बाबरी पाडून ३० वर्षे झालीत… आता मथुरेतल्या शाही ईदगाहचा एपिसोड सुरु झालाय

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मस्जिद कारसेवकांनी पाडली होती, त्या घटनेला आज ३० वर्ष पूर्ण झालीत. १९९२ मध्ये बाबरी पडली परंतु बाबरीनंतर आणखी एक नारा जन्माला आला.

अयोध्या तो बस झांकी है, काशी मथुरा बाकी है… जहाँ जहाँ दाग हैं, सब साफ किया जायेगा… 

बाबरीनंतर जन्माला आलेला हा नारा आजही कायम आहे. काशीतील ज्ञानवापी मस्जिद आणि मथुरेतील शाही ईदगाह मस्जिदीचा वाद अजूनही तापलेलाच आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीचं काम सुरु आहे, काशीतील शिवलिंगाचा वाद वाराणसी कोर्टात सुरु आहे तर आता मथुरेचा वाद कोर्टाच्या बाहेर देखील तापायला लागलाय. 

गेल्या काही दिवसांपासून हिंदू महासभेकडून शाही ईदगाह मस्जिदीत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

अखिल भारत हिंदू महासभेने ६ डिसेंबर रोजी मथुरेच्या शाही ईदगाह मस्जिदीचं शुद्धीकरण करून तिथे लड्डू गोपाल म्हणजेच श्रीकृष्णाच्या बालमूर्तीची स्थापना करणे आणि मस्जिदीत हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली होती. 

या घोषणेनंतर पोलिसांनी हिंदू महासभेचे प्रदेश प्रवक्ते संजय हरियाणा यांच्यासह ४ जणांना ताब्यात घेतलंय, ५ जणांना नजर कैदेत ठेवलंय, ४३ पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे तर बाकी पदाधिकारी भूमिगत झाले आहेत. कृष्ण अभिषेक करण्यासाठी कावड काढणाऱ्या ब्रजेश भदोरिया यांनी अभिषेक पूर्ण न झाल्यास आत्मदाह करण्याची घोषणा केली होती, म्हणून पोलिस त्यांचा तपास करत आहेत. 

मथुरा शहरात कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आलीय. 

श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मस्जिदीच्या जवळ पोलिसांचा खडा बंदोबस्त करण्यात आला आहे. परिसरात प्रवेश करण्यावर कठोर बंधनं घालण्यात आली आहेत. मथुरेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय, हा तणाव परत उग्र रूप धारण करेल किंवा शांत होईल याबद्दल कुणीच निश्चित सांगू शकत नाही. मात्र या तणावामागे कृष्ण जन्मभूमीचा जो नेमका काय इतिहास दडला आहे हे जाणून घेणं मात्र गरजेचं आहे.  

कृष्ण जन्मभूमीचा इतिहास शेकडो जुना आणि वादग्रस्त राहिला आहे. 

पौराणिक संदर्भानुसार मथुरेजवळच्या कटरा केशव देवमध्ये कंसाचं कारागृह होतं. त्याच कारागृहात श्रीकृष्ण जन्माला आले होते. त्यांच्या स्मरणार्थ श्रीकृष्णाचे पणतू ब्रजभान यांनी इसवी सन पूर्व सहाव्या शतकात कारागृह तोडून मंदिर बांधलं होतं, असं स्थानिक लोककथांमध्ये सांगण्यात येते. 

या ठिकाणी महाक्षत्रप सौदास यांच्या काळातील ब्राह्मी लिपीत लिहिलेले काही शिलालेख सापडले. त्या शिलालेखांनुसार इसवी सन पूर्व ८५-५७ या काळात वसु नावाच्या व्यक्तीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता असा उल्लेख आढळतो. 

परंतु काळाच्या ओघात हे मंदिर पुन्हा ढासळलं तेव्हा सम्राट विक्रमादित्याने मंदिराची पुन्हा उभारणी केली.

सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांनी इसवी सन ४०० सालात जुन्या मंदिराला पडून त्याच्या जागी नवीन आणि भव्य मंदिराचं बांधकाम केलं. इसवी सन ३९९ साली चिनी पर्यटक फाह्यान भारतभ्रमंतीवर आला होता. तो १५ वर्ष भारतात राहिला, त्याच्या प्रवासवर्णनामध्ये चंद्रगुप्ताच्या दरबाराच आणि मथुरेच्या कृष्ण मंदिराचं वर्णन करण्यात आलं आहे.  

