हिंदी फिल्म इंडस्ट्रीने आमच्या मौशुमीला वाया घालवलं !

मी आणि माझा मित्र फार पूर्वी सिटीलाईट एरियात असेच हिंडत असताना (उकिरडे फुंकणे असा समाजमान्य शब्द आहे त्याला) मराठी नाटक सिनेमात काम करणारी एक अभिनेत्री दिसली. नाही, त्या उकिरडे फुंकत नव्हत्या. काहीतरी खरेदी करत होत्या. जसे बरेच मराठी सेलेब्ज तुम्हाला सिटीलाईट मार्केटमध्ये दिसतील. त्यांना बघून मित्र जोरदार उसासत म्हणाला,

“छान होती रे. साला नीट रोल्स मिळाले नाय. वाया गेली…”

मी उस्फूर्तपणे उद्गारलो. “मौशुमी चॅटर्जी सारखी?”

चॅटर्जी हे म्हणताना तोंड कसं गोड बोबडं बोलतं ना?त्या पेक्षा कैक पटीने अवीट गोड आहे ही बाई. म्हणजे गोडीने वागलात तर गोड नाहीतर झणझणीत तिखटाचा मारा आहे मौशुमी.

नाहीतर काय? डायरेक्ट सनी देवलला घायलच्या सेटवर“काही लोक ट्रॅक्टर आणि शेती सोडून acting करायला का येतात कळत नाही?” असं सूनवण्याची हिंमत बलवंत राय, कात्या इत्यादी खलपुरुषांची झाली नसती तिथं ही पाच फुटी बंगालन गरजते म्हणजे काय?

किस्से बरेच आहेत मौशुमी चॅटर्जीचे, जसं की ‘अनुराग’ फिल्मच्या शूटला ती रिव्हॉल्वर घेऊन फिरायची. कारण? काही नाही. गंमत.

कलकत्त्याच्या जजच्या घरात जन्मलेली इंदिरा लहानपणापासून बेबाक.

११ व्या वर्षी बालिका बोधु केला आणि त्यात खुशी काय तर जो स्टुडिओचा दरबान तिला आणि बहिणीला हुसकावून लावत असे, स्टुडिओ तिच्या वडिलांच्या इमारतीत असूनही, तो आता तिला सलाम ठोकत होता. (मौशुमी दरबानला डॉरबॉन बोलते निव्वळ ते ऐकण्यात दहा मलई सँडविच खाण्याची नशा आहे.)

बालिका बोधूच्या वेळी इंदिरा नाव बदलून काय ठेवता येईल असा सर्वांचा विचार चालू होता आणि तिच्या बहिणीने

भूगोलात शिकवल्या जाणाऱ्या मौसमी वारे (बांगला मध्ये मौशुमी) तिचं नाव ठेवलं. आम्ही आपलं उगाच जोक समजत होतो.

हेमंतकुमार (प्रसिद्ध गायक, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक, आपले हेमंत दा) इंदिराचे हेमंतकाकू (बंगालीत काकाला काकू म्हणतात. पण काकूला काका म्हणत नाहीत.) यांनी तिची जबाबदारी घेतली, आणि यथावकाश त्यांच्या मुलाशी तिचं लग्न ही झालं. ‘अनुराग’ च्या वेळी मौशुमी गरोदर होती. ‘कच्चे धागे’ हा आधी शूट होऊनही ‘अनुराग’ पहिला रिलीज झाला आणि हिट सुद्धा झाला.

पण मग इंडस्ट्रीत बवाल झाला ही एका बाळाची आई होणार. आता हिच्या करिअरचं काय?

पुढच्याच वर्षी आलेले राजेश खन्ना बरोबरचा हमशकल आणि बच्चन बरोबरचा बेनाम हे बऱ्यापैकी चालले.

महत्वाचं म्हणजे मौशुमी कोणी लेचीपेची हिरोईन नाही हे पब्लिक आणि इंडस्ट्री दोघांना कळलं होतं. 

