रोमच्या इतिहासात मराठवाड्यातील पैठण, तेर, भोकरदन अशा गावांचा उल्लेख आहे…
मराठवाडा. दगडा धोंड्याचा प्रदेश. या भागावर दुष्काळाच्या अस्मानी संकटाचं सावट तर कायम असतंच पण शिवाय निजामाच्या सुलतानी राजवटीने देखील या प्रदेशाला हजारो वर्षे मागे नेलं. मराठवाड्याची ओळख एक मागास भाग अशी बनली.
पण एक काळ असा होता मराठवाड्याचा युरोपशी व्यापार चालायचा.
साधारण दोन हजार वर्षापूर्वी भारतात आलेल्या एका ग्रीक प्रवाशाने ‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या नावाच्या ग्रंथात हा उल्लेख केला आहे. तो म्हणतो
“दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. भडोचपासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर.
हे तगर म्हणजे आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे गाव. या दोन शहरासोबत केळना नदी तीरावरील भोगवर्धन म्हणजेच भोकरदन हे देखील प्रमुख व्यापारी केंद्र होते असा उल्लेख आढळतो.
मराठवाड्याला महत्व आले ते सातवाहन वंशाच्या कारकीर्दीत.
दक्षिणेतील पहिल्या व मोठ्या साम्राज्याची राजधानीच पैठण (प्रतिष्ठान) येथे होती. या राजकुलाने मराठवाड्याला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत स्थान मिळवून दिले, तसेच साहित्यात आणि कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करण्यास प्रवृत्त केले.
पैठण, तेर, भोकरदन ही गावे या काळातच भरभराटीस आली.
अनेक व्यापारी मार्ग या शहरांवरून जात असत. इथल्या कारागिरांनी बनवलेल्या वस्तू, मराठवाड्यातील कापड युरोपमध्ये निर्यात व्हायचे.
ही तीन शहरे महानगरे ( आजच्या भाषेत मेट्रोपोलिटन सिटी) म्हणून ओळखली जात होती.
या शहरांचा उल्लेख टॉलेमीने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही आढळतो.
१९५८ साली नागपूर विद्यापीठाने भोकरदन येथे केलेल्या उत्खननात सातवाहन कालीन अवशेष तर मिळालेच पण तत्कालीन नाणी, धातूच्या वस्तू, शंखाच्या बांगड्या, हस्तिदंती वस्तू सापडल्या.
यामध्येच एक हस्तिदंती स्त्रीमुर्ती सापडली ज्याची हुबेहूब प्रतिकृती युरोपात रोम मधील पॉम्पेई या शहरात सापडली.
ही मूर्ती जगभरात पॉम्पेई लक्ष्मी म्हणून प्रसिध्द आहे.
१९३८ साली इटली मध्ये पॉम्पेई लक्ष्मी एका लाकडी संदुकात सापडली. ही रहस्यमयी हिंदू मूर्ती हजारो किमी दूर इटली मध्ये कशी हा प्रश्न पडला व त्यातूनच पुढे अभ्यासकांना मराठवाड्याचा इटली रोमशी व्यापार पहिल्या शतकापासून सुरू होता हे लक्षात आले.
संत गोरोबा कुंभार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेरमध्ये रोमन लोकांची वसाहत होती अस सांगितलं जातं. तिथे आढळणारे रोमन भांडी याचा पुरावा आहेत.
सातवाहन काळातच दक्षिमापथ व रोमन व्यापारी मार्गावर लेण्यांची निर्मिती झाली.
अजिंठा येथील पहिल्या गटातील व पितळखोरे येथील लेणी याच काळातील होत.
आजही मराठवाड्यातील अनेक ठिकाणी उत्खनन केल्यावर मौर्यकालाच्याही आधीची आखीव रेखीव बांधलेली घरे, रस्ते, मंदिरे आढळून येतात. रोमन बनावटीची नाणी सापडतात.
याचाच अर्थ त्याकाळात मराठवाड्यात एक प्रगल्भ व्यापारी व नागरी संस्कृती नांदत होती.
ही शहरे भारतातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक होते.
मध्ययुगात अनेक पर्यावरणीय बदल घडून आले त्यातच हैद्राबादच्या निजामाने या भागाकडे दुर्लक्ष केले, इथल्या शेतकऱ्यांवर, कारागिरांवर जुलूम केला आणि मराठवाडा मागे पडत गेला.
आज मात्र मराठवाडा आपल्या मेहनतीने परत पायावर उभा राहत आहे असे चित्र दिसत आहे.
औरंगाबाद सारखे शहर औद्योगिक क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले नाव मिळवत आहे.
लातूर नांदेड जालना या शहरांनी देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठवाड्याचे गतवैभव परत येतील यात शंका नाही.
हे ही वाच भिडू.
- असा होता महाराष्ट्रातील ४ हजार वर्षांपूर्वीचा शेतकरी
- महाभारताच्याही आधीपासून हा ल्युडोचा फासा गेम करतोय
- प्राचीन महाभारताची मूळ आवृत्ती शोधण्याचं श्रेय या मराठी माणसाला जाते.