सायकलवरून संसदेत येणाऱ्या मराठी खासदारासाठी शास्त्रीजी गाडी थांबवून लिफ्ट द्यायचे

राजधानी दिल्लीच्या संसदभवनात कधी गेला आहे काय? तिथं देशभरातून निवडून आलेले खासदार, मंत्री , काहीतरी कामासाठी आलेले उद्योगपती, पत्रकार, अधिकारी, मंत्र्यांचे कॉन्व्हॉय यांच्या मोठमोठ्या कारच संमेलन भरलेलं असतं. कोणाची कार सगळ्यात आलिशान याची जणू स्पर्धाच सुरु असते. साधा नगरसेवक जिथे एसयूव्ही  घेऊन माज करतो तिथे देशातल्या सर्वोच्च लोकप्रतिनिधींची काय कथा ?

अशीच परिस्थिती पूर्वीपासून नव्हती, एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रातून निवडून गेलेला खासदार सायकलवरून संसदेत जायचा.

नाव उत्तमचंद बोगावत. मतदारसंघ अहमदनगर दक्षिण.

उत्तमचंद बोगावत हे मूळचे पाथर्डीच्या मिरी गावचे. जन्म २८ ऑगस्ट १९०० सालचा. घरची परिस्थिती ठीकठाक होती. गावात सातवीच्या पुढे  शाळा नसल्यामुळे शिक्षणा साठी अहमदनगरला येऊन राहिले. गुरुजींच्या चिठ्ठीमुळे नगर मधील प्रतिष्ठित व्यक्ती भाऊसाहेब फिरोदिया यांच्याकडे आसरा मिळाला.

फिरोदिया यांच्या घरी राहून पडेल ते काम करून उत्तमचंद बोगावत यांनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण पार पाडले. पुढे मुंबईला जाऊन हायकोर्ट प्लिडर म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केला. वकिली पूर्ण करून अहमदनगरला आले आणि आपले गुरु भाऊसाहेब फिरोदिया यांच्या हाता खालीच प्रॅक्टिस सुरु केली.

भाऊसाहेब फिरोदिया यांच्या मुळे उत्तमचंद बोगावत यांची महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याशी ओळख झाली.

सविनय कायदेभंग या सारख्या आंदोलनांनी भारावून गेलेला हा काळ. उत्तमचंद बोगावत देखील मिठाच्या सत्याग्रहात उतरले. काँग्रेसच्या लढ्यात बुलेटिन छापणं व वाटणं, गुप्त बैठका घेणं, भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना आश्रय देणं अशी वेगवेगळी जबाबदारी ते घेऊ लागले.

या काळात महात्मा गांधीजींच्या कार्यशैली त्यांना जवळून अनुभवता आली.

मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना ब्रिटिशानी अटक केली. येरवडा कारागृहामध्ये त्यांना साडे चार वर्षे डांबण्यात आलं. तिथून सुटका झाल्यावर उत्तमचंद बोगावत हे काँग्रेसचे मोठे नेते म्हणून बाहेर आले. त्यांची नगर मधल्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियता अफाट होती.

याच लोकप्रियतेच्या जोरावर ते अहमदनगरच्या नगरपालिकेत ते निवडून गेले. २५ फेब्रुवारी १९४६ ते २२ डिसेंबर १९४७ या काळात ते तिथले नगराध्यक्ष होते. त्यांच्याच कारकिर्दीत पिंपळगाव माळवी तलावाचं काम मार्गी लागलं.

या कामाच्या पाहणी साठी ते रोज सायकलवरून तिथे जात. पालिकेकडून मिळणारे वेतन आणि भत्ते कधी घेतले नाहीत. एवढंच काय स्वातंत्र्यानंतर मिळणारं हक्काचं पेन्शन देखील नाकारलं.

त्यांच्या या त्यागमय वृत्तीमुळे लालबहादूर शास्त्रीजींच्या सारख्या मोठ्या नेत्यांच्या नजरेत त्यांचं  स्थान निर्माण झालं. जेव्हा १९५२ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा नगर दक्षिण येथून वेगळ्याच उमेदवाराचं तिकीट जाहीर झालं होतं पण शास्त्रीजींच्या हस्तक्षेपामुळे  हे तिकीट उत्तमचंद बोगावत यांना मिळालं.

त्यांची कामगार किसान पक्षाचे भाई न. न.सथ्था यांच्याशी थेट लढत झाली. कार्यकर्त्यांनी घरची भाजी भाकरी बांधून सायकलीवरून त्यांचा प्रचार केला. उत्तमचंद बोगावत प्रचंड मोठ्या फरकाने विजयी झाले.  

