मराठी सुपरस्टार अरुण सरनाईक या निर्मात्याकडून पैसे घ्यायला लाजायचे.
भारतात सिनेमाचं वेड गरीब असो कि श्रीमंत सगळ्यांच्यात सारखंच आहे. सिनेमा बनवण्याची इच्छा तर खूप जणांना असते. चार पैसै असतील तर प्रत्येक भिडूला निर्माता व्हायचं असतं. सिनेमाच्या नादानं घरदार विकायची पाळी आली तरी हे वेड काही कमी होत नाही.
जेष्ठ पब्लिसिटी डिझायनर श्रीकांत धोंगडे यांनी अशाच एका सिनेमा बनवनाऱ्या डॉक्टरचा गंमतीशीर किस्सा आपल्या पुस्तकात सांगितला आहे.
गोष्ट ऐंशीच्या दशकातली आहे. हे डॉक्टर होते मुंबईचे. त्यांचा हातगुण चांगला होता. पेशंटची त्यांच्याकडे कमी नसायची. व्यवसाय अगदी उत्तम चालला होता. डॉक्टरसाहेबां सिनेमाची आवड, हव तर खूळ म्हणा चालेल. त्यांनी स्वतः सिनेमा बनवायचं ठरवलं. पैसा अगदी बक्कळ होता.
त्याकाळचे मराठी सिनेमाचे मोठे स्टार राजबिंडे नायक अरुण सरनाईक यांना घेऊन डॉक्टरांनी पिक्चर बनवला. डॉक्टरनी अगदी निगुतीने सिनेमा बनवला होता. तो चांगला चालला देखील. त्याकाळचे निर्माते सिनेमा चालला तरी कलाकारांना पैसे देण्यासाठी खूप तंगवायचे. मराठी सिनेमाचे निर्माते याबाबतीत तर जास्तच बदनाम होते. पण डॉक्टरसाहेब मात्र कधीच पैशाची अडवणूक करायचे नाहीत. त्यांनी सगळ्यांना बोलवून कामाचे चेक दिले.
सगळे कलाकार, तंत्रज्ञ या निर्मात्यावर खुश होते. पहिल्या सिनेमाच्या यशांनतर डॉक्टरसाहेबाना सिनेमा बनवण्याची चटक लागल्यासारखं झालं होत. त्यांनी लगेच पुढच्या फिल्मची जुळवाजुळव सुरु केली. कथा पटकथा सगळी रेडी झाली.
श्रीकांत धोंगडे एकदा त्यांना भेटायला गेले. कलाकार कोण असतील याची लिस्ट डॉक्टरांनी श्रीकांतजीना दाखवली. त्यांच्या मागच्या सिनेमात असलेले सगळे अभिनेते टेक्निशियन या सिनेमात सुद्धा होते, फक्त अरुण सरनाईक सोडून.
धोंगडेना आश्चर्य वाटलं. सिनेमाला तर मागच्या वेळी चांगल यश मिळालेलं मग अरुणजीना परत का बरे घेतल नसावं? त्यांनी डॉक्टरांना कारण विचारलं. डॉक्टर म्हणाले,
“आम्ही अरुण सरनाईकाना डोळ्यासमोर ठेवूनच ही कथा लिहिली होती. पण त्यांनी वेळ नसल्याचं कळवलं.”
एके दिवशी श्रीकांत धोंगडे दादरला संगीतकार राम नाईक यांना भेटायला रामनिवास लॉजमध्ये गेले. योगायोगाने तिथे अरुण सरनाईक हजर होते. धोंगडेनी त्यांना डॉक्टरांचा सिनेमा का सोडलात हे विचारलं. अरुण सरनाईक म्हणाले,
“काय आहे श्रीकांत, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे या निर्मात्याकडे पैसे आणायला प्रत्येकवेळी जावं लागत.”
धोंगडेना समजेना, पैसे तरी व्यवस्थित मिळत होते मग अरुणजीना नेमका प्रॉब्लेम तरी काय? तेव्हा अरुण सरनाईक म्हणाले,
“प्रश्न पैसे मिळण्याचा नाहीय हो. लोक मला ओळखतात. मी त्यांच्या दवाखान्यातून बाहेर पडताना लोक माझ्याकडे मी गुन्हेगार असल्यासारखं माझ्याकडे पाहतात.”
श्रीकांत धोंगडेना तरीही काही कळाल नाही. त्यांनी विषय काही वाढवला नाही. ते गप्प राहिले. एकदा काही कामानिमित्त त्या डॉक्टर निर्मात्याकडे त्याचं जाणं झालं. तेव्हा सहज त्यांच्या दवाखान्याच्या बोर्डकडे लक्ष गेले. बोर्ड वाचल्यावर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला.
ते चित्रपट निर्माते म्हणजे गुप्त रोगाचे डॉक्टर होते!
हे ही वाच भिडू.
- आयाबायांना रडवणारा माहेरची साडी १२ कोटींचा मानकरी ठरला होता.
- पुलं देशपांडेनी राम राम गंगाराम फेकून द्यायला सांगितला होता !
- कमांडर किंवा तिसरा डोळा याहूनही या दहा गोष्टींसाठी रमेश भाटकर यांना लक्षात ठेवायला हवं.