मराठवाड्यात नुकसान व्हायचं तितकं झालं आता भरपाईचं काय ?

दरवेळेस कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त असलेला मराठवाडा आता ओल्या दुष्काळाला तोंड देत आहे.

मराठवाडा विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील एकूण २५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलाय. त्यात सर्वात मोठा फटका बसलाय तो मराठवाडा विभागातल्या उभ्या पिकाला. उभं पिक हातचं गेल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत सरासरीच्या १४९ टक्के पाऊस झाला असून, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली नांदेड हे जिल्हे अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहेत.

मराठवाड्यातील ४४६ महसूल मंडळापैकी ३६१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.

त्यातील २४८ महसूल मंडळात २०९६ महसूल मंडळात ३ वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.  तर बीड आणि लातूर जिल्ह्यातील पाटोदा महसूल मंडळात ११ वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पीक पूर्णतः हा पाण्यात गेले असल्याचे सांगण्यात येतंय.

महाराष्ट्रात झालेल्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जवळपास अडीच लाख हेक्‍टरवरची पिके पावसाखाली आली होती. त्यानंतर आत्ता झालेल्या पावसाने २७ सप्टेंबर पर्यंत नुकसान झालेल्या क्षेत्राचा आकडा हा १२ लाख ७८ हजार हेक्टरच्या पुढे गेलेला आहे. 

त्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठी पीक हानी झाली. हे नुकसानीचा भाग १२ लाखांहून २५ लाख हेक्‍टरपर्यंत गेल्याचा अंदाज आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत आकडेवारी अजून यायची आहे.

मराठवाड्यात झालेल्या गेल्या दोन दिवसांच्या पावसात २२ जणांचा बळी गेल्याची माहिती समोरआलीये. गेल्या दोन दिवसातील जनावरांच्या मृत्यूचा आकडा ३९३ एवढा आहे.

तर मराठवाड्यात जून पासून अतिवृष्टी, पुरामुळे ९१ जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये शेतकरी राजा मात्र हवालदिल झालाय मराठवाड्यात अतिवृष्टीने पिके पाण्यात गेली असून खरीप हंगाम हातचा गेला आहे. सोयाबीन सोडून गेले असून ऊस मुळासकट गळून पडले त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे

परभणी मध्ये १ लाख हेक्टर शेतीचे नुकसान तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख ४ हजार २२४ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणामध्ये  १ लाख ३३ हजार ८८२  दशलक्ष घनमीटर पाणी आलंय त्यामुळे सकाळी ११ वाजता गोदावरी नदीच्या पात्रात दहा हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं. आणि लगेचच संध्याकाळी विसर्गाचा वेग ६६ हजार क्‍युसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या खालचे १७ उच्च पातळी बंधारे भरलेले असल्याने नांदेड शहराजवळ गोदावरीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे.

गोदावरी नदीच्या आजूबाजूच्या पुरात अडकलेल्या १४ जणांना अग्निशमन दलाने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. यात पाच लहान बालकांचे देखील समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पूरस्थितीमध्ये स्थानिक बचाव पथकाने आत्तापर्यंत २४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामधल्या एका हताश शेतकऱ्याचे मानसिक संतुलन ढळल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ईसापुर धरणाचे दरवाजे वेळीच उघडले नसल्यामुळे पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली असा आरोप करणाऱ्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नांदेडमधील एका शेतकऱ्याचा असल्याचे कळतंय. धरण ९९% भरले तरी प्रशासनाने धरणांचे दरवाजे उघडले नाही, नदी दुथडी भरून वाहत होती आणि पूर आला त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं, असं या हताश झालेल्या शेतकऱ्याचं म्हणण आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके तसेच एकूण १० महसुली मंडळी प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळाली. उस्मानाबाद जिल्ह्यामधील मांजरा नदीवरील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडलेत.  तर धरणातून साधारणत ७०९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात गावातील नागरिक अडकले होते. बचाव पथकाच्या सहाय्याने त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे.

तसेच जायकवाडी धरणातून विसर्ग सुरूच आहेत. आजूबाजूच्या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम प्रशासन करतयं.

मराठवाड्यातील एकूण ९ लहान-मोठी धरणे काठोकाठ भरली असली आहेत तर जायकवाडी धरण जवळपास ९५ टक्के भरलं आहे. 

आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होतेय..

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा खरीप हंगाम गेला आहे.  त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करायला हवी अशी मागणी आता सगळ्याच गटातून समोर येत आहे.

…तर दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरासमोर चिता जळतील

अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या नाही तर दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरी दिवा नाही तर चिता पेटलेल्या दिसतील, गंगापूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली, आपत्ती मधून शेतकऱ्यांना बाहेर काढणार आहे, शेतकऱ्यांनो धीर सोडू नका असं आवाहन मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना केले आहे.  तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.