मस्तानीच्या वारसदाराला संस्कृतचे अनेक श्लोक मुखोद्गत आहेत
मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. ती होती तेव्हा पहिल्या बाजीराव पेशव्याची अंगवस्त्र म्हणून तिची हेटाळणी केली गेली. पुण्याच्या कट्टर सनातन्यांनी तिच्यामुळे पेशवा बाजीरावांना देखील प्रचंड त्रास दिला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर लवकरच तिचेही निधन झालं. तिच्या मृत्युच्याही कथा दंतकथा आजही प्रचलित आहेत.
आज एकविसाव्या शतकातही तिच्या बद्दलची उत्सुकता कमी होत नाही. तिचा महाल, तिची समाधी, तिचा अंघोळीचा तलाव या सर्व ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात. मस्तानीच्या नावाने आईस्क्रीम पासून ते मिसळ पुणेकरांनी फेमस केलीय. तिचा गोरा रंग वगैरेंच्या आख्यायिका तर निराळ्याच.
अगदी संजय लीला भन्साळी देखील बाजीराव मस्तानी यांच्या लव्ह स्टोरीवर सिनेमा बनवतो आणि तो तूफान सुपरहिट देखील करून दाखवतो.
इतकं सगळं असूनही आपल्यापैकी अनेकांना मस्तानीच्या पुढच्या पिढ्यांचं काय झालं? बाजीराव आणि मस्तानीचे वंशज काय करतात, त्यांच्याबद्दल काहीच ठाऊक नसते. ऐकल्या असतात फक्त आख्यायिका.
ती मूळची बुंदेलखंडची. तिथले महाराजा छत्रसाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आपले वेगळे राज्य स्थापन केले व मुघलांशी सामना करून ते वाढवले देखील.
जेव्हा उतार वयात महाराजा छत्रसाल यांच्या संस्थानांवर मुघल सरदार महंमद बंगश याने हल्ला केला तेव्हा पेशवा बाजीराव त्यांच्या मदतीला आला. त्याने बंगशचा पराभव केला व त्याला पळवून लावले.
या तरुण पेशव्याचा पराक्रम पाहून छत्रसाल महाराज बेहद खुश झाले. त्यांनी आपल्या राज्याचा एक तृतीयांश भाग पेशव्याला देऊन टाकला. इतकंच नाही तर मराठ्यांशी रक्ताचं नातं जोडायचं म्हणून बाजीराव पेशव्यानां आपली लाडकी मुलगी दिली, ती म्हणजे मस्तानी.
मस्तानी ही महाराज छत्रसाल यांना रुहानीबाई या उपपत्नीपासून झालेली मुलगी.
या रुहानीबाई हैद्राबादच्या निजामाच्या दरबारात नृत्यांगना होत्या. रुहानी बाई मुस्लिम होत्या म्हणून मस्तानीला देखील मुस्लिम समजलं जातं. छत्रसाल महाराजांनी मात्र तिला राजकन्येसारखंच वाढवल होतं. मस्तानी घोडेस्वारी, तलवारबाजी, इतर युद्ध कौशल्यात पारंगत होती.
पुण्यात मात्र तिला पेशव्याची अंगवस्त्र म्हणून हेटाळणी करण्यात आली पण बाजीरावाने तिच्याशी लग्न करून सनातन्यांचे तोंड बंद करून टाकले.
ती मोहिमेवेळी देखील बाजीराव पेशव्यांच्या सोबत असायची. बाजीराव पेशवे यांना एकूण चार पुत्र. काशीबाईंपासून तीन आणि मस्तानी पासून एक. यातील मस्तानी पुत्राचे नाव ठेवण्यात आले कृष्णराव. मात्र पुण्याच्या ब्राम्हणांनी त्याची मुंज करण्यास नकार दिल्यामुळे या कृष्णरावला आईच्या धर्माप्रमाणे मुस्लिम समजून वाढवण्यात आले. त्याचे दुसरे नाव होते समशेर बहादूर.
