खान्देशचा दादासाहेब फाळके : मास्टर दत्ताराम !

चाळीस वर्षांपूर्वी पहिल्या अहिराणी सिनेमाची संहिता लिहिली गेली. धुळ्यात ! नाव ऐकलं की डोळ्यासमोर धूळ आपसूकच दिसू लागते, त्याच धुळ्यात. सत्तरीच्या दशकात टेलरिंग करणाऱ्या साध्या शिंप्याने खान्देशची बोली अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी उचललेलं हे शिवधनुष्य होतं. कथा, पटकथा, संवाद, गीते, इत्यादी धुळ्यातच तयार होती; कॅमेरामन मुंबईतुन मागवण्यात आले; आणि अभिनेता पुण्याहून,

डॉ. श्रीराम लागू !

विश्वास बसत नसेल ना? पण आपण वाचलं ते खरंय !

हे अग्निदिव्य साकार करणारा स्वप्नयात्री होता, दत्ताराम चिंचोले; मास्टर दत्ताराम चिंचोले !

धुळ्याच्या राजकमल टॉकीजच्या शेजारी ऊसगल्लीत मास्टर दत्ताराम यांचं टेलरिंगचं दुकान होतं. समोरच हक्काचं राजकमल टॉकीज आणि पुढे चार पावलं चालून जुन्या आग्रा रोडला लागलं की प्रभाकर टॉकीज. टीव्हीचं तोवर नामोनिशाण नव्हतं. मनोरंजन म्हटलं तर सिनेमा आणि रेडिओ. पन्नास वर्षांपूर्वी दत्ताराम यांना संगीत आणि सिनेमाचं वेड लागलं आणि लगोलग त्यांनी ‘मुसा ऍण्ड पार्टी’ नावाने ऑर्केस्ट्रा सुरू केला. काही काळाने तो निकालात निघाला.

तुमच्या आंतरिक प्रेरणांना, कलांना, विचारांना आणि सामाजिक मूल्यांना अजरामर करायचं असेल तर सिनेमा हेच एकमेव ताकदीचं माध्यम आहे ही गोष्ट त्यांना उमगली आणि खान्देशच्या लोककला, येथील लोकजीवन, व्यावहारिक जीवन; दारू, दारिद्र्य आणि निरक्षरतेसारख्या सामाजिक प्रश्नांना हात घालून मास्टर दत्ताराम यांनी १९७५-७६ मध्ये जगातला पहिला अहिराणी चित्रपट लिहिला.

त्याकाळात धुळे आज आहे इतकं मागास नक्कीच नव्हतं. प्रताप मिल, मनमाड जीन, दिल्लीवाला जीन या व इतर अनेक हॅन्डलूम उद्योगांमुळे ‘मुंबईचं पिल्लू’ म्हणून धुळ्याची ख्याती होती. शारदाबाई धुळेकर ह्या जुन्या जमान्यातील मराठी चित्रपटातील अभिनेत्री-गायिका त्या काळात प्रसिद्ध होत्या. खुद्द लता मंगेशकरांचं आजोळ धुळ्याजवळच्या थाळनेर गावचं. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी देखील धुळ्याचे. नव्वदच्या दशकातील आघाडीच्या मराठी पार्श्वगायिका अनुराधा मराठे ह्यासुद्धा धुळ्याच्याच.

आर्थिक सुबत्ता असली की सांस्कृतिक सुबत्ता येतेच. पण एका टेलरला कोण फायनान्स करणार ?

अशा परिस्थितीत होती नव्हती आयुष्याची सर्व जामापुंजी खर्ची घालून मास्टर दत्ताराम यांनी चित्रपट बनवण्याचा ध्यास घेतला. सोबतच्या रोजच्या बैठकीतल्या मित्रांनीही सहकार्य केलं. मदतीला वसईकर पेंटर अरुण कवीश्वर धावले. आणि धुळ्याच्या टॉवर बागेत (आताचं सरदार पटेल उद्यान) चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं.

चित्रपटाचं नाव होतं, ‘सटीना टाक’.

खान्देशातील लोकजीवनात ‘सटी’ नावाची देवता बाळाचा जन्म झाल्या झाल्या त्याच्या कपाळावर त्याचं भाग्य लिहिते, अशी ग्रामीण भागात धारणा आहे. ‘सटीना टाक’ म्हणजे या सटी देवीने लिहिलेलं संचित किंवा प्रारब्ध. खान्देशच्या स्थानिक लोकजीवणाचा, धार्मिक आणि सामाजिक श्रद्धास्थानांचा त्याचसोबत सामाजिक प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या या दैववादी, प्रारब्धवादी चित्रपटात नायकाच्या वडिलांची भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी साकारली.

चित्रपटाच्या सेल्युलॉइड निगेटिव्हज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्ज मुंबईत एडिटिंगला गेल्या, मास्टर दत्ताराम फिल्म प्रमाणन बोर्डच्या सर्टिफिकेशनच्या मागे लागले आणि त्याच दरम्यान काळाने घात केला. जिथे ‘सटीना टाक’ एडिट होणार होती त्या बॉम्बे लॅबला आग लागली. ‘सटीना टाक’सोबत सुमारे २०० रीळ, मास्टर दत्ताराम यांची मेहनत आणि आयुष्याची कमाई जळून खाक झाली.

