मराठवाड्यातील मागासवर्गीयांवरचे हल्ले वाढतच चालले आहेत…
महाराष्ट्राची ओळखच ‘पुरोगामी महाराष्ट्र’ अशी करून दिली जाते. महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी म्हणजे महाराष्ट्र . १९ व्या शतकात सत्यशोधक चळवळ आणि इतर सुधारणावादी चळवळी देखील इथेच घडल्या. इथेच जातीअंताची चळवळ उभी झाली. इथेच परिवर्तनाचे वारे वाहू लागले, स्त्री चळवळ देखील इथेच सुरु झाले….म्हणून महाराष्ट्र हा पुरोगामी !
परंतु ही ओळख काळानुसार बदलत चालली आहे….कारण याला काही घटना देखील कारणीभूत आहेत. त्या घटना म्हणजे महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मागासवर्गीयांवर हल्ले होत आहेत.
अशा सलग एका मागोमाग ३ घटना घडल्या आहेत…ज्या समोर आल्यात, पण ज्या समोर आल्या नाहीत अशा कित्येक घटना घडून गेल्या असतील त्या बाबत तर बोलायला नको.
सर्वात पहिली घटना समोर आली ती म्हणजे, लातूरमध्ये.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात ताडमुगळी नावाचं गाव आहे. जास्त लोकसंख्या देखील नाहीये आणि गावही तसं शांत आहे. दिवसांपूर्वी गावातील एका मागासवर्गीय समाजातील तरुण मुलाने देवळात जाऊन नारळ फोडला आणि गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. मागासवर्गीय तरुणानं देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार घातला होता. त्या कुटुंबाचा गावच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभाग नको, त्यांचा किराणा, दळण बंद, शेतातील मजूरीसाठी बोलावणे बंद केले होते. तसंच हा बहिष्कार मोडणाऱ्यालाही दंड ठोठावण्याचं घोषित केला होता. तीन दिवसांपासून हा बहिष्कार होता, मग पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शांततेत हे प्रकरण घेतलं आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला.
दुसरी घटना हिंगोलीमधली….
लातूरची घटना ताजी असतांनाच हिंगोली मध्ये अशीच एक घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावामध्ये अशी घटना घडली. कारण असं होतं कि, समाजाने गावामध्ये गायरान जमिनीवर निळा झेंडा कसा काय लावला म्हणून त्या कुटुंबावर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकला होता.
गावाच्या महिला सरपंचच्या दिराने भागवत मुंडे यांनी एक जानेवारी रोजी बैठक घेऊन संपूर्ण सवर्ण समाजाने त्या दलित वस्तीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गेला. तेव्हापासून त्या दलित समाजातील नागरिकांना गावातल्या पिठाच्या गिरणीवर दळण दळून दिले जात नाही. तसेच किराणा दुकानात देखील काही सामान खरेदी करू दिले जात नाही, तसेच दलित समाजातील नागरिकांना रिक्षातसुद्धा बसू दिलं जात नाही अशी माहिती समोर येतेय. त्यांना रूग्णालयात जाण्यासाठी देखील अडकहाणी निर्माण होत असल्याने शेवटी दलित समाजाच्या एकही व्यक्तीने जाऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन गावातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
तिसरी घटना नांदेड जिल्ह्यातील….
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक लहानसं गाव आहे. या गावात कॉलेजमध्ये झालेल्या वादातून मागासवर्गीयांच्या वस्तीवर एका जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली. हा जमाव थोडा-थोडका नव्हता तर जवळपास २००-३०० लोकांच्या जमावाने हा हल्ला केला होता. हल्लेखोर जमावाने अनेक घरांवर तुफान दगडफेक करत तोडफोड केली. त्याशिवाय, वस्तीतील महिला, वृद्ध, लहान मुले यांनाही मारहाण करण्यात आली, अशी माहिती मिळतेय.
कॉलेजमध्ये झालेल्या पोरासोरांच्या मध्ये झालेले भांडण ते वस्तीवरील हल्ला असं वळण या प्रकरणाला मिळालं. या हल्ल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनाच आणखी या प्रकरणावरच तपस जारी असल्याचं सांगण्यात येतंय.
हे हि वाच भिडू :
- रशिया युक्रेन सारखंच या पाच ठिकाणचे वाद तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी पेटवू शकतात
- आठ आण्यासाठी गोवऱ्या थापण्यापासून ते ७००करोडची मालकीण होण्यापर्यंतचा प्रवास
- चार्ल्स शोभराजला सुधारायला निघाललेली ही पोर शेवटी त्याच्याच मोहपाशात अडकली