मराठी पोरं आता थेट केम्ब्रिज बोर्डाचा अभ्यासक्रम शिकणार
मुंबई महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे गावाला जिल्हा परिषदेच्या शाळा असतात अगदी तश्याच.
काही वर्षांपूर्वी पोरांची वाणवा, मास्तरांची कमतरता, पोपडं निघालेल्या मळकट भिंती जवळपास अशीच महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था असायची. अजून एक गोष्ट महानगरपालिकेच्या शाळेंच्या बाबतीत आमच्या लहानपणी बघायला मिळायची ती म्हणजे भरपूर वेळा केवळ समाज म्हणतो म्हणून पोरींना शिकवायचं असा विचार करणारे आईबाप आपल्या पोरींना फुकटात शिक्षण असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत टाकायचे. आता मात्र या शाळांचे रुपडं पालटायला सुरवात झालीय.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा ह्या मुबंईमधल्या महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणे हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याचं सांगण्यात येतंय.
शाळेच्या नवनवीन इमारती उभ्या राहिल्यात. शाळेतील पायाभूत सुधारणांबरोबरच शाळेतल्या अभ्यासक्रमाचाही दर्जा सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत याआधीच महाराष्ट्र बोर्डाबरोबरच सीबीएससी आणि आईसीएससी बोर्डांचा अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे.
यानंतर मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण वाढली होती. एवढी की त्यामुळं ऍडमिशन देण्यासाठी लॉटरी पद्धतीचा वापर करावा लागला होता. देशातील आघाडीच्या बोर्डांचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर आता थेट विदेशातील टॉप बोर्डांचा पर्याय विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून प्रयत्न चालू होते.
इंटरनेशनल बैकलॉरिएट (आईबी) आणि केम्ब्रिज बोर्ड या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोर्डांचा पर्याय ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत उपलब्ध करून दिला जाणार आहेत.
सगळं काही सुरळीत झालं तर येणाऱ्या २०२२च्या जुन महिन्यांपासून विध्यार्थ्यांना केम्ब्रिज बोर्डाचा अभ्यासक्रम शिकू शकतात असं मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत. याच संदर्भात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्यचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंब्रिज पार्टनरशिप फॉर एज्युकेशनच्या प्रमुख अॅन मिशेलिडू यांची भेट घेतली होती. त्यांनंतर या कामाला गती मिळाली होती.
कसं असणार आहे या शाळांचं स्वरूप ?
बीएमसीच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वॉर्डात अशी एक शाळा तयार करण्याची महानगरपालिकेची योजना आहे. हे बोर्ड नर्सरीपासून ते दहावीपर्यंत असतील. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता या प्रोजेक्टला गती मिळू शकते आणि मुंबईमधल्या सुधारलेल्या शाळेंचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरी जाऊ शकते असं राजकीय जाणकार सांगत आहेत.
ही योजना मुंबईनंतर महाराष्ट्राच्या इतरही भागात राबवली जाईल असं आदित्य ठाकरे सांगतायत. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कामात वाढलेला आदित्य ठाकरे यांचा वावर पाहता येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वखालीच लढल्या जाऊ शकतील असं राजकीय विश्लेषक सांगतायत.
बाकी राजकारणाचा भाग सोडला तर शाळांमध्ये होणाऱ्या सुधारणा ही खरंच सामान्य जनतेसाठी आनंदाची गोष्ट आहे. विशेषतः महानगरपालिकेच्या शाळेत समाजातील गरीब वर्गाची पोरं पोरी शिकत असतात. त्यामुळं या प्रश्नांभोवती फिरणारं राजकारणं जनतेनं मान्य केल्याची अनेक उदाहरणं देण्यात येतातं .
दिल्लीत केजरीवाल यांच्या सरकारनं सरकारी शाळांमध्ये केलेल्या सुधारणांबद्दलचं समादान मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केलं होता. आता तसाच ट्रेंड महाराष्ट्रात येतो का ते येणाऱ्या निवडणुकांनंतरच कळेल. बाकी आता केंब्रिज सारख्या बोर्डात शिकून आपली गोरगरिबांची पोरं उच्च शिक्षणासाठी खरंच केंब्रिज आणि हावर्ड सारख्या विद्यापीठात गेली तर सोन्याहून पिवळं.