राजीव गांधींना कोण हरवणार याची टीप फिडेल कॅस्ट्रोने मार्गारेट अल्वा यांना दिली होती..
देशात सध्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांची चर्चा आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलैला पार पडणार आहे, तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ६ ऑगस्टला. भाजपप्रणित एनडीएनं जगदीप धनकड यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलंय, तर विरोधी पक्षांकडून माजी काँग्रेस नेत्या आणि गोवा, राजस्थान, गुजरात अशा राज्यांचं राज्यपाल पद भूषवलेल्या मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मार्गारेट अल्वा यांच्या हजरजबाबीपणामुळं एकदा फिडेल कॅस्ट्रोही चाट पडला होता,
त्याचाच हा किस्सा…
जगाशी पंगा घेणारा फिडेल कॅस्ट्रो भारताचा मित्र होता. जेव्हा क्युबा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा फिडेल कॅस्ट्रोला व त्याच्या क्रांतीला पाठींबा देणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये नेहरूंचा समावेश होता. त्याने नेहरूंना वडिलांच्या जागी मानले आणि भारताला आपले घर.
इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनल्या तेव्हा आपली मोठी बहिण पंतप्रधान बनल्याप्रमाणे कॅस्ट्रोना आनंद झाला. नाम परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आला असताना त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना मारलेली अनौपचारिक मिठी सातासमुद्रापार गाजली.
भारताचे आणि क्युबाचे हे मैत्रीचे संबंध इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर देखील कायम राहिले.
राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते तेव्हाचा काळ. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा तेव्हा क्युबा मध्ये होत्या. त्या भारतातून आल्या असल्यामुळे फिडेल कॅस्ट्रो यांचं सरकार त्यांचा मोठा पाहुणचार करत होते. खुद्द फिडेल कॅस्ट्रो अनेकदा त्यांना गप्पा मारण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घ्यायचे. एकदा त्यांनी अल्वा यांना विचारलं,
“जर कोलंबस वाट न चुकता अमेरिका खंडा ऐवजी भारतात उतरला असता तर?”
क्षणाचाही विलंब न करता मार्गारेट अल्वा म्हणाल्या,
“तर तुम्ही आज भारतीय नागरिक असता.”
फिडेल कॅस्ट्रो या खणखणीत उत्तराने चाट पडले. त्यांनी मार्गारेट अल्वा यांच्या हजरजबाबीपणाला दाद दिली. त्यांना एकदा डिनर साठी आपल्या निवासस्थानी बोलावून घेतलं. क्युबाच्या मंत्रिमंडळातील अनेक मोठे मंत्री, सरकारी अधिकारी, मान्यवर या जेवणासाठी आले होते.
डिनर झाल्यावर कॅस्ट्रो आणि अल्वा सहज गप्पा मारत बसले होते. हसत खेळत चर्चा चालू होती. तेव्हा कॅस्ट्रोनी त्यांना तुमचं वजन किती असा प्रश्न विचारला. यावर अल्वा म्हणाल्या,
“आमच्या भारतात एक म्हण आहे, ज्या गोष्टीला साडी लपवू शकते त्या बद्दल कधीच बोलू नये. यामुळे अनेक पाप लपवता येतात.”
हे ऐकून फिडेल कॅस्ट्रो आपल्या नेहमीच्या स्टाईलने गडगडाटी हसू लागले. त्यांनी अल्वा यांना सांगितलं मी तुम्हाला उचलून सुद्धा तुमचं वजन सांगू शकेन. यावर अल्वा बाई म्हणाल्या,
“युवर एक्सलन्सी, तुम्हाला वाटते तेवढी मी हलकी नाही. तुम्ही मला उचलू शकणार नाही.”
मार्गारेट अल्वा यांचं वाक्य पूर्ण होई पर्यंत त्या जमिनी पासून दोन फूट उंचीवर होत्या. रांगड्या फिडेल कॅस्ट्रोनी त्यांना लीलया उचललं होतं. मार्गारेट अल्वा लाजून चूर झाल्या होत्या. असं फिडेल कॅस्ट्रो यांचं दिलखुलास व्यक्तिमत्व होतं.
एकदा मार्गारेट अल्वा मेक्सिकोला गेल्या होत्या. त्यांना कॅस्ट्रो यांचा मेसेज आला,
तातडीने क्युबाला येऊन भेटा.
