मेस चालवून नवऱ्याची साथ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी राजकारणात देखील गाजल्या

राजकारण महाराष्ट्राचं असो वा देशाचं, प्रत्येक राजकीय व्यक्तीने, पुढाऱ्याने आपले राजकीय वारसदार जन्माला घातले. पोटची मुले नसतील तर मानसपुत्र पुढे आणले. राजकारणी म्हणून पार अपयशी झालेल्या इसमांनीही तेवढा एक पराक्रम आपल्या नावावर नोंदविलेला दिसला. या साऱ्यांना अपवाद ठरलेला एक नेता होता… मारोतराव कन्नमवार.

आणि याच नेत्याची अर्धांगिनी जिने नवऱ्याला साथ देत एकेकाळी वरोऱ्याच्या रस्त्यालगत खाणावळ चालवून आपली व आपल्या कुटुंबाची गुजराण करण्याच प्राक्तन अनुभवलं. पण अशा हि परिस्थितीत खचून न जाता जनसेवेचं निर्व्याजी काम करून पंडित नेहरूंसारख्या मोठ्या नेत्याच्या शाबासकीची थाप ही पदरी पाडून घेतली.

मारोतराव कन्नमवारांच्या पत्नी अर्थात गोपिकाबाई कन्नमवार यांचा हा किस्सा.

चंद्रपूरच्या भानापेठ नावाच्या साध्या वस्तीतील एका दरिद्री कुटुंबात दादासाहेबांचा जन्म झाला. दादासाहेबांनी कधीकाळी वृत्तपत्र विकून आणि काँग्रेस कमेटीच्या बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर दिवस काढले. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि कोणत्याही धनवंत वा संख्यासंपन्न जातीचं पाठबळ नसलेल्या या साध्या माणसाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत केलेली वाटचाल कोणालाही थक्क करणारीच होती.

वयाच्या केवळ अठराव्या वर्षी मारोतराव ज्यांना सारेचजण दादा म्हणत त्यांचा गोपिकाबाई यांच्याशी हिंगणघाट या ठिकाणी विवाह झाला. बऱ्यापैकी सधन कुटुंबातल्या गोपिकाबाई मारोतरावांच्या चंद्रमौळी संसारात हळूहळू रमल्या. नवऱ्याच्या घरी अठराविश्व दारिद्र्य असताना गोपिकाबाईंनी मोठ्या जबाबदारीनं संसार चालवला. त्याकरता प्रसंगी त्यांनी २५ रुपये महिना पगाराची नोकरी सुद्धा केली.

आपल्या नवऱ्याच्या राजकीय कार्यात सुद्धा गोपिकाबाईंची साथ होती. १९५९ साली काँग्रेसचं ६४ वं अधिवेशन नागपूरमध्ये भरलं होत. मारोतरावांच्या पत्नी गोपिकाबाई कन्नमवार यांची या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. तेव्हा नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष होत्या. गोपिकाबाईंना सगळे ताईसाहेब कन्नमवार म्हणत.

या अधिवेशनाचे यजमानपद त्यामुळे स्वाभाविकपणेच कन्नमवार यांच्याकडे होत. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत ढेबर भाईंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाची भव्यता पाहून देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी कन्नमवारांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.

काँग्रेस नेतेच काय तर खुद्द पंडित नेहरूंनी सुद्धा गोपिकाबाईंबद्दल गौरवोद्गार काढले होते.

मात्र या स्तुतीने त्या हुरळून गेल्या नाहीत हे पुढं घडलेल्या गोष्टींवरून लक्षात येतच. २४ ऑक्टोबर १९६४ या दिवशी कन्नमवारांचा मृत्यू झाला. एक महिन्याच्या अंतराने त्यांच्या जीवनावर साहित्यभूषण तु. ना. काटकर यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशन होते. नागपूरच्या चिटणीस पार्कवर तेव्हाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण या सोहळ्यासाठी आले होते.

त्या भव्य समारंभाला हजर राहून दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाणारी बस पकडायला शांताराम पोटदुखे आणि पत्रकार सुरेश द्वादशीवार नागपूरच्या जुन्या एस.टी. स्टँडवर गेले होते. तेव्हा दादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई त्या स्टँडवरच त्यांना दिसल्या. हातात एक छोटीशी बॅग घेतलेल्या गोपिकाबाई एस.टी.च्या तिकिटासाठी सामान्य माणसांप्रमाणे रांगेत उभ्या होत्या.

एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीणबाई असलेल्या गोपिकाबाईंना तसं बेदखल उभं असलेल पाहून त्या दोघांना हि गलबलून आलं. मग त्यांच्यातल्याच एकाने त्यांना जबरीनेच बसायला लावून त्यांची तिकिटे काढून आणली.

अशी हि व्रतस्थ स्त्री शेवटपर्यंत आपल्या पतीप्रमाणे स्वच्छ प्रतिमा घेऊनच जगली. आज असं एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोला जगता येणं केवळ आणि केवळ अशक्य.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.