या वैभवशाली मंदिरावर पहिल्यांदा मुहम्मद गजनवीने आक्रमण केलं, त्याने मंदिर लुटून तोडफोड केली.

अफगाणिस्तानचा शासक मुहम्मद गजनवी याने भारताची लूट करण्यासाठी स्वारी केली. भारताची लुटपाट करतांना १०१७-१०१८ मध्ये तो मथुरेला पोहोचला. जेव्हा त्याने पहिल्यांदा हे मंदिर पाहिलं तेव्हा तो अवाक झाला होता. 

याबद्दल महमूद गजानवीच्या दरबारातील इतिहासकार अल उत्बी ने त्याची पुस्तक तारिक ए यामिनीमध्ये या लुटीबद्दल लिहिलंय. 

“जर कोणी अशी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत असेल तर १०० कोटी दिनार खर्च करून सुद्धा बांधली जाऊ शकत नाही. तरबेज शिल्पकारांना सुद्धा असं मंदिर बांधायला २०० वर्ष लागतील.”

१८६०-१८९० असे ३० वर्ष मथुरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेल्या एफएस ग्रॉसे यांनी स्वतःची पुस्तक ‘मथुरा-वृंदावन-द मिस्टिकल लँड ऑफ लॉर्ड कृष्णा’ मध्ये लिहिलंय की, ‘या मंदिराची भव्यता बघून गजनवीने कृष्ण मंदिरासह शहरातील शेकडो मंदिरं पाडली आणि मंदिरातील सोन्याचांदीच्या मुर्त्या, खजाना लुटला होता.’

गजनवीने तोडलेलं मंदिर एका कनौजच्या जहागीरदाराने पुन्हा बांधून काढलं.

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या खोदकामात मिळालेल्या एका संस्कृत शिलालेखावर इसवी सन ११५० साली या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारण्यात आलं असा उल्लेख आढळतो. यूपीच्या कन्नोज मधील गढवाल राजवंशाच्या जज्ज नावाच्या एका जहागीरदाराने या ठिकाणी एका भव्य विष्णू मंदिराचं बांधकाम केलं होतं. मात्र काही इतिहासकार या मंदिराच्या उभारणीचं काम मथुरेचे राजे विजयपाल देव यांनी केलं असं सांगतात.

या मंदिराला पुन्हा एकदा पाडण्यात आलं, पडणाऱ्याचं नाव होतं सुलतान सिकंदर लोधी.

दिल्ली सल्तनातीचा सुलतान असलेल्या सिकंदर लोधीने इसवी सन १४९८-१५१७ या काळात दिल्लीवर राज्य केलं होतं. त्याच्या दरबारातील इतिहासकार अब्दुल्ला याने त्याची पुस्तक तारीख ए दाऊदी मध्ये लोधीकडून मथुरेचं मंदिर तोडण्यात आल्याचा वृत्तांत लिहिला आहे. एवढचं नाही तर लोधीने हिंदूंना नदीत अंघोळ करणे आणि मुंडन कारण्यावर सुद्धा बंदी घातली होती.

लोधीने मंदिर तोडल्यानंतर पुन्हा एकदा मंदिराची उभारणी करण्यात आली.

चौरयांदा मंदिर बांधण्यावरून इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही इतिहासकारांच्या मते, जहांगीरच्या काळात इसवी सन १६१८ मध्ये ओरछाचे राजे वीर सिंह देव बुंदेला यांनी ३३ लाख रुपये खर्च  करून भव्य कृष्ण मंदिराची निर्मिती केली होती. हे मंदिर इतकं उंच होतं की यावरील झगमगाट आग्र्यावरून सुद्धा दिसत होतं. 

१६५० मध्ये फ्रेंच पर्यटक टॅवर्नियर आणि इटालियन पर्यटक निकोलाओ मनुची यांनी लिहिलंय की, भारतात बनारसनंतर सर्वात महत्वाचं मंदिर हे मथूरेचंच आहे. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेली सोन्याची छत्री आग्र्याहून सुद्धा दिसते.

