सोनं १८ रुपये तोळा असताना त्यांनी खिशातले १६ लाख खर्चून माथेरानला रेल्वे आणली.

माथेरान. महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध थंड हवेच ठिकाण. डोंगर माथ्यावर घनदाट हिरवाईने नटलेल्या या छोटेखानी शहरातल्या थंडगार हवामानामुळे पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते. पावसाळ्यात तर माथेरानच वातावरण अधिकच बहरतं.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळी पडलेली कल्याणची हाजीमलंग डोंगर रांग, बदलापूरची टवली गुहा, त्यानंतर येणार नवरा-नवरीचा डोंगर, त्याला लागूनच असलेला चंदेरीचा सुळका, पेब डोंगर. आणि या रांगेतील माथेरानचा डोंगर. आजही इथला सगळा परिसर अगदी पूर्वी होता तसाच आहे. हिरवागार!!!

असं म्हंटल जात की पूर्वी हे धनगरांचं गाव होतं. शतकानुशतकं ते इथं राहायचे. त्यांचे पूर्वज पण याच ठिकाणी मरण पावले. त्यामुळेच ते या ठिकाणाला ‘मातेचं रान’ असं म्हणायचे.

ब्रिटिशांनी त्याचा अपभ्रंश करून माथेरान असं केलं. त्यांच्याच राजवटीत माथेरान या गावाचं रुपडं थंड हवेच ठिकाण म्हणून पालटलं. १८५० मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ठाण्याचे कलेक्‍टर ह्यूज मॅलेट या दोघांनी थंड हवेच हे ठिकाण म्हणून माथेरानचा नव्याने शोध लावला.

या ठिकाणची दुसरी आणि महत्वाची ओळख सांगायची म्हणजे माथेरानच्या घनदाट जंगलांमधून वाट काढत पाळणारी ‘टॉय ट्रेन’. ही टॉय ट्रेन जर माथेरानमधून वजा करायची म्हंटली तर इथली ओळख वजा केल्यासारखं होईल.

दार्जिलिंगमधल्या डोंगराळ भागातील टॉय ट्रेनची आठवण करून देणारी माथेरानची ही राणी इथपर्यंत आणली ती उद्योगपती सर आदमजी पीरभॉय यांनी. 

सर आदमजी यांचं या पठारावर जीवश्य कंठश्य प्रेम. ते इथं नियमित घोडेस्वारी करण्यासाठी यायचे. यातूनच त्यांनी पायथ्याच्या नेरळ गावापासून माथेरानपर्यंत पायवाट पण तयार केली. त्यावेळी दार्जलिंगच्या डोंगरामध्ये मिनी ट्रेन सुरु झाली होती, त्यावरून त्यांना इथं देखील अशी एखादी ट्रेन सुरु करून हा भाग इतर लोकांनी पण बघावा असं वाटत असे.

त्यांनी ते मनावर घेतलं आणि सुरु झाला माथेरानच्या टॉय ट्रेन निर्मितीचा प्रवास. 

३० वर्षीय सर आदमजी हे ब्रिटिशांना टेन्ट आणि शूज पुरवण्याचा व्यापार करत असतं. त्यांनी १९०० मध्ये ट्रेनच्या सर्व्हेच काम सुरु केलं. १९०१ मध्ये ते पूर्ण देखील झालं. त्यावेळी हवाई सर्वे करण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती अशा काळात डोंगरदऱ्यांमधून जाणाऱ्या २१ किलोमीटर सर्वेच काम पूर्ण केलं.

खर्चाचा अंदाज आल्यानंतर त्यांनी तब्ब्ल १६ लाख रुपयांची तरतूद केली. त्यावेळी सोन्याचा दर १८ रुपये प्रतितोळा होता. १९०४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

एव्हरर्ड काल्थरोप यांना सल्लागार इंजिनीअर म्हणून जबाबदारी देण्यात आली. कोणत्याही जेसीबीच्या साह्याने नाही तर शेकडो कामगारांनी हाताने डोंगरकपाऱ्या फोडायला चालू केलं. काम चालू असताना सर आदमजी यांचा मुलगा अब्दुल हुसेन यांनी या ठिकाणी राहायला आले. इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. अगदी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची देखील.

जवळपास ३ वर्षानंतर १५ एप्रिल १९०७ मध्ये ‘टॉय ट्रेन’ काम पूर्णत्वास गेलं.

