त्यादिवशी स्टेजवर जावून दिलेल उत्तर मायावतींच्या राजकीय प्रवेशाच कारण बनलं.

राज नारायण.  देशातील एकेकाळचा समाजवादी नेत्यांच्या यादीमधील मोठं नाव. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना २ वेळा हरवण्याचा पराक्रम गाजवलेले अशी त्यांची दुसरी ओळख. दोन वेळा कधी हरवलं, तर पहिल्यांदा न्यायालयात, ज्यामुळे आणीबाणी लागू झाली. आणि दुसरे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीमध्ये १९७७ साली. ते ही थोडक्या नाही तर तब्बल ५५ हजार मतांनी.

त्यानंतर आलेल्या मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री बनले. आपल्या वादग्रस्त आणि अतार्किक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले राज नारायण मंत्रीपदी असताना एकदा एका मोठया कॉन्फरन्ससाठी गेले होते. त्यादिवशीच्या भाषणात ते दलितांच्या हिताच्या अनेक गोष्टी बोलले, पण एक चूक केली.

आपल्या भाषणादरम्यान नेहमी प्रमाणे असाचं एक वादग्रस्त शब्द ते सतत बोलत होते. काँग्रेस सदस्यांसारखं ते देखील महात्मा गांधींजी दिलेला ‘हरिजन’ शब्द वापरत राहिले.

समोर एक २२ वर्षांच्या मायावती बसल्या होत्या. त्यावेळी त्या कोणत्याही प्रकारे राजकारणात नव्हत्या. दिल्ली विद्यापीठामधून वकिलीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. त्यांना हा शब्द सहन झाला नाही.

पण जेव्हा त्यांची बोलण्याची वेळ आली तेव्हा मायावतींनी भाषणात राज नारायण, जनता पक्ष आणि काँग्रेस सगळ्यांचेच धिंडवडे काढले. म्हणाल्या, 

गांधींनी आम्हाला बेइज्जत करण्यासाठी हा शब्द बनवला होता. देवाची मुलं म्हणजे हरिजन. जर आम्ही हरिजन असू तर देवदासींच्या मुलांचं काय? आणि त्या मुलांचं काय ज्यांना आपल्या वडिलांच्या मुलांचं नावच माहित नाही. जर शब्दामध्ये बोलायचं म्हंटल तर मग ते देखील हरिजनच झाले ना? 

मायावती एवढ्यावरच थांबल्या नाहीत. म्हणाल्या, आमचा देव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी कधी हरिजन हा शब्द वापरला नाही. अगदी संविधान बनवलं तर लिहिले अनुसूचित जाती.  मग हे सगळे आम्हाला सारखं हरिजन का म्हणतात?

मायावती यांच्या या तुफानी भाषणानंतर तिथे असलेले दलित समाजातील लोक प्रेरित झाले.

राज नारायण मुर्दाबाद, जनता पक्ष मुर्दाबाद अशा घोषणा चालू झाल्या. तिथे उपस्थित असलेले अनेक प्रतिनिधी मायावतींच्या या धाडसाचं कौतुक करण्यासाठी पुढं आले.

त्यामध्येच कांशीराम यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या बामसेफ या संघटनेचे देखील प्रतिनिधी होते. बामसेफ. म्हणजेच बॅकवॉर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज इंप्लाईज फेडरेशन.

काशीराम यांनी संपूर्ण देशात फिरून दलित समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांना संगठीत केलं होत. असाच एक दौरा संपवून ते दिल्लीला परतले. तर त्यांना बामसेफच्या कार्यकर्त्यांनी मायावतींबद्दल आणि घडलेला सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलं.

त्यानंतर कांशीराम न राहून मायावती यांची भेट घ्यायला त्यांच्या इंदर पुरी इथल्या घरी गेले. मायावती आपल्या कुटुंबासमवेत तिथे राहत होत्या. त्यावेळी मायावती वकिलीसोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास देखील करत होत्या. 

घरी पोहचल्यानंतर कांशीराम यांनी मायावतींना प्रश्न केला. आयएएस का बनू इच्छिता?

यावर मायावतींनी दलित समाजाच्या सेवेसाठी आणि उद्धारासाठी असं उत्तर दिलं.

कांशीराम यांनी मायावतींना समजावलं,

अधिकारी तर याआधी देखील बरेच झालेत, पण परिस्थिती कितपत बदलली? नेता बनून सत्तेत या. अधिकाऱ्यांना देखील सत्ताधाऱ्यांचाच ऐकावं लागत.

यानंतरचा इतिहास सगळ्यांसमोर आहे.

मायावती कांशीराम यांच्या सोबत जोडल्या गेल्या. १९८४ मध्ये बहुजन समाजवादी पक्षाची स्थापना झाली. उत्तरप्रदेशमधील कैराना या विधानसभा मतदारसंघातून मायावतींनी निवडणूक लढवली, पण पराभव झाला. पुन्हा १९८५ मध्ये कांशीराम यांनी बिजनौर मधून लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभं केलं, पण पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. मात्र यावेळी मायावतींनी जवळपास १ लाख पेक्षा जास्त मत घेतली.

अखेरीस १९८९ मध्ये मायावती आणि कांशीराम यांनी आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बिजनौरमधून त्यांनी ९ हजार मतांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली.

विशेष म्हणजे तेव्हा उत्तरप्रदेशमध्ये जनता दलाची लाट होती.

यानंतर मायावती, कांशीराम आणि बहुजन समाजवादी पक्षानं मागं वळून बघितलं नाही. राज नारायण यांच्या समोर दिलेलं भाषण आणि तो दिवस मायावतींच आयुष्य कायमच बदलून गेला. पुढे त्यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.