नगर हुन दिल्ली ला गेल्यावरही उत्तमचंद बोगावत यांनी आपला गांधी वादी साधेपणा पुरेपूर जपला. रोज सकाळी गांधी टोपी धोतर या वेशातला खासदार संसदेत सायकल वरून प्रवेश करत आहे हे दृश्य दिल्लीकरांना  सवयीचं झालं. त्याही काळात सायकलवरून जाणारे ते एकमेव खासदार असतील.

लालबहादूर शास्त्री तेव्हा नेहरूंच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सरकारी जीप असायची. ते जेव्हा संसद भवनाकडे निघत तेव्हा रस्त्यात जर उत्तमचंद बोगावत दिसले तर गाडी थांबवत आणि बळजबरीने बोगावत यांना आपल्या जीप मध्ये बसवून संसदेला नेत.

त्यांची दोघांची चांगली मैत्री जुळली होती. बऱ्याचदा शास्त्रीजी बोगावत यांना मला योगासन शिकवा म्हणून आग्रह धरत. त्यांचा हा स्नेह अखेरपर्यंत कायम राहिला.

खासदार म्हणून बोगावत यांनी प्रचंड काम केलं. मुळा धरण आणि कुकडी धरणाचा प्रश्न त्यांनी लोकसभेत लावून धरला. प्रसंगी तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी वाद देखील केले. अनेक अडथळे आले मात्र त्यांनी अनेक वर्षांच्या लढ्याने हा प्रश्न मार्गी लावला.

गावोगावी शाखा टपाल कार्यालयं सुरू करण्याचा ठराव देखील त्यांनीच लोकसभेत मांडला. आज मिळणारे खासदारांचे निवृत्तीवेतन हे देखील उत्तमचंद बोगावत यांच्याच प्रयत्नांचे फळ आहे. संसदेच्या सदस्याचं पहिलं शिष्टमंडळ चीनला गेलं, त्यात त्यांचा देखील समावेश होता

१९५२-५३ साली महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. विशेषतः कर्जत-जामखेड या तालुक्यात दुष्काळानं प्रचंड छळलं होत.

प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही अशी स्थिती होती. उत्तमचंद बोगावत यांनी हा प्रश्न संसदेत मांडला. त्यांच्या भाषणामुळे स्वतः पंतप्रधान नेहरू महाराष्ट्रात आले. लोक खात असलेली बरबड्याची भाकरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि जागच्या जागी महाराष्ट्राला मोठी मदत जाहीर केली.

याच दुष्काळात रेल्वे पुलाजवळचं सरकारी गोदाम फोडून लोकांना धान्याचं वाटप केलं म्हणून उत्तमचंद बोगावत यांना अटकही झाली.

गांधीवादी म्हणवून घेणा-या भाऊसाहेबांनी आयुष्यभर गांधी-विचारांवर निष्ठा ठेवली. काँग्रेसच्या विचाराशी असलेली बांधिलकी त्यांनी शेवटपर्यंत पाळली. आयुष्यभर त्यांनी खादीशिवाय दुसरा कपडा वापरला नाही. त्यासाठी घरच्या चरख्यावर ते सूत कातत.

पुढच्या लोकसभा निवडणुकीतही अहमद नगर दक्षिण मधून त्यांनाच तिकीट मिळाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोर वाढल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा राज्यभर पराभव झाला यात उत्तम चंद बोगावत यांना देखील आपली खासदारकी गमवावी लागली. १९६२ च्या निवडणुकीत त्यांना परत उमेदवारी मिळाली होती.

मात्र फिरोदिया कुटुंबियांच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी त्यांनी मोतीलाल फिरोदिया यांच्यासाठी उमेदवारी सोडली. त्यांना निवडून देखील आणलं. 

खासदार म्हणजे आपला आवाज संसदेत पोहचवण्यासाठी नेमलेला लोकप्रतिनिधी. पण आता हे जनतेचे सेवकच आपापल्या मतदारसंघात संस्थानिकांप्रमाणे बनले आहेत. अशावेळी गांधीवादावर विश्वास ठेवून काम करणारा सायकलवरून फिरणारा खासदार होऊन गेला हि आजकालच्या पिढीला दंतकथा वाटेल.

संदर्भ- सायकलवरून संसदेत जाणारे उत्तमचंद बोगावत दैनिक लोकमत 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.