काम पूर्ण झाल्यानंतर सर आदमजी ट्रेनचे चार इंजिन खरेदी करण्यासाठी जर्मनीला गेले. तिथून त्यांनी माथेरानला आणलेल्या चार इंजिनला ७३८, ७३९, ७४० आणि ७४१ असे नंबर देवू केले. यातील ७३८ नंबरच्या इंजिनने नेरळं – माथेरान पहिली फेरी मारली.

काही वर्षातच आदमजी स्वतः इथल्या एका छोटेखानी घरात राहायला आले. जेव्हा त्यांच्या घराबाहेर ट्रेन पास व्हायची तेव्हा ड्रायव्हर त्यांना सन्मान देण्यासाठी म्हणून रेल्वेची तीन वेळा शिट्टी वाजवत असायचा.

त्यानंतर काळात त्यांनी इथं २०४ एकर जागा खरेदी केल्याचे संदर्भ आढळले आहेत.

टॉय ट्रेन चालू झाल्यानंतर ब्रिटिश प्रशासनाला इथे पायाभूत सुविधा नसल्याचं लक्षात आलं. पर्यटकांना इथं पर्यंत आणायचं असलं तर त्यांच्यासाठी राहण्याची, खाण्याची व्यवस्था करणं गरजेच होतं. ही जबाबदारी देखील सर आदमजींनी उचलली. त्यांनी १०५ राहण्या योग्य जागा आणि हॉटेल स्वतंत्रपणे उभं केलं.

जेव्हा १९१२ मध्ये एक बोहरा पर्यटक इथं मरणं पावला त्यावेळी त्यांनी ३० हजार चौरस फुटांवर स्मशानभुमी बांधली. सर्वात कमी लोकसंख्या असून देखील माथेरानला नगरपालिका असण्याच श्रेय देखील आदमजींनाच जातं. विषेश गोष्ट म्हणजे नेरळ गाव तुलनेनं मोठं असून देखील इथं आजही ग्रामपंचायतच होती.

आदमजी यांची आई अमिनाबेन यांच्या मृत्युनंतर त्यांच्याच स्मरणार्थ इथल्या स्टेशनला अमन लॉज असं नामकरण करण्यात आलं आहे.

१९८३ पासून वाफेची इंजिनंही निवृत्त होऊन डिझेल इंजिनं आली आणि डबेही बदलत गेले. काळानुरूप या ट्रेनमध्ये बदल झाले, मात्र त्याच आकर्षण कधीच कमी झालेलं नाही. २००.. मध्ये या ट्रेनला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलं आहे.

२००५ आणि २०२० मध्ये बंद पडली होती ट्रेन

नै​सर्गिक आपत्तीमुळे २००५ मध्ये हा मार्ग पूर्णपणे बंद पडला होता. तेव्हा हॉटेल्स, घरगुती विश्रामस्थळे, टॅक्सी व्यवसाय, हमाल या सगळ्यांवर त्याचा परिणाम झाला होता. पुन्हा २००७ मध्ये सेवा पूर्ववत झाल्यानंतर माथेरानचं वैभव हळूहळू परतू लागल्याचं स्थानिक सांगतात. अगदी असंच काहीस चित्र २०२० मध्ये जेव्हा कोरोना काळात हि ट्रेन बंद पडली होती तेव्हा पुन्हा पाहायला मिळालं होतं.

माथेरानची लोकसंख्या जवळपास पाच हजारांच्या आसपास आहे. त्यातील बहुतांश कुटुंबं हॉटेल व्यवसायाशी संबंधित आहेत. त्याशिवाय नेरळ-कर्जत मार्गावरील सुमारे २५० टॅक्सीचालक व्यवसाय करतात. या मंडळींसोबतच जवळपास आठ हजार आदिवासी माथेरानवर अवलंबून आहेत. त्यामुळे टॉय ट्रेन बंद पडल्यास त्याचा सरळ फटका नागरिकांना बसतो.

आता नुकतचं सरकारने इथल्या टॉय ट्रेनसह हिमाचल प्रदेशमधील कालका-शिमला ऐतिहासिक रेल्वे मार्ग, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी-दार्जिलिंग रेल्वे मार्ग आणि तामिळनाडूमधील नीलगिरी या रेल्वे मार्गांच्या खाजगीकरणाचा निर्णय घोषित केला आहे. या चारही मार्गांवर वर्षाकाठी जवळपास १०० कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचं ही सांगण्यात आलं आहे.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.