मौशुमी एकंदरीतच आला दिवस साजरा करणाऱ्या वृत्तीची असल्याने ऑफर येवोत न येवोत तिला फार काही पडलेलं नसायचं.

दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहण्याचा निर्णय, फिल्मचा विचार न करता घेतल्याने रागावलेल्या मनोजकुमारने मौशुमीसाठी ठेवलेलं ‘हाय हाय ये मजबुरी’ सरळ झीनतला देऊन टाकलं. ‘रोटी कपडा’ हिट झाला आणि चर्चा मात्र मौशुमीची झाली.

मौशुमी इतकी बिनधास्त (निष्काळजी) राहूनही तिची अवस्था सुपर गुणी फरीदा जलाल सारखी मात्र झाली नाही.

  अमिताभ, राजेश, धरम, विनोद, शशी, ऋषी, जीतेंद्र, संजीव कुमार या ए लिस्टर बरोबर तिने हिट्स दिले. आणि विनोद मेहरा या बी प्लस हिरोबरोबर तर सर्वाधिक सिनेमे केले. ‘दर्याकिनारे एक बंगलो’ मध्ये फरीदाजी धमाल नाचतायत आणि मौशुमी बघतेय अशी सिच्युएशन आहे.

सहज आठवलं. मौशुमी काही ग्रेट डान्सर वगैरे नव्हती. नृत्य सोडा, अभिनय सुद्धा कुठे नीट शिकून आली नव्हती. बिचारीने अनुराग मधली

आंधळ्या मुलीची भूमिकासुद्धा कसलीही तयारी नसताना इन्स्टिक्ट वर तारून नेलेली.

अनुराग मध्ये तिचे खट्याळ, थुईथुई नाचणारे डोळे प्रेक्षकांना दिसण्याची शक्यताच नव्हती पण जेव्हा ते दिसले तेव्हा इतके बोलून गेले की बस्स मग त्या पुढे, ‘पायलीया खनकी के ना’ मध्ये तिला चपळ ऋषीला मॅच करता येत नाहीये हे विसरून आपण मौशुमीलाच बघत (टापत असा समाजमान्य शब्द आहे त्याला) बसतो.

खरं म्हणजे मौशुमीची पहिली मुलगी झाली त्याच वर्षी अस्मादिकांचा जन्म झाला पण म्हणतात ना आखर मर्द की जात. हेमा मालिनी ही दिव्य अप्सरा आहे पण मौशुमी ही त्या काळातल्या (म्हणजे आमच्या पिताश्रींच्या पिढीतल्या) कुठल्याही पुरुषाला प्राप्य वाटणारी , घरेलू + मादक हे दुर्मिळ मिश्रण असलेली जिवंत वीज आहे हे ज्ञान फार लवकर आम्हांस प्राप्त झाले होते. मात्र ते बोलण्याची हिम्मत आमच्या पिढीत नव्हती.

कॉलेजला असताना, आरडी शोधता शोधता मी हमशकलच्या एका गाण्यात अडकलो..

(कारण गाण्यात कोळी बांधव किनाऱ्यावर जाळं बांधता बांधता, नाचत ही असतात आणि गातही असतात.) समुद्राकाठी रात्र सजतेय,  कोरस गुणगुणत रहातो, हुमना.. हुमना… हुमना.. एक विचित्र सजेस्टिव्ह वाटणारा घोष … आणि हवेतल्या शिरशिरी सारखी आशाताईंची मदमस्त लकेर भिरभिरत येते… ला ला ला ला ला…किशोरचा आर्जवी आवाज ..

‘हम तुम गुमसुम रात मिलन की… आ जा गोरी मान ले बात सजन की…”

आणि मौशुमी दिसते. लालभडक साडीतली.. केसात गजरा माळलेली… absolute bengal red magic

एय शोन्दरी ssssआमाके शेष कोरते होबे.. एय खोकी तुमी आमाके मार्डर कोरबे ना.. ssss (तिकडे राजेश खन्नाचं काय झालं असेल.)

