२१ नाय फक्त हे ६ पिक्चर बघायचे आणि एंडगेमला तयार रहायचं.

आले किती गेले किती संपले भरारा, या जगात आहे फक्त भक्तांचा दरारा. शहाण्या माणसाने गाढवाच्या मागणं आणि भक्ताच्या पुढणं जावू नये अस म्हणतात. तसही या जगात आत्ता पोत्याने भक्त झालेत. मोदी भक्त, पवार साहेब भक्त, राहूल भक्त, कम्युनिष्ठ भक्त, संघ भक्त आणि वंचित आघाडीचे भक्त. भक्तांना आपण भक्त आहोत हे मान्य नसतय पण भक्त प्रत्येक पार्टीत असतोय.

आत्ता तुम्ही म्हणाल आपल्याला काय राजकारण कळत नाय. त्यामुळे असले भक्त आपल्या वाट्याला काय येणार नाहीत. तर पोरांनो चुकताय तुम्ही गेम ऑफ थ्रोन्सचे भक्त विसरला काय. एकवेळ मोदींची चार काम वाचून भक्त होता येईल. शरद पवारांचा लोक माझे सांगाती वाचून भक्त होता येईल पण ते आठ सिझन सकाळ संध्याकाळ बघून, त्यातपण कोण कुणाबरोबर कस गेलं, भावाबहिणीचा काय मॅटर, तो ड्रॅगन अचानक डिप फ्रिजरमध्ये कसा गेला आणि हे भितींपलिकडं फॉरेनर माणसांना पण गोरी वाटणारी माणसं कोण असेल प्रश्न सोडवून मगच गेम ऑफ थ्रोन्स फॅन होता येतय.

बर इतकं करुन आमचा एक भिडू फॅन झालाच. रात्रंदिवस GOT चा रतिब घालून तो चर्चेला तयार झाला आणि ऐन टायमाला त्याची भाजपगत अवस्था झाली. म्हणजे कसं तयारी केलेली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात पण पेपर आला राज ठाकरेचा. तर झाल अस की, या भिडूनं GOT निब्बार पालथं घातलं आणि लोकं चर्चा करायला लागली मार्व्हल्सची. 

बर आत्ता एका झटक्यात मार्व्हलचं फॅन व्हायचं तर ते पण सोप्प नाय. GOT ला आठ वर्ष झाली आणि मार्व्हलला अकरा वर्ष. आत्ता अकरा वर्षांपुर्वी आपल्याला काय माहिती होतं का? की मार्व्हलबद्दल चर्चा करणं हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा मुद्दा असणाराय. पण काय करायचं. या कलियुगात तो पण मुद्दा झाला. लोक आत्ता मार्व्हलबद्दल चर्चा करु लागलेत म्हणून म्हणलं चला,

जिथं कमी तिथं आम्ही, झटक्यात शक्य तितकं सांगून पोरांना मार्व्हलप्रेमी करून टाकुया. 

मार्व्हलच्या सिरीजमध्ये आत्तापर्यन्त टोटल 21 पिक्चर आलेत. बर हे सगळे पिक्चर आणि त्यातले कॅरेक्टर एकमेकांसोबत संबधित आहेत. आत्ता एक पिक्चर बघायला टोटल 21 पिक्चर बघणं अशक्य आहे. तुम्ही लयच रिकामटेकडे असलात तर बघु शकताय नाही अस नाही. पण आम्ही कामछंदे असणाऱ्या लोकांबद्दल बोलतोय. तर कसय 21 अशक्य आहे पण 6 जमू शकतय न. तर हे सहा पिक्चर बघायचे. तेवढ्यावरुन अंदाज येतोय. मग तूम्ही येत्या 26 ला अॅव्हेंजर्स एन्ड गेम बघायला तयार होताय.

१. आयर्न मॅन.

Screenshot 2019 04 22 at 8.33.46 PM

अव्हेंजर्सच्या टीम मधला हिरो कोण तर आपला टोनी स्टार्क उर्फ आयर्न मॅन. खरंतर अव्हेंजर्स या सिरीजची सुरुवातच २००८ साली रिलीज झालेल्या ‘आयर्न मॅन’ या पिक्चरपासून झालेली. अव्हेंजर्सची आण-बाण-शाण असणाऱ्या आयर्न मॅन ची ओळख आपल्याला या पिक्चर मध्ये होते. पुढे जाऊन या सगळ्या अव्हेंजर्स एकत्र करायला, त्यांच्यासोबत वेळोवेळी जगावर? म्हणजे फक्त अमेरिकेवर येणाऱ्या संकटातून वाचवायला मदत करण्यात आयर्न मॅन आघाडीवर असतोय. म्हणून या हा पिक्चर बघुन आपल्याला नारळ फोडायला लागतोय.

२. कॅप्टन अमेरिका- द फर्स्ट अव्हेंजर. 

