सानिया सोबत कमबॅक करणारी ती, इतिहासातील त्या एका मॅचमुळेच ओळखली जाते !

२०१५ सालची विम्बल्डन ग्रँन्डस्लॅम स्पर्धा. भारताची सानिया मिर्झा महिला दुहेरीमध्ये जिंकली होती आणि मिश्र दुहेरीमध्ये लिएंडर पेस. या दोघांसोबत एक नाव समान होत.” मार्टिना हिंगीस”. गेली बरेच वर्ष लोक हिला विसरून गेले होते. सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस बरोबर पुढची ३ वर्ष तिनं टेनिसवर राज्य केलं. दुहेरीच्या दोन्ही प्रकारात मिळून या तिन वर्षात ११ ग्रँन्डस्लॅम पटकावण्याची कामगिरी मार्टिनाने केली. वयाच्या ३५ व्या वर्षी कमबॅक करून तिने सगळ्यांना चकित करून सोडलं होत. तिचा मिश्र दुहेरीतला जोडीदार लिएंडर पेस तेव्हा ४२ वर्षाचा होता. या वयात मार्टिनाने अशक्यप्राय गोष्ट केली मात्र तिचा यशाच्या प्रवासात तिने अनेक चढउतार बघितले होते. तिच्या कारकिर्दीला एका सामन्यामुळे वळण लागले होते.

काय झाल होत तेव्हा नेमकं?

१९९९ सालच्या फ्रेंच ओपन ग्रँन्डस्लॅम स्पर्धेची फायनल. टेनिसची सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेफी ग्राफची कारकीर्द मावळतीला लागली होती. हे तिचं शेवटच वर्ष होत, आणि ही शेवटची फ्रेंच ओपन स्पर्धा ती खेळणार होती. गेल्या दोन वर्षात एकाही  ग्रँन्डस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा तीने प्रवेश मिळवला नव्हता. तरीही तंदुरुस्तीची परीक्षा पाहणाऱ्या फ्रेंच ओपनच्या फायनल पर्यंत तीने मजल मारली.

३० वर्षाच्या स्टेफी ग्राफ समोर होती अवघी १८ वर्षाची मार्टिना हिंगीस. दोघींच्यात एका पिढीचं अंतर होत.

मार्टिना हिंगीस तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर होती. वयाच्या १५ व्या वर्षी विम्बल्डन डबल्स जिंकून जगातली सर्वात लहान ग्रँन्डस्लॅम विजेती बनली होती. पुढच्याच वर्षी एकेरीतील फ्रेंच ओपन वगळता तीन ग्रँन्डस्लॅम जिंकून सर्वात कमी वयात रँकिंग मध्ये पहिल्या स्थानी जाण्याचा विक्रमसुद्धा तीने केला होता. १९९८ साली सुद्धा तीने भल्या भल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजयाची परंपरा अखंडीत ठेवली होती. दुहेरीमध्ये तर चारी ग्रँन्डस्लॅम जिंकून तीने करीयर स्लॅम मिळवला होता. एकेरीमध्ये मात्र तीला फ्रेंच ओपन जिंकता आलं नव्हत.

मार्टिनाकडे तारुण्यसुलभ जोश आणि गेल्या दोन वर्षात मिळवलेल्या यशाने आत्मविश्वाससुद्धा होता. इतक्या कमी वयात एवढे प्रचंड यश मिळाल्याने तो आत्मविश्वास डोक्यात गेला होता असं म्हणायला वाव आहे. कारण फायनलच्या आधी तीने स्टेफी ग्राफला तिचं वय झालय असं म्हणून हिणवल होतं. मॅच आधी शब्दांची लढाई खेळून स्टेफीवर तणाव बनवायचा तीचा इरादा होता. तुलनेने सोपी असलेली ही मॅच जिंकून आपलं अधुरं असलेलं फ्रेंच ओपनचं स्वप्न पूरं करायच्या उंबरठ्यावर ती होती. टेनिसच्या या युवराज्ञीला स्टेफी ग्राफच्या टेनिस सम्राज्ञीच्या खुर्चीवर बसायचं होत.

मॅचला सुरवात झाली. अपेक्षेप्रमाणे उत्कृष्ट खेळ करत मार्टिना ने पहिला सेट आरामात जिंकला. फोरहँन्ड बॅकहँन्ड चा सुरेख वापर करत तीचा कोर्टवरचा वावर तीच्या फिटनेसची साक्ष देत होता. दुसऱ्या सेटमध्ये सुद्धा ती २-० ने आघाडी वर होती.

मार्टिना हा सेट जिंकून ही मॅच सुद्धा खिशात टाकणार असे वाटत असताना तिच्याकडून एक चूक झाली.

