मोती साबणाने अभ्यंगस्नान : अहो मार्केटींग असतंय ते….

“उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली.”

अख्या एक दिवस सगळा भारत एकच साबण वापरतो. अजून गिनीज बुकवाल्यांनी याची नोंद कशी घेतली नाही हा प्रश्न पडतोय. राहता राहिलं एखादं युनोस्कोचं डिक्टेलेशन म्हणून फोटो तरी सोडायचा. मोती साबण आत्ता जगातला एक दिवसीय सर्वात जास्त वापर होणारा साबण !!

अस युनोस्कोनं सांगितल अस म्हणत, द्यायची पुडी सोडून. तसही हल्ली मोती म्हणल्यानंतर तुम्हाला वेगळं नाव आठवू शकतं पण मित्रों आज अच्छे दिन आहेत. म्हणजे दिवाळीचे अच्छे दिन. आणि घरातले म्हणताय अभ्यंगस्नानाला मोतीच पाहीजे. का तर म्हणे वापरतात.

आईन्स्टाईन जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात असलं आपलं शास्त्र.

मग म्हणलं, चला मोती तर मोती. आजची पोस्ट मोती साबणाच्या वासात आम्ही सकाळ सकाळी लेख लिहायला बसलोय. तुम्ही पण त्या वासानेच वाचत असाल हिच इच्छा.

तर करा सुरू –

अगोदरची माणसं दिवाळीला मोती वापरत नव्हती. ती वापरायची म्हैसुर साबण.

मोती साबण त्यामानाने अलीकडचा.

सत्तरच्या दशकात टाटाने या साबणाची निर्मिती केली होती. गुलाब आणि चंदन या दोन फ्लेवर मध्ये उपलब्ध असणारा हा भला मोठा साबण त्याकाळात २५ रुपयांना मिळायचा. पुढे जेव्हा टाटाची हि साबण बनवणारी कंपनी हिंदुस्तान लिव्हर मध्ये विलीन झाली तेव्हाच सोन्याचे दिवस उगवले. म्हणजे काय झालं तर तेव्हा मार्केटिंगच्या कुठल्या तरी मानवानं या साबणाला दिवाळीच्या मंगल आणि पवित्र संकल्पनेसोबत जोडल.

त्याचा फायदा असा होता की दिवाळी म्हणजे मोती हे समीकरण होवून जाईल पण तोटा असा होता की फक्त आणि फक्त दिवाळीच. आधी मधी या साबणाकडं कुत्रं सुद्धा ढुंकूण बघणार नाही.

आणि झालं देखील तसच. मोती साबणाची किंमत होती २५ रुपये. म्हणजे त्या काळात राजाचा साबण विकत घेण्याचा प्रकार.

यंदा मग काय !! या वाक्याच्या नादात अनेकांनी कर्ज काढली असतील, पण भावड्यांनी ताल केला. महाग गोष्ट विकायला उत्तम मार्केटिंग लागतं. मोती साबणाने भारतीयांची मने जाणली. त्यांना कळलं होतं आठवडाभर अंघोळ न करणारी लोकं सुद्धा दिवाळीत घासूनपुसून स्वच्छ होतात तर त्यांना कायतर महाग दिलं पाहीजे.

महाग म्हणजे चांगल हे गणित अजून पण आहेच.

मग मोती साबण महाग म्हणून दिवाळीत स्थिरावला, नंतरच्या काळात किॆवा त्या काळात सुद्धा महाग साबण होतेच. पण त्यांना मार्केटिंग जमलं नाही. डव्ह फक्त गोरं करायला निघाला तर डेटॉल संडासच्या दारात विराजमान झाला. प्रत्येक साबणाचा ऑडियन्स फिक्स झाला.

आणि मग जाहिरात आली…

“उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली.”

दिवाळी आली की गेली काही वर्ष ही जाहिरात लागतेच. दरवर्षी प्रमाणे या जाहिरातीचे जोक्स आपण दिवाळीची परंपरा समजून फोरवर्ड करतो. प्रत्येकवेळी या साबणांची आठवण काढून नॉस्टेल्जीक मोडवर जातो. पण खर विचार केला तर दिवाळीचा साबण म्हणून हे दोन्ही साबण या सणाशी जोडले गेले याचा नक्की त्या साबणाना फायदा झाला का ? कधीही आक्रमक जाहिरात करावी न लागलेले हे साबण.

म्हैसूर साबणाने तर एकदाच धोनीला घेऊन जाहिरात बनवलेली. कधीही जाहिरात करावी लागत नाही असा सार्थ अभिमान त्यांना आहे. पण गंमतीचा भाग म्हणजे फक्त दिवाळी मध्ये अफाट खप आणि इतर वेळी कोणी विचारत ही नाही अशी अवस्था या भारतातल्या सगळ्यात फेमस साबणांची झालेली आहे.

बस्स इतकच. जास्त लोड घेवू नका. अंघोळ झाली असेल ती पण मोतीनं सो जस्ट चिल ब्रो… 

हे ही वाच भिडू –

1 Comment
  1. Nikesh Jilthe says

    उठा उठा सकाळ झाली…
    ही टॅगलाईन सतिश तांबे यांची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.