हे तीन भिडू म्हणजे मायावतींच्या बसपाचे ‘नेक्स्ट जनरेशन’ आहेत..

पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचे बिगुल बजलेय.  भाजप – काँग्रेससारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांसोबतचं स्थानिक पातळीवरच्या पक्षांनीही सभांची जय्यत तयारी केलीये. यातचं बहुजन समाज पार्टी (BSP) ने उत्तर प्रदेशासोबतचं पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीवरही आपला लक्ष ठेवलंय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या तोंडावर मायावतींच्या उत्तराधिकाऱ्याची जोरदार चर्चा होतेय. याचं चर्चेवर उत्तर देताना गेल्या आठवड्यात मायावतींनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, ज्यात त्यांनी म्हंटल कि,

सध्या तरी  मी पूर्णपणे फिट आहे. मला उत्तराधिकाऱ्याची गरज नाही.

यासोबतचं मायावती पुढे म्हणाल्या कि, पण येत्या काळात, जेव्हा आरोग्य ठीक नसेल, तेव्हा मी नक्कीच एक उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर करेल आणि माझा उत्तराधिकारी हा दलितचं असेल. माझ्या पुढचाचं नाही तर जेव्हा- जेव्हा बसपाचा उत्तराधिकारी निवडला जाईल तो दलित वर्गातलाचं असेल. 

आता मायावतींनी उत्तराधिकाऱ्याची  गरज नसल्याचे घोषित जरी केले असले तरी गेल्या काही दिवसांपासून जे चित्र पाहायला मिळतायेत. त्यावरून त्यांचा पुतण्या आकाश आनंद हा बसपाचा पुढचा चेहरा असल्याचे म्हंटल जातंय. जे काही दिवसांपासून राजकीय कार्यक्रमात जास्तचं सक्रिय पहायला मिळतायेत. आणि फक्त आकाशचं नाही तर आणखी दोन महत्वाचे चेहरे या शर्यतीत पाहायला मिळतायेत.

तसं पाहायचं झालं तर, माजी मुख्यमंत्र्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचं आपल्या पुतण्याला राजकारणात लॉन्च केलं होतं, त्यावेळी २६ वर्षीय आकाशला पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्याआधी २०१७ लाचं मायावतींनी आकाशची पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ओळख करून दिली होती. 

त्यांनतर आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आकाश सार्वजनिकरित्या खूप सक्रिय दिसत आहेत. त्यांनी जमिनी स्तरावर पक्षाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केलीये. महत्वाचं म्हणजे आकाश महत्त्वाच्या सभांना फक्त उपस्थितचं राहतो असे नाही, तर यापैकी अनेक सभांना संबोधित सुद्धा करतो, खासकरून जेव्हा मायावती या सभांना उपस्थित नसतात.

आकाश आपल्या भाषणाची सुरुवात करताना  ‘बहेनजी का संदेश’ असं म्ह्णून करतात आणि पक्षाच्या रॅली आणि इतर कार्यक्रमांशी संबंधित कल्पना आणि रणनीती सामायिक करतात.

मायावती आणि सतीश मिश्रा यांच्यानंतर ते आता पक्षातील तिसरे सर्वात शक्तिशाली नेते मानले जातात.

राष्ट्रीय समन्वयक म्हणून आकाश पंजाबमधील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे बोलले जातेय. जिथं पक्षाने शिरोमणी अकाली दला (एसएडी) सोबत युती केलीये. पंजाबमध्ये जेव्हा या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात येत होता, तेव्हा देखील आकाश तिथं उपस्थित होते. 

पंजाबात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आकाश गेल्या काही आठवड्यांपासून युतीसंदर्भात पक्षाच्या सभांना संबोधित करतायेत. आकाशने अलीकडेच जालंधरमध्ये बसपाच्या ‘अलख जगाओ’ रॅलीला संबोधित केले.

आता जरी आकाशचा पंजाबवर अधिक भर असला तरी ते यूपी निवडणुकीसाठी बसपाच्या रणनीतिक टीमचा भाग आहे. एवढंच नाही तर तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान आकाश पक्षाच्या धोरणात्मक नियोजन संघाचा भाग होते.

महत्वाचं म्हणजे आकाश मयावतींचा सोशल मीडिया कॅम्पेन देखील चालवतो. मायावतींना ट्विटरवर आणण्यात आकाशचाचं हात असल्याचे बोलले जातेय.

आता आकाशनंतर ज्या दोन चेहऱ्यांची सर्वाधिक चर्चा आहे. ते म्हणजे बसपा सरचिटणीस आणि पक्षाचे सेकंड-इन-कमांड सतीश मिश्रा यांचा मुलगा कपिल मिश्रा आणि सतीश मिश्रा यांचे जावी परेश मिश्रा.  हे दोघेही पक्षाचे सर्वात तरुण ब्राम्हण चेहरे मानले जातात. 

नोएडामध्ये शिक्षण घेतलेले ३५ वर्षीय कपिल मिश्रा हे पक्षाच्या ब्राह्मण अधिवेशनांना संबोधित करतात. जे ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाच्या सर्वात महत्वाकांक्षी मोहिमांपैकी एक आहे.  तर कपिल सोबत परेश मिश्राही पक्षात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. ते केवळ महत्त्वाच्या बैठकांमध्येच भाग घेत नाही तर अनौपचारिकपणे पक्षाचे मीडिया व्यवस्थापनही हाताळतात.

कपिल आणि परेश या दोघांच्या भूमिका प्रामुख्याने यूपीच्या राजकारणावर केंद्रित आहेत. असे म्हंटले जाते कि, या ब्राह्मण अधिवेशनामागचे या दोघांचचं डोकं आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून बीएसपीवर मीडियाचे लक्ष केंद्रित करण्यामागे पक्षातील लोक त्यांच्या भूमिकेचे कौतुक करतायेत.

या तिघांनाही बसपाच्या पुढच्या पिढीचे नेते मानले जात आहे, ज्यांना हायकमांडचा पूर्ण पाठिंबा आहे.

असे म्हंटले जातेय कि, लखनऊ मधल्या बसपा कार्यालयाच्या गेटवर मायावती आणि सतीश मिश्रा यांच्या गाड्यांशिवाय फक्त आकाश, कपिल आणि परेश यांच्याचं गाड्यांची तपासणी होत नाही. यावरूनच त्यांची पक्षातली जागा कळून येते. कारण, सुरक्षा तपासणीशिवाय इतर कोणालाही बसपाच्या पक्ष कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी नाही. पक्षाचे खासदार आणि आमदार सुद्धा सुरक्षा तपासणीनंतरचं आत जातात.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वाच्या दृष्टीने या तिघांना दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानायला सुरुवात केलीये. एवढंच नाही तर सगळ्या नेत्यांना या तिघांच्या माध्यमातूनचं मायावतींशी भेटण्यासाठी वेळ मिळतो.

हे सगळं ठीक आहे, पण मायावतींनी म्हंटल्याप्रमाणं त्यांचा उत्तराधिकारी हा दलित चेहराचं असेल.  आता आकाश मायावतींचे पुतणे आहेत. पण कपिल मिश्रा आणि परेश मिश्रा हे ब्राम्हण चेहरे. मग या नेत्याचं नाव या उत्तराधिकाऱ्यांच्या रेसमध्ये टिकणार ना आकाशच्याचं नावावर शिक्कामोर्तब होणार? असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झालायं.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.