नाही. ती वाईन होती. शेरी. तिची चवही छान होती. पीत गेलो वितंडातही चढत गेली. मी कॉलवर आहे याचे भानच राहिले नाही. 

त्यानंतर तासाभरात फोनची घंटा घणघणली. अरोराचा फोन असेल म्हणून मी जायला निघालो तर अरोरा म्हणाला तूझा फोन आहे. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला मी कॉलवर आहे. चाचरत मी फोन घेतला तर इमर्जन्सी…!!!!

श्वास पार अडलेला आहे. वय वर्ष तीन. ओठ काळे निळे पडले आहेत. ताबडतोब ऑपरेशन करायला हवं. सरळ तिकडे या..  

ट्रॅकिऑस्टमी ! 

म्हणजे गळ्यामध्ये श्वसननलिकेला भोक पाडून त्यात एक नळी घालून श्वास मोकळा करुन द्यायचा. 

डॉक्टरांनी इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागणार होतं. पोटात वाईन होती. डॉक्टर पुढे लिहतात, 

अरोराच्या खोलीतून बाहेर पडून कॉरिडॉरमध्ये आलो आणि कॉरिडॉरसहित सगळ्या खोल्या गर्रकन उलट्यासुलट्या फिरल्या. मी भितींला टेकून उभा राहिलो. हातपाय लटपटत होते. कपाळावर दरदरून घाम सुटला होता. आत्ता डावीकडून सरळ जायचं पुन्हा डावीकडून वळलं की लिफ्ट. नाही डावीकडे नाही उजवीकडे. हि लिफ्ट नाही ती शेवटची. लिफ्टमध्ये उडी मारली. दहा नंबरचे बटण दाबले. 

मी धावतच ऑपरेशन थिएटरच्या कपडे बदलण्याच्या खोलीत गेलो. अंगावरचे कपडे ओरबाडून काढले आणि ऑपरेशनचे हिरवे कपडे चढवले. डोक्यात गरगरने चालू होते. छातीतली धडधड वाढत होती. इथे चुकून दुधाचा दात पडला तरी बोंबाबोंब होते. इथे तर ऑपरेशन. चुकून काय झाल तर? 

डॉक्टरांनी तशाच अवस्थेत ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला होता. टेबलावर तीन वर्षाची गुटगुटीत मुलगी होती. श्वासागणिक तिचे ओठ, गाल, कान निळे पडायला लागले होते. 

नर्सने दिलेला चाकू डॉक्टरांनी हातात घेतला आणि मनामध्ये चाललेला गोंगाट, कोलाहल, गरगरने स्वीच ऑफ झालं. हाताची थरथर थांबली. पाय लटपटणं थांबल. डोक्यातले घण थांबले आणि एकाग्रतेने डॉक्टर ऑपरेशन करु लागले. मिनटाभरात श्वसननलिकेचा शोध लागला तिला भोक पाडले. टेकिऑस्टमी नलिका अडकवून दिली तसा पेशंटने दिर्घ श्वास घेतला. गाल, कान, ओठ पुन्हा गुलाबी झाले आणि ती मुलगी दिर्घ श्वास घेवून शांतपणे झोपून गेली. ऑपरेशन यशस्वी झाली. 

डॉक्टर पुढे लिहतात, 

माझ डोकं एकदम स्वच्छ झालं होतं. आत्ता पाच मिनटांपुर्वी मी जवळजवळ झिंगलेल्या अवस्थेत होतो. कुठे गेली ती सगळी दारू? एकदम् खाडकन कशी उतरली? मघाशी ऑपरेशन करताना ती उतरली नसती आणि पेशंट टेबलावरच दगावली असती तर ?कपडे बदलायच्या खोलीत मी ढसाढसा रडलो. एवढा प्रचंड थकवा कधी जाणवलां नव्हता आयुष्यात.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.