तिचा एक फटका स्टेफीच्या कोर्टात लाईनवर पडला. कोर्टअंपायरनी स्टेफीच्या बाजूने निर्णय दिला. मार्टिनाचं डोकं सटकल. तिने अंपायरशी वाद घालायला सुरवात केली. एवढेच नव्हे तर स्टेफीच्या भागात जाऊन बॉल कसा लाईनच्या आत होता हे ती दाखवू लागली. अंपायरनी या बेशिस्त वागण्याबद्दल तिचा एक पॉइंट कापला. हाच मॅचचा टर्निंग  पॉइंट ठरला.

मार्टिनाची एकाग्रता भंग झाली. आधीच प्रेक्षकांना तिच्या स्टेफीवरच्या टीकेमुळे राग होता. मैदानातल्या तीच्या वागण्यामुळे तो राग जास्त वाढला. अख्खं स्टेडियम मार्टिनाच्या विरुद्ध झालं होत. तिथून पुढे स्टेफीने मिळवलेल्या प्रत्येक पॉइंटवर मैदानात प्रेक्षकांचा जल्लोष सुरु झाला. खेळाचा बदलेला नूर अनुभवी स्टेफीने बरोबर ओळखला. तिनं तणावात आलेल्या मार्टिनाची सर्विस ब्रेक केली.

अटीतटीचा झालेला तो सेट तीने ७-५ ने जिंकला. पुढच्या सेट मध्येसुद्धा स्टेफी ग्राफने आपली लय सांभाळली.

आपल्या तोंडचा घास स्टेफी हिरावून घेत असलेलं पाहून मार्टिना जास्त बिथरली. बाथरूम ब्रेक घेऊन सावरण्याचा तीने अयशस्वी प्रयत्न केला. शेवटच्या पॉइंटवेळी अंडरआर्म सर्विस करून तीनं स्वतःचं आणखीन हसं करून घेतलं. ६-२ ने शेवटचा सेट जिंकून स्टेफी ग्राफ फ्रेंच ओपनची विजेती बनली. अनुभवाने तारुण्यावर मात केली होती. स्वतः सुरु केलेल्या मानसिक युद्धाच्या जाळ्यात मार्टिना अडकली.

मॅच संपल्या संपल्या तीने स्टेफीच्या हातात हात दिला आणि ती ड्रेसिंग रूमकडे पळाली. मार्टिना शेवटच्या प्रेझेन्टेशन सेरेमनीला येणार नाही असं वाटत होत मात्र तीच्या आईने तीला आणलं. रडत रडतच ती प्रेझेन्टेशनला आली. तिनं उपविजेतेपद स्वीकारलं आणि पुढच्या वर्षी दुप्पट कष्टाने कमबॅक करण्याचं आश्वासन दिलं. एव्हाना तिच्या विरुद्ध झालेल्या प्रेक्षकांचही या अठरा वर्षाच्या अल्लड पोरी साठी मन हेलावल होतं.

खिलाडूवृत्तीच्या स्टेफीने सुद्धा तीला वडीलकीच्या नात्याने  “तुझं वय अजून कमी आहे, जिंकण्याची तुला आणखीन खूप संधी मिळणार आहे.” हे सांगून तीच्या गुणवत्तेचं कौतुक केलं .

दैवदुर्विलास म्हणजे तिथून पुढे मार्टिनाने फ्रेंच ओपन तर सोडा एकेरीतला एकही ग्रँन्डस्लॅम जिंकला नाही. स्टेफीचाही तो शेवटचा विजय ठरला.

Screen Shot 2018 09 30 at 6.09.10 PM

फ्रेंच ओपनच्या इतिहासातल्या सर्वात अविस्मरणीय सामन्यापैकी तो एक सामना होता. त्या सामन्यानंतर मार्टिनाच्या करीयरला उतरती कळा लागली. काही वेळा फायनल पर्यंत ती पोचली मात्र विजयात रुपांतर करायला ती कमी पडली. नव्या आलेल्या विल्यम्स भगिनीच्या ताकदवान खेळापुढे ती टिकली नाही. दुखापतीनी तीला घेरले. वयाच्या दुसऱ्या वर्षी  हातात घेतलेले टेनिस रॅकेट बाजूला ठेवून तीने निवृत्ती घेतली.

२००६ ला निवृत्ती मागे घेऊन शारापोवा वगैरेना हरवून तीने सनसनाटी निर्माण केली मात्र कोकेनसेवन प्रकरणात अडकून ती परत टेनिस मधून बाहेर फेकली गेली.

पुढे ५ वर्ष ती स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहिली. आयुष्यात केलेल्या चुका सुधारल्या.फिटनेस मिळवलं. तो सामना ज्यामूळं तीच आयुष्य बदललं तो ती कधीच विसरली नाही. ज्या वयावरून तिनं स्टेफीला चिडवल होत त्या वयातच ती टेनिस मध्ये परत आली आणि एकेरीत नाही पण दुहेरीत तरी टेनिसची सम्राज्ञी बनली.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.