अल्वा यांना कळेना कि नेमकं काय झालंय. त्या धावतपळत क्युबाला गेल्या. त्यांना फिडेल कॅस्ट्रो यांच्या समोर नेऊन उभं करण्यात आलं. कॅस्ट्रो त्यांना म्हणाले,
“जेव्हा तुम्ही भारतात जाल तेव्हा पंतप्रधान राजीव गांधींना जाऊन भेटा आणि त्यांना माझा निरोप सांगा की, तुमच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्र्यांवर थोडाही विश्वास ठेवू नका. तो तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे.”
मार्गारेट अल्वा यांना आश्चर्य वाटलं. भारतात राजनैतिक कोणत्या घटनास घडत आहेत याची कॅस्ट्रोना कशी काय कल्पना आणि ते एवढ्या काळजीने आपल्याला का सांगत आहेत. यावर कॅस्ट्रोनी खुलासा केला की त्यांनी इंदिरा गांधींना आपली बहीण मानलं होतं त्यामुळे त्यांची पंतप्रधान राजीव गांधींवर आपल्या भाच्याप्रमाणे माया होती.
अमेरिकेच्या सारख्या कुरापती सुरु असायच्या, कॅस्ट्रो यांची हत्या करण्यासाठी प्रचंड प्रयत्न सुरु असायचे. त्यामुळे क्युबाने आपली गुप्तचर व्यवस्था अतिशय तगडी बनवली होती. जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येकी देशात त्यांचे गुप्तहेर पसरलेले होते. साधी टाचणी जरी पडली तरी त्याची खबर कॅस्ट्रो यांच्यापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था होती. भारतात देखील त्यांच्या हेरांचं जाळं पसरलेलं होतं.
याच सूत्रांकडून कॅस्ट्रो यांना समजलं होतं कि राजीव गांधींना पंतप्रधानपदावरून खाली खेचण्यासाठी डाव केला जात आहे. त्यांचा संशय होता तत्कालीन अर्थमंत्री व्ही.पी.सिंग यांच्या वर.
खरं तर राजीव गांधी आणि व्ही.पी.सिंग यांचे चांगले मैत्रीचे संबंध होते. सिंग हे पंतप्रधानांचे सर्वात मोठे सल्लागार आणि त्यांच्या खालोखाल सर्वात शक्तिशाली मंत्री होते.
मार्गारेट जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांनी राजीव गांधींना फिडेल कॅस्ट्रो यांचा निरोप पोहचवला. त्यावर राजीव गांधी हसले. त्यांना हि गोष्ट व्ही.पी.सिंग आपल्या विरुद्ध कटकारस्थान करू शकतात हि गोष्टच पटली नाही. ते उलट चेष्टेच्या स्वरात म्हणाले,
कॅस्ट्रो भारत के बारे में क्या जानते हैं?
राजीव गांधींनी या निरोपाकडे चक्क दुर्लक्ष केलं. पण पुढे कॅस्ट्रोनी सांगितल्याप्रमाणे घडलं. व्ही.पी.सिंग यांनी राजीव गांधी यांच्या विरुद्ध बंडखोरी केली. त्यांना पक्षातून काढून टाकावे लागले. इतकेच नाही तर त्यांनी बोफोर्स घोटाळ्याचे आरोप करून राजीव गांधींच्या सरकारला १९८९ च्या निवडणुकीत पराभूत केलं. ते स्वतः प्रधानमंत्री बनले.
मार्गारेट अल्वा सांगतात व्ही.पी.सिंग यांनी धोका दिल्यावर त्या राजीव गांधींना भेटायला गेल्या आणि त्यांना फिडेल कॅस्ट्रोनी दिलेल्या चेतावणीची आठवण करून दिली. तेव्हा मात्र राजीव गांधी काहीच बोलले नाहीत. आपण खूप मोठी चूक करून बसलो आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं.
सन्दर्भ – मार्गारेट अल्वा लिखित करेज अँड कमिंटमेंट
हे ही वाच भिडू:
- राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीपेक्षा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक वेगळी असते ती अशी ..
- चालून आलेलं उपराष्ट्रपतीपद पटवर्धनांनी फक्त तत्वांसाठी सोडून दिलं
- राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या मतपेटीचं एखाद्या माणसाप्रमाणे स्वतःच्या नावाचं तिकीट असतंय