आजच्याच दिवशी मार्टिन ल्युथर किंग म्हणाला होता, I have a Dream…..

प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्यावर श्रद्धा ठेवून वागणं वेगळं. सत्य, अहिंसा ही तत्वज्ञान बोलायला सर्वात अवघड. याच कारणासाठी गांधीजी आपल्या सत्याग्रहीची निवड स्वतः करायचे. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या समतेच्या लढ्यात सुद्धा त्यांच्याकडे दोन पर्याय होते. यातला पहिला पर्याय माल्कम एक्स चा आणि दुसरा मार्टिन ल्युथर किंगचा. 

हे दोघेही अमेरिकेच्या कृष्णवर्णीय चळवळीचे मोठे नेते.

1960 च्या दशकात या चळवळीने जोर धरला होता. माल्कम एक्स धर्माने मुस्लिम आणि जहाल विचारसरणीचा. गोऱ्या लोकांनी कृष्णवर्णीयांवर अनन्वित अत्याचार केलाय आणि त्यांना समानतेच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे हिंसा अहिंसेचा विचार न करता, ‘काळ्या लोकांनी मिळेल त्या मार्गाचा वापर करून गौरवर्णीयां विरुद्ध युद्ध छेडावे व आपले अधिकार हिसकावून घ्यावेत अशा कट्टर विचारांचा माल्कम एक्स पुरस्कर्ता होता. मार्टिन ल्युथर किंग ज्यूनियर हा याच्या बरोबर विरुद्ध विचारांचा होता. 

दोघांचे उद्दिष्ट सारखे होते मात्र मार्ग वेगवेगळे होते.

अमेरिकेत गुलामगिरीचा अंत अब्राहम लिंकननी 1863 सालीच केला होता. पण फक्त गुलामगिरी संपली होती. कृष्णवर्णीयांना समाजात अजूनही दुय्यम स्थान होते. शिक्षण, नोकरीत कृष्णवर्णीयांना डावलले जात होते.

कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. गुलामीतून मुक्तता झाली पण त्यानंतर जवळजवळ शंभर वर्षे निग्रोंच्या परस्थितीत काहीच सुधारणा झाली नव्हती. मार्टिन ल्युथर किंगच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठ्ठा लढा निग्रोंनी उभारला होता. मार्टिन ल्युथर किंगचा मार्ग सत्याग्रहाचा अहिंसेचा शांततेचा. अमेरिकन संविधानावर आणि त्यातल्या मुलतत्वांवर त्याचा पुर्ण विश्वास होता.

शिवाय ज्या देशात लिंकन सरकार एखादा गोरा राष्ट्राध्यक्ष आपल्या राष्ट्राचे अस्तित्व पणाला लावून निग्रोंची गुलामगिरीतून मुक्तता करु शकतो त्या देशात गोऱ्या लोकांचे ह्रदय परिवर्तन करुन हि लढाई आपण जिंकू शकतो असा त्यांना विश्वास होता.

आजच्याच दिवशी २८ ऑगस्ट १९६३ रोजी मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरने आपल्या दोन लाख सहकाऱ्यांसह अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनवर चाल केली आणि एक ऐतिहासिक भाषण केले. जे “I HAVE A DREAM” स्पीच म्हणून इतिहासात नोंदले गेले आहे. 

आपल्या भाषणात ते म्हणाले,

“की जरी अमेरिकन लोकांनी कृष्णवर्णीयांवर अत्याचार केले असले तरी या देशाच्या संविधानावर आमचा विश्वास आहे. या देशात न्यायसंस्था दिवाळखोर बनली आहे. तिच्यावर आमचा विश्वास नाही.” 

त्याचबरोबर ते आपल्या सहकाऱ्यांना बजावतात की,

“आपले ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही चुकिच्या मार्गाचा वापर करु नका.”  

स्वातंत्र्य समता आणि बंधुता हि सर्व कृष्णवर्णीयांची उद्दिष्टे होती. आणि म्हणून मार्टिन ल्युथर किंग म्हणायचे की, राष्ट्र म्हणून अमेरिकेची ध्येय आणि कृष्णवर्णीयांची ध्येय एकच आहेत. ते भविष्यासाठी आशावादी होते.

मार्टिन ल्युथर किंग म्हणाले की,

“माझे एक स्वप्न आहे एक दिवस असा येईल की ज्या दिवशी सर्वांची आपापसातली दरी नष्ट होईल. पूर्वी जे गुलाम होते त्यांची मुले आणि त्यांच्या मालकांची मुले एकत्र बसून जेवण करतील. माझी चारी मुले त्यांच्या चारित्र्यांवरुन तोलली जातील ना की त्यांच्या रंगावरुन.” 

आणि हे घडवून आणण्यासाठी ते अमेरिकन जनतेला आवाहन करत होते. सामान्य कृष्णवर्णीय जनतेनेही माल्कम एक्स पेक्षा मार्टिन ल्युथर किंगच्या मार्गाने जाणे पसंत केले. 

त्याच वर्षी नागरी अधिकार कायदा अमेरिकन संसदे समोर ठेवण्यात आला. किंग यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने ते पहिले पाउल होते. तो कायदा बनवला होता एका गोऱ्या माणसानेच म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी. केनेडी हे पुर्वीपासूनच किंग यांच्या विचारांचे पाठीराखे होते. मात्र कायदा पास होण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. त्यांच अधुरं राहिलेलं काम आणि मार्टिन ल्युथर किंग यांचा स्वप्न असलेला तो कायदा राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी पुढच्याच वर्षी संमत केला.

एक थेंबही रक्त न सांडता मार्टिन ल्युथर किंग यांनी हि लढाई जिंकून दाखवली कारण त्यांच्या तत्वांची बैठक पक्की होती. पुढे एका माथेफिरूने १९६८ साली त्यांची हत्या केली पण त्यांनी त्यांचे नियतकार्य पुर्ण केले होते. त्यांच्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले होते की, जेव्हा कृष्णवर्णीयांना समानतेचा अधिकार देणारा सुदिन येईल तेव्हा आम्ही आनंदाने गावू शकु.

“Free at last, Free at last. Thank God Almighty, we are Free at last! “

  • रणजित यादव.

भिडू रणजीत यादव यांचे इतर लेख. 

2 Comments
  1. devendra says

    Mitra chan lihit aahes ,,,

Leave A Reply

Your email address will not be published.