जेव्हा मस्तानी बाईसाहेबांचं शेवटचं आजारपण होत तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला बाजीरावांच्या प्रथम पत्नी काशीबाई यांच्या हवाली केलं. काशीबाई यांनी देखील त्याला मस्तानीच्या मृत्यूनंतर आपल्या सख्ख्या मुलांप्रमाणे प्रतिपाळ केला. राघोबा दादा आणि समशेर हे समवयस्क होते. दोघे एकत्रच वाढले.
हा समशेरबहादूर देखील प्रचंड पराक्रमी होता. तो दिसायला आणि बोलण्यात अगदी वडिलांसारखा होता असं म्हणतात.
बाजीरावांच्या नंतर सत्तेत आलेल्या नानासाहेब पेशव्यांनी त्याला आपल्या दरबारात मानाचे स्थान दिले. समशेर बहादूर देखील अनेक मोहिमेमध्ये पेशव्याच्या सोबत सहभागी होत. पुढे पानिपताच्या लढाईत सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे यांच्या सोबतच समशेर बहादूर यांचा देखील मृत्यू झाला.
छत्रसाल महाराजांनी जो बुंदेलखंडचा भाग बाजीराव पेशव्यानां भेट म्हणून दिला होता तो हिस्सा या समशेर बहादूर यांच्या पुत्राला पेशव्यानी जहागीर म्हणून दिला. असंसांगितलं जातं की समशेर बहादूर यांची पुढची पिढी पेशव्याच्या गादीवर दावा सांगू नये म्हणून हि वाटणी केली गेली.
कारण काहीही असो पण समशेर बहादूर यांचे सुपुत्र अली बहादूर हे बांदा संस्थांनचे नवाब बनले.
याच बांद्याच्या नवाबांपैकी त्यांचे नातू अली बहादूर दुसरे हे पराक्रमी होते. जेव्हा १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम सुरु झाला तेव्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांना राखी पाठवली व बहिणीचे रक्षण करण्याची आठवण करून दिली. या राखीचा सन्मान करण्यासाठी अली बहादूर स्वातंत्र्यलढ्यात उतरले आणि झाशीच्या राणीसोबत लढाई लढवली.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या राणीचा पराभव झाला. त्या रणांगणांवर धारातीर्थी पडल्या. त्यांची साथ दिली म्हणून बांद्याच्या नवाबांचं संस्थान खालसा करण्यात आलं. बहिणीचं रक्षण करण्यासाठी मस्तानीच्या वंशजांना मोठी किंमत चुकवावी लागली पण त्यांना याचं कोणतंही वैषम्य नव्हतं.
अली बहादूर दुसरे आणि त्यांचे वंशज पुढे इंग्रजांच्या नजरकैदेत वाढले.
त्यांना इंदौर मध्ये ठेवण्यात आलं होतं. भारत स्वतंत्र होई पर्यंत ब्रिटिश व्हाईसरॉयकडून त्याना काही पैसे पेन्शन म्हणून दिले जात होते मात्र शहराबाहेर देखील पडण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागत असे. १८५७ च्या उठावात ज्या संस्थानांनी भाग घेतला होता त्यांनी पुन्हा बंड करू नये म्हणून हि व्यवस्था करण्यात आली होती.
स्वातंत्र्यानंतर मात्र हे बंधन उठवण्यात आले. आज भोपाळ, इंदौर आणि सिहोर या तीन ठिकाणी बाजीराव आणि मस्तानीचे वंशज राहतात. भोपाळ येथे राहणारे अझीझ अली बहादूर हे पूर्वी एका शाळेत मुख्याद्यापक होते. त्यांचा महाराष्ट्रातील मंदिरांचा गाढ अभ्यास आहे. बाजीराव आणि मस्तानी बद्दलच्या गैरसमजांना दूर करण्यासाठी त्यांनी एक हिंदी पुस्तक देखील लिहिले आहे.
