कोरोना काळात लग्न करणाऱ्या उतावळ्या जोडप्यांसाठी S.P. ची स्पेशल ऑफर..

गेल्यावर्षी पासून कोरोनाने नुसता उच्छाद मांडलाय. संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर  मार्च २०२० पासून  सरकारकडून लॉकडाऊन लादण्यात आलं होत. यात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. यासोबतचं, विवाह सोहळा  आणि अंतिम संस्काराबाबत  मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. एकीकडे सर्व कार्यालये,  दुकान, अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्यांवर  कारवाई केली जात होती तर दुसरीकडे विवाह सोहळ्यांना परवानगी दिली जात होती. हा, कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची ताकीद देत  उपस्थितांवर मर्यादा जरूर  आणली गेली.

५० जणांच्या उपस्थितीत उरकायचा लग्न सोहळा 

सरकारकडून याबाबत आदेश तर जारी करण्यात आला. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील करण्यात आली. मात्र, विवाह सोहळ्यात संक्रमणाच्या  बातम्याही माध्यमांत झळकताना दिसल्या. तर अनेक ठिकाणी नियम पायदळी तुडविल्याच्या घटना देखील पाहायला मिळाल्या. मध्यंतरी प्रकरण कमी झाल्यानंतर तर याकडे कानाडोळाचं करण्यात आला. ज्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा नियमांची यादी  वाचावी लागली.

सध्या   कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अनेक ठिकाणी जमावबंदी लादण्यात आली आहे. मात्र यावेळी   विवाह सोहळ्यासाठी २५ जणांना  परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही परिस्थती पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयानक असल्याने मध्यप्रदेशातील एपींनी अनोखा तोडगा काढला आहे.

लग्न करणाऱ्यांसाठी स्पेशल  ऑफर, एसपींच्या  बंगल्यावर डिनर करण्याची संधी 

मध्य प्रदेशातील भिंड एसपी मनोज सिंग यांनी कोरोना काळात  विवाहसोहळ्यात कमीतकमी गर्दी जमा व्हावी यासाठी एक अनोखा तोडगा काढलाय. एसपी मनोज सिंग यांनी जाहीर केले की,

ज्या विवाहात १० किंवा १० पेक्षा कमी लोक असतील,  त्या वधू-वरांना भिंड एसपी एक खास ऑफर देतील. ज्यात  वधू-वरांना एसपींच्या  बंगल्यावर सरकारी वाहनाने  बोलावले धाडत, तसेच   त्यांच्या कुटुंबासमवेत डिनर पार्टी देण्यात येईल. यासह वधू-वरांचा सन्मान देखील  केला जाईल. त्यानंतर त्या जोडप्याला सरकारी वाहनाने पुन्हा घरी सोडले जाईल.

वास्तविक, कोरोना संपूर्ण देश तसेच भिंडमध्ये आपले पाय पसरवित चालला आहे. अशा परिस्थितीत विवाहसोहळ्यांमध्ये गर्दी जमल्याने संसर्ग होण्याचा धोका जास्त  संभवतो. अनेक नियम व निर्बंध लादल्यानंतरही लग्नांमधली गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे ही  गर्दी कमी करण्यासाठी भिंडचे एसपी मनोज सिंग यांनी ही अनोखी सुरुवात केली आहे.

१० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करणाऱ्या जोडप्यांचे  एसपी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आदरातिथ्य करण्यात येईल.

एसपी मनोजसिंग म्हणाले की,  कोरोना कालावधी हा एक अत्यंत कठीण काळ आहे. प्रशासन स्वत: च्या मार्गाने बरेच प्रयत्न करीत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमुळे भिंड येथे कोरोनावर  नियंत्रण असले तरी लग्नाचा हंगाम सुरू  आहे, त्यामुळे गर्दी वाढत आहे. आम्ही हे थांबविण्यासाठी बरीच तयारी सुरु केली आहे.  त्याच वेळी, आम्ही एक नवीन कल्पना घेऊन आलो आहोत.  जेथे लोक १० किंवा त्यापेक्षा कमी विवाहसोहळ्यांमध्ये उपस्थित असतील त्यांचा सन्मान केला जाईल.

ऑक्सिजन उत्पादनाबाबत देखील एसपींनी घेतला मोठा निर्णय 

भिंड एसपी मनोज सिंग यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत  बैठक घेत  आणखी एक मोठा निर्णय घेतला. ज्याअंतर्गत  भिंड जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार असल्याचे समजते. कोरोना संकटाच्या वेळी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनच्या अभावाचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेत,  एकाच वेळी दोन प्लांट  तयार करणार असल्याची माहिती मिळाली. जो २१ दिवसांत पूर्ण केला जाईल.

हेही वाचा भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.