एका संन्याशाच्या जिद्दीने मराठवाड्यातली निजामशाही उखडून फेकली

आजकाल राजकारणात स्वामींचा सुळसुळाट झाला आहे. अनेकजण पॉलिटिक्सच्या कुरघोडीमध्ये आपलं कर्मयोग विसरून जातात.

पण एक स्वामी असेही होते ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मराठवाडा निजामाच्या जोखडातून सोडवला, महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते बनले. पण तरीही सत्तेच्या खुर्ची पासून स्वतःला दूर ठेवलं आणि त्यागाचं व्रत जपलं.

स्वामी रामानंद तीर्थ

हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर. जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते.

भगवानराव यांची देखील ओढ अध्यात्माकडे होती. त्यांनी दोन मुलींनंतर संन्यास घेतला होता पण पत्नीची संमती घेतली नव्हती.

तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली. ज्ञानदेवांचे वडील जसे संन्यासातुन परतले होते त्याप्रमाणे भगवानराव परतले व ज्ञानोबांसारखेच पुत्ररत्न त्यांच्या पोटी जन्माला आले.

व्यंकटेश उर्फ रामानंद यांचे प्राथमिक शिक्षण मूळगावी झाले. हायस्कुलसाठी सोलापूरला आले. अगदी लहानपणापासून राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये भिनली होती. मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून स्वामीजींना छड्या खाव्या लागल्या पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही.

त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली.

पुण्याच्या महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व ‘लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम्.ए. पदवी संपादन केली. पुण्यातील वास्तव्याच्या काळात त्यांना टिळकांनी भारावून टाकलं होतं. टिळकांच्या मृत्यूवेळी आजन्म ब्रम्हचारी राहून आपले उर्वरीत आयुष्य मातृभूमीच्या चरणी अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली.

पुढे १९२६ साली मुंबईचे कामगार नेते ना. म. जोशी यांच्या स्वीय साहाय्यकपदी ते रुजू झाले. त्यांच्यामुळे गिरणी कामगारांच्या लढ्यात ते ओढले गेले. पुढे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना हे कार्य सोडावे लागले

उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे सुरू केलेल्या राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ शिक्षणसंस्थेची जबाबदारी घेतली.

हिप्परगा मुक्कामी १४ जानेवारी १९३० रोजी आपल्या जन्मनावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली. स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले.

आंबेजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम केलं. हा काळ ब्रिटिशांच्याविरोधातला स्वातंत्र्यलढा व सामाजिक क्रांती यांनी भारावलेला होता. मातृभूमीला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ १९३५ मध्ये सक्रिय राजकारणात सहभागी झाले.

गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उडी घेतली.

याच काळात आ. कृ. वाघमारे आणि अनंतराव कुलकर्णी यांनी हैदराबाद संस्थानच्या निजामशाही जुलूमजबरदस्तीला शह देण्यासाठी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र संघाची स्थापना केली होती.

आंध्रभाषिक तेलंगणा व मराठीभाषिक मराठवाड्याचा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. हे देशातील सर्वात मोठे संस्थान होते. निजाम मीर अली हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जायचा.

पण या श्रीमंत राजाची प्रजा मात्र पिचलेली होती. एकवेळ ब्रिटिश परवडले पण हा निजाम नको असे लोकांना वाटत होते.

आधीच दुष्काळाचं अस्मानी संकट आणि त्यात निजामाची सुलतानी तलवार यामुळे मराठवाडा अतिमागास बनला होता.

परभणी जिल्ह्यातील परतूर येथे १ जून १९३७ रोजी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन पार पडले. हैदराबादमधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर घणाघाती टीका केली.

या भाषणावेळी त्यांचे नेतृत्वगुण लक्षात आल्यामुळे सर्व सहकाऱ्यांनी स्वामीजींना हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याच सुमारास स्वामीजींनी आपल्या असंख्य अनुयायांसह आंबेजोगाई सोडून हैदराबादला प्रयाण केले.

स्वामी रामानंदांनी ९ जून १९३८ पासून हैदराबाद शहरात कायमचे वास्तव्य केले.

हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना होऊन स्वामीजींना त्याचे नेतृत्व देण्यात आले. स्वामीजींच्या क्रांतिकारकी चळवळी मुळे काँग्रेस हैद्राबाद मराठवाड्याच्या तळागाळात जाऊन पोहचली. गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू , रवीनारायण रेड्डी या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वामींनी निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन छेडले.

‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’

निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर बंदी घातली आणि स्वामीजींसह सर्व कार्यकर्त्यांना बंदीहुकूम मोडल्याबद्दल तुरुंगात डांबले. स्वामीजींना स्वातंत्र्यापर्यंतच्या दहा वर्षांच्या काळात अनेक वेळा शिक्षा होऊन सलग १११ दिवस अंधारकोठडीत ठेवले होते.

निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते.

अशा परिस्थितीत स्वामीजींनी नागरी हक्कांसंदर्भात सत्याग्रह व सनदशीर मार्गांचा निजामशाहाविरुद्ध फारसा उपयोग होणार नाही हे जाणले आणि त्यांनी आपला लढा प्रखर व तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केला.

महात्मा गांधींनी १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनाचा इशारा देताच त्याचे पडसाद हैदराबाद संस्थानातही उमटले. मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र लढा उभारला. सत्याग्रह, साराबंदी, निजामी ठाण्यांची लूट, बँक-दरोडे, सरकारी कागदपत्रांची होळी अशा विविध मार्गांनी व गनिमी काव्याने क्रांतिकारकांनी निजाम सरकारला वेठीस धरण्याचे प्रयत्न केले.

याचे नेतृत्व स्वामी रामानंद यांच्याकडेच होते. निजामाच्या कारावासात राहून स्वामी या लढ्याचे सूत्र हलवत होते. एक संन्यासी महाशक्तीशाली निजामशाही हादरवत होता.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे उदयास आली परंतु निजामाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणार नाही व आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील असे घोषित केले. निजाम सरकारने तिरंगा फडकाविण्यास बंदी घातली आणि बंदी मोडणाऱ्यास जबर शिक्षा फर्माविली. रझाकारांचे अत्याचार व जुलूम प्रचंड प्रमाणात वाढले.

३० जानेवारी १९४८ रोजी उमरी (जिल्हा नांदेड ) येथील बँक स्वातंत्र्यसैनिकांनी भरदिवसा लुटली. या सुमारास स्वामीजी तुरुंगात होते आणि तेथून ते कार्यकर्त्यांना संदेश धाडीत असत. अखेर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो ही पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थानातील निजाम राजवट संपुष्टात आणली.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला.

याच दिवशी स्वामीजींची सुटका झाली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे खरे शिल्पकार व महाराष्ट्राचे सर्वात जेष्ठ नेते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ भारतभरात ओळखले गेले.

त्यांची लोकप्रियता अफाट होती. दोन वेळा ते खासदार देखील बनले. पण सत्तेच्या खुर्चीपासून कायम अंतर राखलं.

दुसरी टर्म पूर्ण झाल्यावर ते पंडित नेहरूंपाशी गेले आणि राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा जाहीर केली. नेहरूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, विनोबांची भूदान चळवळ यात त्यांनी सहभाग घेतला. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

संदर्भ- मराठी विश्वकोश

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.