अशाच दुसऱ्या अफलातून आरडीच्या गाण्यात मौशुमी परत भेटली.

वेल, त्यावेळेला म्हणजे ९०ज मध्ये हे गाणं कुणालाही फार माहीत नव्हतं. मी सुद्धा राजू भारतन यांचा लेख वाचून हे गाणं शोधून काढलेलं. (तो लेख वाचून बरेच जण पेटले असावेत कारण हे गाणं आता सॉलिड मेनस्ट्रीम झालंय) ते म्हणजे, ‘ओ हंसिनी’. या गाण्यात ऋषी फार विनोदी दिसतोय पण मौशुमी त्या शुभ्र वस्त्रात राज हंसिणीच वाटते.

ती जरी हेमा, रेखाच्या लीग मध्ये नसेल तरी (नृत्य, उंची यात मार खाल्याने) तरी ए लिस्टरच होती. अमिताभ बरोबर मंझील केलाय तिने आणि त्या १९७८ च्या अविस्मरणीय पावसाळ्यानंतर मौशुमी, बच्चन आरडी किशोरचं ते गाणं मुंबईच्या पावसाळ्यात चिंब होणाऱ्या प्रेमिकांचं एक आयकॉनीक गीत बनलं…’रिमझिम गिरे सावन’…

पिकूच्या सेटवर मौशुमी जाताच अमिताभ सगळ्यांना म्हणाला,

‘ये देखीये हमारी हिरॉईन. हमारा गाना अबतक चल रहा हैं.’

मौशुमी संजीवकुमारचा अंगुर बघितलाय? देवेन वर्मा, संजीव कुमार यांना मौशुमी आणि अरुणा इराणीने तब्येतीने साथ दिलीय. मौशुमीची चिडचिडी, नंतर नवऱ्याचं डोकं फिरतंय या भीतीने घाबरलेली बायको कडकच. आणि

‘होठो पे ऐसी बात आयी हैं मधली पिवळ्या सिल्क गाऊनमधली मौशुमी….’ gulp (मराठीत आवंढा)… डोन्ट माईंड

कुठल्याही सिनेरसिकाला विचारा तिच्याबद्दल.

मेन्स लोग हां… वर वर बोलेल ‘वेरी गुड हिरॉईन’ पर अंदर ही अंदर लड्डू फूट रहे होते हैं… अँड जेनुईनली तिच्या त्या बोबड्या बांगला हिंदीने, त्या हसताना बाहेर आलेल्या दाताने अजूनच जीवघेण्या केलेल्या त्या स्माईलने कित्येक लोक घायाळ झालेत.

तिला स्वतः बद्दल काय वाटतं? ती म्हणते,

माझं एक फिचर धड नाही. माझं नाक वाकडं आहे. चेहरा धड नाही. दात तर जगप्रसिद्ध आहेत. आणि डोळ्यात ही तिरळेपणा आहे. बरं डोकं.. ते ही देवाने दिलेलं नाही.

बोला…

गुडडी तिला ऑफर झाला होता पण होणाऱ्या नवऱ्याने स्कुल ड्रेस म्हणजे मिडी घालायला लागेल म्हणून नाही म्हणायला लावलं.

हृषीकेश मुखर्जींनी हा अपमान समजून मौशुमीला त्यांच्या पुढच्या सिनेमात काम दिलं नाही.

या पासून अनभिज्ञ असलेली मौशुमी मात्र ऋषीदांना नेहमी खळखळून हसत भेटत राहिली. त्यांच्या शेवटच्या दिवसात मात्र त्यांनी तिला आपल्या सिरीयल मध्ये काम करायची गळ घातली तिला घरी बोलावून जेवायला घालून गुडडीचा किस्सा सांगितला. मौशुमी तसंही फार डोक्यात ठेवणारी बाई नाही. तिने हसत हसत काम करायला हो म्हटलं…

ऋषीदा… वाया घालवलीत आमच्या मौशुमीला.

#CinemaGully

#HappyBirthdayMoushumiChatterjee

  • गुरुदत्त सोनसुरकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.