हाडे मोडून पदक मिळवण्याचा प्रवास कायम !!!

 

वर्षभरापूर्वी झालेल्या जीवघेण्या अपघातात त्याच्या शरीरातील 17 हाडे मोडली होती. तो अक्षरशः मृत्यूशय्येवर होता. या अपघातातून सावरल्यानंतर एखाद्याने स्नोबोर्डिंगचा विचारही सोडून दिला असता. पण तो आला, तो खेळला आणि त्याने चक्क ऑलिम्पिक पदकही जिंकलं.

मार्क मॅकमॉरिस त्याचं नाव. कॅनडाच्या या स्नोबोर्डरनं द. कोरियात नुकत्याच पार पडलेल्या पियोंगचँग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलंय. सुवर्णपदकाने जरी त्याला हुलकावणी दिली असली तरी त्याच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे सध्या क्रीडा क्षेत्रात सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा आहे.

 

(via @markmcmorris/IG)

 

24 वर्षीय मॅकमॉरिस हा कॅनडाचा स्नोबोर्डर. खरं तर स्नोबोर्डिंगच्या क्षेत्रातलं हे फार मोठं नाव. अवघ्या सतराव्या वर्षी त्याचं या क्षेत्रातलं पदार्पण. सोची ऑलिम्पिकमधील कांस्य पदकही त्याच्या खात्यात जमा. यापालिकडेही अनेक पदके आणि मान सन्मानांचा तो धनी विशेष म्हणजे सोची ऑलिम्पिक वेळी त्याच्या शरिराची हाडे मोडलेलीच होती, पण हा पठ्या काय मोडायला तयार नव्हता.

गेली चार वर्षे मात्र त्याच्या कारकिर्दीत प्रचंड उलथापालथीची राहिली. तो सारखा दुखपतींशी झगडतोय, अनेक अपघातांना तो सामोरा गेलाय. अपघात आणि त्याचं एक वेगळंच नातं तयार झालंय. पण प्रत्येक अपघाताच्या नाकावर टिकचून तो असामान्य कामगिरी नोंदवतोय.

twitter -justin Trudeau

 

खरं तर स्नोबोर्डिंगमध्ये अपघात तसे गृहितच धरलेले. पण फेब्रुवारी 2017 मध्ये त्याचा जो अपघात झाला तो साधारण नव्हता. या जीवघेण्या अपघातात त्याच्या शरीरातील 17 हाडे मोडली होती आणि बऱ्याच गंभीर दुखापती झाल्या होत्या. अपघात स्थळावरून त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करताना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करायला लागला होता. अजून थोडासा जरी उशीर झाला असता तरी तो जीवाशी गेला असता. त्यामुळे या अपघातातून तो जिवंत वाचणं हीच मोठी घटना होती.

सहा महिने बिछान्याशी खिळलेला राहूनही केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या अपघातातूनही तो सावरला. फिटनेसवर कष्ट घेतले. शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध केली आणि ऑलिम्पिकमध्ये दिमाखात परतला. नुसता परतलाच नाही तर तर आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत ऑलिम्पिकमधील दुसऱ्या कांस्यपदकावर नाव देखील कोरलं. स्नोबोर्डर म्हणून तो महान आहेच पण आत्ता धैर्याची, निडरतेची प्रेरणादायी कहानी बनूनही तो जगासमोर आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.