मात्र मथुरेचे इंग्रज अधिकारी एफ एस ग्रॉसे याच्या पुस्तकातील संदर्भानुसार जयपूरचे राजे मानसिंह यांनी १५९० मध्ये कृष्ण मंदिराचं बांधकाम केलं होतं. ज्याची सुंदरता थेट आग्र्यावरून सुद्धा दिसायची.

मात्र ही सुंदरता बघितल्यानंतर औरंगजेबाने मंदिराला तोडण्याचे आदेश दिले आणि त्या जागी शाही ईदगाह मस्जिद बांधली.

साकी मुस्तद खान याने औरंगजेबावर लिहिलेली पुस्तक मासिर-ए-आलामगिरी मध्ये औरंगजेबाने मथुरेचं मंदिर तोडलं याबद्दल लिहिलंय. ब्रिटिश अधिकारी एफ एस ग्रॉसे याच्या पुस्तकातील संदर्भानुसार 

‘कृष्ण मंदिराची भव्यता बघून चिडलेल्या औरंगजेबाने मंदिराला तोडण्याचे आदेश दिले आणि त्यावर मस्जिद बांधण्यात आली होती.’ 

स्कॉटिश वास्तुशिल्प इतिहासकार जेम्स फर्ग्युसन यांनी ‘हिस्ट्री ऑफ इंडियन अँड ईस्टर्न आर्किटेक्टर’ या पुस्तकात औरंगजेबाने मथुरा मंदिर तोडल्याचा उल्लेख केला आहे. 

त्यांच्या नोंदीनुसार, चार माजली मंदिराचे वरचे दोन माजले तोडून टाकण्यात आले. त्या सपाट जागेवर मस्जिदीच्या आत असते तशी एक मेहराब बांधण्यात आली. याचा उद्देश एकच होता तो म्हणजे जेव्हा औरंगजेबाला मथुरेच्या मंदिरावर नमाज अदा करायची होती. इसवी सन १६७० मध्ये स्वतः औरंगजेबाने या मेहरबीत नमाज अदा केली होती. 

त्यानंतर मंदिराला पूर्णपणे नष्ट करून त्याजागी शाही ईदगाह मस्जिद बांधण्यात आली.

त्यानंतर भारतावर मराठ्यांचं राज्य आलं आणि १७७० मध्ये ही जमीन मराठ्यांच्या ताब्यात आली. मात्र मराठ्यांच्या काळात या जागेवर कोणत्याही प्रकारच्या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं नाही. त्यानंतर इंग्रज सत्तेवर आले, मंदिर आणि मस्जिदीची जागा ही शेतीची जमीन नसल्यामुळे १८०३ मध्ये या जमिनीची मालकी ब्रिटिशांच्या हातात गेली. लवकरच १८१५ साली ब्रिटिशांनी ही जागा लिलावात काढली.

तेव्हा बनारसचे राजे पाटनीमल यांनी ही १३.३७ एकर जागा ब्रिटिशांकडून लिलावात खरेदी केली. मात्र त्यांनी देखील या जागेवर कोणत्याही प्रकारचं बांधकाम केलं नाही. परिस्थिती जैसे थे होती. मुस्लिम पक्षाने सुद्धा यावर आक्षेप घेतला नाही.

१९४० मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कृष्णजन्मभूमीला भेट दिली, तेव्हा या जागेची अत्यवस्थ अवस्था बघून ते नाराज झाले.

पंडित मालवीय यांच्यानंतर १९४३ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती जुगलकिशोर बिर्ला यांनी कृष्णजन्मभूमीला भेट दिली. ते सुद्धा  या जागेची अवस्था बघून निराश झाले होते, तेव्हा पंडित मालवीय यांनी बिर्ला यांना पत्र लिहून इथे मंदिराची उभारणी करण्याची विनंती केली.

तेव्हा जुगलकिशोर बिर्ला, पंडित मदनमोहन मालवीय आणि इतर दोन लोकांनी राजा पाटनीमल यांच्या वंशजांकडून ही जागा खरेदी केली. मात्र जागेची नोंदणी करण्यापूर्वी या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या मुस्लिमांनी १९४५ मध्ये अलाहाबाद हायकोर्टात जनहितयाचिका दाखल केली. १९५३ मध्ये हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आणि जमिनीचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला.