समशेर अली बहादूर यांचे थेट आठवे वंशज मध्य प्रदेशच्या सिहोर मध्ये राहतात.
त्यांना अजूनही नवाब ऑफ बांदा हि पदवी आहे. स्वातंत्र्याच्या वेळचे नवाब सैफ अली बहादूर यांना फाळणी नंतर पाकिस्तानला जाण्याची संधी होती मात्र त्यांनी त्यास नकार दिला. सिहोर येथे एक वाडा बांधून तिथेच त्यांनी पुढचं आयुष्य व्यतीत केलं.
या नवाब सैफ अली बहादूर यांची तेरा मुले व नातवंडे आजही नवाब बांदा कंपाउंड येथे राहतात. यातील अश्फाक अली बहादूर यांचा मुलगा उमर अली बहादूर हा पुण्यात शिकला. फक्त इतकेच नाही तर त्याने संस्कृतचा अभ्यास देखील केला, त्याला अनेक श्लोक मुखोदगत आहेत.
पुण्यातच पेशव्यांचे वंशज विनायकराव पेशवे यांच्या प्रभात रोडवरील घरात जाऊन त्याने भेट घेतली.
मस्तानीच्या वंशजापैकी उमर अली बहादूर हे पहिले ठरले ज्यांना बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा मान देण्यात आला. त्यांनी पुण्याच्या ब्राह्मणांसोबत खास पंक्तीत केळीच्या पानावर भोजनदेखील केले. आपल्या जुन्या परंपरांशी पुन्हा जोडले गेल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली.
आज शादाब अली बहादूर हे नवाब ऑफ बांदा समजले जातात. त्यांनी कॉमर्स मध्ये पदवी घेतली असून कॉम्युटरचा डिप्लोमा देखील केला आहे. शादाब अली बहादूर यांचा सराफीचा व्यवसाय आहे व सिहोर मध्ये परंपरागत शेत जमीन देखील त्यांच्या नावावर आहे. त्यांचा मुलगा प्रिन्स अरबाब अली बहादूर हा भावी नवाब आहे.
मध्यंतरी बाजीराव मस्तानी सिनेमात इतिहासाचे विद्रुप चित्रीकरण केले म्हणून जो वाद झाला होता तेव्हा पेशव्यांच्या वंशजांसोबत मस्तानीचे वंशज देखील ठाम पणे उभे होते.
आजही पेशवा बाजीराव आणि मस्तानी बाईसाहेब यांचे वंशज मध्यप्रदेशव्हा वेगवगेळ्या भागात राहत असूनही एकमेकांच्या संपर्कात असतात. बऱ्याचदा ईद एकत्र साजरी होते. यातील अनेक सदस्य अधूनमधून पुण्याला भेट देत असतात. मस्तानी बाईसाहेबांच्या बद्दलची उपेक्षा, त्यांच्या पाबळ येथील समाधीकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष या बद्दल त्यांनी आवाज देखील उठवला आहे.
त्यांच्या वंशजांपैकी एक असलेले अली बहादूर जेव्हा शनिवार वाड्याच्या भेटीला आले होते तेव्हा ते म्हणाले,
“आमच्या पूर्वजांनी धर्माचा जातीचा विचार न करता इंग्रजांशी लढा दिला. आजच्या पिढयांनी देखील देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे.”
हे ही वाच भिडू.
- उचल्या लोकांनी मस्तानीचे संरक्षण केले. आजही या गावाला उचल्यांचे पाबळ म्हणून ओळखतात.
- बाजीरावच्या सासऱ्याच्या गावात लोकांना आजही खरेखुरे हिरे सापडतात
- पानाचा असला लाल इतिहास, ना बच्चन सांगेल ना मस्तानी.
- मोठमोठ्या सोसायट्यांचे जंगल बनलेलं कोथरूड म्हणजे एकेकाळी खरोखरच जंगल होतं