भन्नाट जुगाड करत हा भाऊ अवघ्या सात मिनिटांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला

जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क. त्यांचा रेकॉर्ड आजच्या दिवसापर्यंत तरी कोणी मोडू शकलेलं नाहीये. असं कोणत्याही व्यक्तीचं नाव समोर आलेलं नाहीये. पण सध्या एक भाऊ उठलाय आणि असा दावा करतोय की तो इलॉन मस्क यांच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत झाला होता. पण तो हे ही स्वतः सांगतो की असं झालं फक्त मोजून ‘सात मिनिटांसाठी’.

हा भाऊ राहतो युनायटेड किंग्डममध्ये आणि त्याचं नाव आहे ‘मॅक्स फॉश’.

मॅक्स फॉश हा एक युट्युबर आहे. त्यावर सहा लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. मॅक्स फॉशने हे कसं केलं हे सांगणारा एक तपशीलवार व्हिडिओ देखील बनवला आहे आणि तो त्याच्या चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं की, हे सर्व शक्य झालं ते त्याने तयार केलेल्या ‘अनलिमिटेड मनी लिमिटेड’ नावाच्या कंपनीमुळे.

फॉश म्हणाला, यूकेमध्ये, कंपनी स्थापन करणं खूप सोपं आहे. ‘कंपनीज हाऊस’ नावाचं काहीतरी आहे ज्याच्यावरून यासाठी फॉर्म भरावा लागतो. शिवाय कंपनीसाठी नावाची गरज असते मात्र तुमच्या कंपनीच्या नावाचा शेवट ‘लिमिटेड’ (Ltd) ने व्हावा. म्हणून नियमानुसार त्याने ‘अनलिमिटेड मनी लिमिटेड’ असं नाव दिलं आणि व्यवसाय सुरु केला.

मॅक्सने आपल्या कंपनीची नोंदणी करताना मैक्रोनी, नूडल्स बनवणारी कंपनी असं वर्णन केलं. पुढची पायरी म्हणजे त्याच्या व्यवसायातील शेअर्स ठरवणं आणि त्याने १० अब्जचा निर्णय घेतला. त्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये, तो स्पष्ट करतो, “जर मी १० अब्ज शेअर्स असलेली कंपनी तयार केली आणि नोंदणीकृत केली. शिवाय नंतर त्यातील एक शेअर ५० पौंडांना विकला, तर माझ्या कंपनीचं कायदेशीर मूल्य ५०० अब्ज पौंड इतकं होईल, अशा प्रकारे मी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल.”

आता कंपनी रजिस्टर झाली मात्र कंपनीचे शेअर्स कसे विकायचे? हे मॅक्ससमोर मोठं आव्हान होतं. त्यासाठी मॅक्स स्वतः बाहेर पडला आणि लंडनच्या रस्त्याच्या कडेला खुर्ची-टेबल लावली. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कंपनीचे शेअर्स विकण्याचा प्रयत्न फॉश करू लागला. खूप माथापच्ची केल्यानंतर एक महिला त्याला घावली, जिने मॅक्सच्या अनलिमिटेड मनी लिमिटेड नावाच्या कंपनीचे शेअर्स ५० पौंडांना विकत घेण्याची तयारी दाखवली.

महिलेने शेअर्स खरेदी केल्यानंतर फॉशने तिला विचारलं, “तुला या कंपनीत गुंतवणूक का करायला आवडेल?” तेव्हा तिने उत्तर दिलं होतं, “मला वाटलं की हे व्हायचं आहे आणि मला त्यातून काहीतरी मिळेल.”

त्यानंतर मॅक्सने त्याच्या कंपनीची खरी किंमत जाणून घेण्यासाठी शेअरचे कागदपत्रं आणि इतर आवश्यक कागदपत्र प्राधिकरणाकडे (अथॉरिटी) पाठवले. सुमारे दोन आठवड्यांत, मॅक्सला परत एक पत्र मिळालं, ज्यामध्ये कंपनीचं मूल्य ५०० अब्ज पौंड असल्याचं सांगण्यात आलं.

त्या पात्रात लिहिलेलं होतं “आम्हाला प्रदान केलेली माहिती पाहता, Unlimited Money Ltd चं मार्केट कॅप ५०० अब्ज पौंड असं मूल्यांकन केलं गेलं आहे. मात्र रिव्हेन्यू ऍक्टिव्हिटीच्या (revenue activity) कमतरतेमुळे, तुमच्यावर फसवणूक केल्याचा आरोप होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा तातडीची बाब म्हणून अनलिमिटेड मनी लिमिटेड कंपनी बंद करण्याची आम्ही शिफारस करतोय.”

पत्र मिळताच मॅक्सने आपल्या कंपनीतील एकमेव गुंतवणूकदार महिलेशी बोलून कंपनी बंद केली. आणि असं करण्यासाठी त्यांना फक्त सात मिनिटं लागली. अशा पद्धतीने फॉश फक्त सात मिनिटांसाठी जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला. 

आता त्याने असा दावा का केलाय? हे सांगायचं तर त्यासाठी इलॉन मस्क यांची संपत्ती बघावी लागेल. 

टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती २०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. सुमारे ३२८ अब्ज डॉलर संपत्ती त्यांच्याकडे असल्याचं समोर आलंय. तेव्हा ५०० अब्ज पौंड म्हणजे अगदीच त्यांच्या संपत्तीपेक्षा जवळपास दुप्पट होत असल्याने फॉशने असा दावा केलाय.

आता काही मिनिटांसाठी का असेना फॉश भावाला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याचं भाग्य लाभलं असं त्याचं म्हणणं आहे. शिवाय हा आनंद साजरा करण्यासाठी आणि हा क्षण नेहमी लक्षात राहावा म्हणून  अथॉरिटीने पाठवलेल्या या पत्राची फॉश फ्रेम तयार करून सांभाळून ठेवणार असल्याचं म्हटलंय. जे मी किती श्रीमंत आहे याचा पुरावा असेल, असं मॅक्सनं सांगितलंय.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.