नियतीचा डाव मान्य करत हा कलातपस्वी पुन्हा ऊसगल्लीतलं दुकान उघडून टेलरिंगच्या कामाला लागला. काळाच्या ओघात धुळ्यासह संपूर्ण खान्देशची आर्थिक सुबत्ता गेली. सांस्कृतिक जीवनाची रया गेली. ह्या माणसाने त्याच्या कपाळावर लिहिला गेलेला ‘सटीना टाक’ सोडला नाही. नव्वदच्या दशकात सेल्युलॉइडचं तंत्रज्ञान महाग झालं. देशात संगणकीकरण वाढलं. नव्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहात मास्टर दत्ताराम आपला ‘सटीना टाक’ शोधू लागले. VHS व्हिडीओ टेपचा जमाना आला. स्थानिक कलावंत हेरून VHS-VCR कॅमेरावर फिल्म तयार करण्याचा विचार केला. पण पैसा होता कुठे? तो तर ऐंशी साली मुंबईतच जळून खाक झालेला.

मास्टर दत्तारामनी धुळ्यातलं राहतं घर विकलं !

पैसा उभा राहिला. खान्देशातून सुरतला स्थलांतरित झालेले युवा कलावंत मनोज भोई नायक झाले, जेष्ठ अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे यांनी नायकाच्या वडिलांची भूमिका साकारली.

जेष्ठ पत्रकार आणि निवेदक जगदीश देवपूरकरांनी चित्रपटात गोंधळी साकारून “आज गोंधळ जागर.. खान्देश सोनाना आगर..” गाण्यातून खान्देशच्या लोकदेवतांची वणी-चांदवड ते सातपुडा आणि नागाई ते पाटणा देवी अशी सफर घडवून आणली. चित्रपटाची गाणी स्वतः दत्ताराम यांनीच लिहिली. ख्यातनाम संगीतकार अशोक पत्की यांनी संगीताचा साज सजवून सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी ही गाणी गायली. कानुश्री प्रतिष्ठानचे सुनील नेरकर, चंद्रशेखर पाटील अशा ज्ञात अज्ञात सामाजिक कार्यकर्त्यांनी शक्य तेवढी मदत केली.

आणि अखेर धुळ्याचं सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या हिरे भवनात खान्देशचा मानबिंदू मास्टर दत्ताराम चिंचोले यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला अहिराणीचा मानबिंदू ‘सटीना टाक’ प्रदर्शित झाला.

पुढे अहिराणी भाषेची आणि भाषकांची सिनेसृष्टी विविधांगाने बहरली. मालेगावमध्ये मर्यादित संसाधनांचा वापर करून बनवलेल्या अहिराणी मिश्रित हिंदी-उर्दू चित्रपटांनी खान्देशचे मनोरंजन तर केलेच पण बॉलीवूडलाही तोंडात बोटे घालायला लावली. चाळीसगावच्या शिवाजी लोटन पाटील या युवा दिग्दर्शकाच्या ‘धग’ ह्या मराठी चित्रपटाने पदार्पणातच राष्ट्रीय पारितोषिक खेचून आणले. साक्रीच्या योगेश कुलकर्णींनी खान्देशच्या लोककलेला ‘मोल’ चित्रपटातून 70mm पडद्यावर झलकवले.

गेल्या दहा अकरा वर्षांपासून मास्टर दत्ताराम पुण्यात आपल्या एकुलत्या एक मुलीकडे वास्तव्यास होते. महिला संस्कृतीच्या वाहक असतात ही नस त्यांनी ओळखली. पिंपरी चिंचवड शहरांतील महेंद्र पाटील यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन खान्देश कला व सांस्कृतिक विकास संस्थेच्या माध्यमातून पहिला अखिल भारतीय अहिराणी महिला मेळावा भरवला. खान्देशी महिलांच्या तोंडी तुपकट मराठी मालिकांतील “अग्गो बाई”, “अरेरे”, “छे छे” सारखे तथाकथित प्रमाणभाषेतील शब्दप्रयोग रुळतात तेव्हा “मरीमाय खाई जाओ तुले” सारखा प्रागैतिहासिक प्राकृत शब्दप्रयोग एकांतात जीव सोडत असतो. मास्टर दत्ताराम हेच रोखायला धडपडत होते.

आयुष्याच्या अखेरच्या काळातही त्यांनी दुसऱ्या नव्या चित्रपटाचं लेखन पूर्ण केलं. कलाकार आणि फायनान्सरची जुळवाजुळव सुरू होती.

पाणी विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण डॉक्युमेंटरीचं लिखाणही पूर्ण केलेलं पण त्याआधीच दि. १ ऑक्टोबर २०१८ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं पुण्यात निधन झालं. आता हा मागे राहिलेला दुसरा ‘सटीना टाक’ पूर्ण करणारा दुसरा मास्टर दत्ताराम लवकरात लवकर निर्माण होवो हीच खान्देशवासीयांच्या चरणी प्रार्थना !

येत्या काळात दांडिया आणि गरब्यासारखं ग्लॅमर कानबाई आणि गौराईला मिळवून द्यायला यशस्वी झालो तर तीच मास्टर दत्ताराम यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

  • जयंतकुमार सोनवणे (9404200678)