Screenshot 2019 04 22 at 8.35.16 PM

टोनी स्टार्क अव्हेंजर्सच्या टीम चा हिरो आहे पण घरचा कारभार शहाण्या माणसाच्या हातात द्यायला लागतोय. फौलादी मॅन म्हणून गावभर उंडारणाऱ्या पोराच्या हातात कारभार न देता सगळ्या गड्यांना बांधून ठेवणारा एकमेव माणूस म्हणजे कॅप्टन अमेरिका ऊर्फ कॅप. तसही अॅव्हेंजर्सच्या टिममधला पहिला माणूस ह्योच. आयर्न मॅनकडे असणारी सगळी शक्ती त्याच्या सुटमध्ये आहे पण अंगानं सुपरहिरो असणारा एकमेव माणूस म्हणजे कॅप्टन अमेरिका. साध्या सैनिकाचा कॅप्टन अमेरिका कसा झाला हे सांगणारा हा पिक्चर पण बघायला लागत असतोय.

३. मार्व्हल्स-दि अव्हेंजर्स. 

Screenshot 2019 04 22 at 8.37.03 PM

एकदा आयर्न मॅन आणि कॅप्टन अमेरिका या दोन मुख्य माणसांची ओळख झाल्यानंतर राहिलेल्या अव्हेंजर्सची फक्त तोंड ओळख झाली तरी बास आहे. यासाठी मार्व्हल्सचे अधले मधले पिक्चर्स बघितले नाही तरी चालतंय. मार्व्हल्सचे महत्वाचे अव्हेंजर्स थॉर, हल्क, ब्लॅक विडो, बार्टन तसेच निक फ्यूरी या सगळ्यांची स्पेशल पॉवर, त्यांचे एकमेकांशी संबंध सगळं एकाच बैठकीत समजून घ्यायचा सोपा मार्ग म्हणजे ‘दि अव्हेंजर्स पिक्चर. अव्हेंजर्सबद्दल पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पिक्चर मध्ये मिळतील .

४. कॅप्टन अमेरिका-सिव्हिल वॉर. 

Screenshot 2019 04 22 at 8.38.34 PM

करण जोहरचा कभी खुशी कभी गम बघितला असाल. शेवटी बच्चन, शाहरुख आणि सहाबोटाचा सुपरमॅन ह्रतिक एकत्र येतात. त्या अगोदर कस हे सगळे वेगळे का झाले ते कळणं पण गरजेचं असतय. त्यासाठी सिव्हिल वॉर बघायला लागतोय. अॅव्हेंजर्स का फुटले? एकत्र यायची गरज का आहे हे सगळ कळायला हा पिक्चर गरजेचा आहे. सोबत स्पायडर मॅन, एन्ट मॅन, ब्लॅक पॅंथर या पोरांची फुकटात ओळख होवून जाईल.

५. गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी. 

Screenshot 2019 04 22 at 8.39.59 PM

हॉलीवूडच्या मते जग म्हणजे अमेरिका आणि जगाच्या बाहेर म्हणजे थेट पृथ्वीच्या बाहेर. तर आत्ता हा राडा पृथ्वीच्या बाहेर जातो. आत्तारपर्यन्त कसय थॉर सोडला तर सगळे पृथ्वीचं रक्षण करायला भांडत आहेत. आत्ता पुढं जावून थॉर पण हेच करतो. या पिक्चरमध्ये दिसणारी माणसं म्हणजे क्विल, गमोरा, रॉकेट, ग्रुट. हे सगळे पृथ्वीच्या बाहेर लढत आहेत. आत्ता पुढं येणारा मेन व्हिलन थानोस बद्दल कलायला किंवा त्याची पार्श्वभूमी माहिती असायला हा पिक्चर मदत करतोय.

६. अव्हेंजर्स, इन्फिनिटी  वॉर.  

Screenshot 2019 04 22 at 8.41.05 PM

२६ तारखेला येणाऱ्या अव्हेजर्स एंडगेम चा हा पिक्चर म्हणजे पहिला पार्ट. तो थानोस कोण आहे? त्याला नक्की कसलं खडं पाहीजेत. तो आपल्याच पृथ्वीच्या मागं का लागलाय? असले बेसिक प्रश्न बऱ्यापैकी कळायला हा पिक्चर महत्वाचा आहे.

आत्ता आज तारिख आहे 22. उद्या तुमच्याहिकडं मतदान असेल नसेल. असलं तर मतदानाला अर्धा तास काढा, देशाचं कल्याण करा आणि मग जगाच्या  कल्याणासाठी फक्त सहा पिक्चर बघुन काढा. एवढं बघितलं न तरी चारचौघात बोलायचं धाडस येईल. पण हा बोलताना एक गोष्ट सांगायची ती म्हणजे, पहिले मैं बहुत दूखी थ्थां. मुझें अॅव्हेंजर्स पतां नहीं थ्था. फिर मेने बोलभिडूका लेख पढ्ढा. मेने सहाच पिक्चर देखें. अब मैं चर्चा कर सकतां हूं. आज मैं बहुत खूष हू.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.