मसुरीच्या थंड हवेत कशा काय फुलतात आयएएस ऑफिसर्सच्या लव्हस्टोरी ?

उत्तराखंड राज्यात हिमालयाच्या कुशीत वसलेलं मसूरी शहर. गुलाबी थंडी, अल्हाददायक वातावरण, दऱ्या-खोऱ्यांमधली दाट हिरवाई, निसर्गाचा अप्रतिम आविष्कारच! म्हणूनच या भागात मसुरीला ‘पहाडों की रानी’ असे म्हणतात.

हे शहर ज्या टेकडीवर बसले त्याचा आकारही ‘सी’ अक्षरासारखा आहे. याच्या उत्तर भागातून पाहिल्यास हिमाच्छादित हिमालय दिसतो, तर दक्षिणेत द्रोणस्थली दिसते. पूर्वेला टिहरी-गढवाल व पश्चिमेला चकराता दिसते.

याच मनमोहक हिल स्टेशनमध्ये आहे लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन. देशातील सर्वात कठिण असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची अर्थात युपीएससी परिक्षा पास होवून तरुण अधिकारी प्रशिक्षणासाठी इथे येतात.

कॉलेजमध्ये, क्लासमध्ये शिक्षण घेताना किंवा ऑफिस मध्ये नोकरी करताना आपल्या वर्गातल्या किंवा बॅचमधल्या मुला-मुलीनं एकमेकांच्या प्रेमात पडणं ही तशी सामान्य गोष्ट. त्याच आपल्याला जास्त आप्रुप वाटत नाही. पण मसुरीत प्रशिक्षण घेताना IAS अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडते

आपल्यासारखेच हुशार, बुद्धीमान, देशातील सगळ्यात अवघड परिक्षा पास होवून आलेले इथे भेटतात. प्रशिक्षण घेताना, वेगवेगळे टास्क पुर्ण करताना एकमेकांची ओळख होते, एकत्र फिरण झालं की ओळखीचे रुपांतर हळू हळू मैत्री होते. एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते आणि प्रेमात पडतात.

मुलाकात, इकरार, प्यार और फिर शादी हे समिकरण इथं पण आकार घेते.

काल – परवा आयएएस ऑफिसर टीना दाबी आणि अतहर आमिर यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि पाच वर्षानंतर या २०१५च्या दोन टॉपर आयएएस ऑफिसरची लव्हस्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली. या दोघांची ओळख देखील इथेच झाली होती. पुढे प्रशिक्षणानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पण या अकॅडमीत ओळख होवून लग्न झालेल हे पहिलचं जोडप नाही. गेल्या तीन वर्षात मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात ५२ अधिकाऱ्यांची मने जुळली आहेत.

त्यापुर्वी २०१७ च्या बाबतीत पाहिल्यास त्या बॅच मधील ६ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्याशी लग्न केले होते. त्या बॅचमधील एकाने आपल्या ज्युनिअरशी तर एकाने आपल्या सिनिअरशी लग्न केले होते.

२०१६ च्या बॅचमधील प्रशिक्षण घेणाऱ्या १२ अधिकारी जोड्यांनी या अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवले होते तर २०१५ मधील १४ अधिकाऱ्यांनी आपल्या ज्युनिअर आणि सिनिअरशी लग्न केले होते.

जादू मसुरीची….

याबाबत बोलताना माजी गृहसचिव ज. के. पिल्लइ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मसुरीचं कौतुक केल होतं. पिल्लइ हे १९७२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनीही बॅचमेट असलेल्या सुधा यांच्याशी लग्न केले होते. ते म्हणाले होते

मसुरी सुंदर आणि रोमँटिक ठिकाण आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर तरुण येथे प्रशिक्षणासाठी येतात आणि त्याकाळात ते प्रेमात पडतात. आणि जर दोघांचेही काम एकच असेल तर एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेता येते. वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या बदल्यांनंतर जुळवून घेण्यात अडचण येत नाही”.

सरकारसाठी मात्र अडचणीच होते….

या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण काळातील प्रेम आणि लग्नामुळे सरकारला मात्र अडचणी निर्माण होतात. कारण या अधिकाऱ्यांची पोस्टिंग करताना दोघांना एका राज्यात काम करता येईल याचा मेळ घालावा लागतो. तसेच एका राज्यात पोस्टिंग दिल्यानंतर कामाची ठिकाणं जवळ-जवळ द्यावी लागता.

त्यात नियमाप्रमाणे IAS अधिकाऱ्यांना आपल्याच राज्यात बदली करून घेता येत नाही. पण काही अपवादात्मक परिस्थितीत त्यांना सूट दिली जाते. यामुळे पोस्टिंग करताना बरीच कसरत करावी लागते.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.