त्यानंतर या जमिनीची नोंद करून मंदिर बांधण्यासाठी १९५१ मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. 

खरेदी केलेली जमीन या ट्रस्टच्या नावावर नोंद काण्यात आली मात्र तरीही पूर्ण जमिनीचा ताबा ट्रस्टला मिळू शकला नाही. त्यानंतर १९५८ मध्ये श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि १९७७ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानाची स्थापना करण्यात आली. तेव्हा या तीन संस्थांच्या नावावर जमिनीची नोंद करण्यात अली.

मात्र या जमिनीची नोंदणी करून तिचा ताबा घेतांना एक अडथळा होता, तो म्हणजे स्वतः शाही ईदगाह मस्जिदीचा. 

संपूर्ण १३.३७ एकर जागा राजा पाटनीमल यांच्या वंशजांनी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टला विकल्यानंतर या जागेचा मालकीहक्क ट्रस्टकडे देण्यात आला. मात्र या जागेपकी २.३७ एकर जागेवर खुद्द मस्जिद बांधलेली असल्यामुळे ही जागा मोकळी करण्यासाठी मस्जिद पाडावी लागणार होती. मात्र मुस्लिमांनी ही मस्जिद वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. मात्र त्याच काळात मंदिर बांधण्याची प्रक्रिया सुद्धा सुरु करण्यात आली होती. 

तेव्हा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांच्या वतीने एक समन्वयाचा मार्ग काढण्यात आला. 

जुगलकिशोर बिर्ला यांनी जन्मभूमीसाठी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट बनवलं होतं, ज्याचा कारभार स्वतः तेच बघत होते. मात्र १९६७ मध्ये जुगलकिशोर बिर्ला यांचं निधन झालं. तेव्हा १९६८ मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि शाही ईदगाह मस्जिद कमिटीने एक करार केला. ज्यानुसार १३.३७ एकर जमिनीपैकी ११ एकर जमिनीचे अधिकार मंदिर ट्रस्टकडे देण्यात आले तर उर्वरित २.३७ एकर जमीनीचे अधिकार मस्जिद कमिटीकडे देण्यात आले.  

मंदिर बांधतांना मस्जिद आणि मंदिरामध्ये उंच भिंत बांधण्यात यावी आणि मंदिर किंवा मस्जिदीचे कोणतेही दरवाजे एकमेकांच्या बाजूला उघडणारे नसावेत असं ठरवण्यात आलं. या नियमानुसार श्रीकृष्ण जन्मभूमीवर मंदिर बांधायला सुरुवात झाली आणि फेब्रुवारी १९८२ मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. श्रीकृष्ण जन्मस्थानावरचं मंदिर पुन्हा एकदा लोकांसाठी सुरु झालं. 

पण १९६८ मध्ये थांबलेला वाद ५२ वर्षांनी परत एकदा सुरु झाला. 

२०२० मध्ये ॲड. रंजना आणि त्यांच्यासोबत इतर ६ जणांनी ईदगाह मस्जिदीची जागा मोकळी करून ती कृष्ण मंदिराला देण्यात यावी, यासाठी तहसीलदाराच्या न्यायालयात केस दाखल केली. या कोर्टाने ही याचिका खारीज केली. त्यानंतर हीच याचिका जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली.

ॲड. रंजना आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की, जमिनीच्या व्यवहाराच्या करारावर सही करण्याचा अधिकार श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टला नव्हता, त्यामुळे हा करार अवैध आहे. करारानुसार मस्जिद कमिटीकडे असलेली जमीन मोकळी करण्यात यावी आणि त्या जागी खोदकाम करण्यात यावं कारण त्या जागी कारागृहाचे अवशेष आहेत.

या याचिकेसोबत इतर हिंदू संघटना सुद्धा मस्जिद हटवून ती जागा मोकळी करून मंदिराला देण्यात यावी यासाठी वेळोवेळी मागण्या करत आहेत. मात्र या वादानंतर मस्जिदीची जागा कोणत्या पक्षाला मिळेल हे तर न्यायालयाच्या निकालानंतरच कळेल.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.