“घर से निकलते ही” वाली हिरोईन सध्या काय करते? ती आता गुगलची हेड आहे !!

नाईनटीज किड्सची एक वेगळीच दुनिया आहे. इथे आपणच शक्तिमान असतो, आपण डीडीएलजेचा शाहरुख आणि आपणच घायलचा सन्नी देओल. सिनेमा आणि त्यातली गाणी आपल्या जीवनात एक खास जागा पटकावून असते. रंगोली छायागीत ने तेवढ काम करून ठेवलं. असच एक गाणं आहे जे प्रत्येक पोराला शाळेत पहिलं प्रेम झाल्यावर फील झाल होतं.

घर से निकलते ही कुछ दूर चलते ही रस्ते में उसका घर

कल सुबह देखा तो बाल बनाती वो खिडकी में आयी नजर

सिनेमा पापा केहते है. दिग्दर्शक महेश भट्ट. जावेद अख्तरने बाप शब्द लिहिलेत. राजेश रोशनने भारी संगीत दिलंय. ह्यातल आपल्याला काहीही ठाऊक नसते. माहिती असते तो फक्त बीचवर गिटार घेऊन पहुडलेला गोड दिसणारा जुगल हंसराज आणि तशीच एखाद्या परी सारखी दिसणारी मयुरी कांगो.

सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात खिडकीत उभं राहून केस विंचरणाऱ्या हिरव्या डोळ्याच्या मयुरी कांगोमध्ये प्रत्येकाने आपल्या क्रशला पाहिलेलं.

पिक्चर कोणी पहिला नाही पण ते गाण त्याकाळच्या प्रत्येक टीनेज मुलामुलीच्या लक्षात आहे. तरी जुगल हंसराज आपल्याला माहिती असतो पण ही मयुरी कांगो कोण होती? ती परत कुठे गायब झाली. हा प्रश्न कधी पडला आहे का?

मयुरी कांगो मुळची औरंगाबादची. तिच प्राथमिक शिक्षण औरंगाबादमध्येच झाल. अकरावी बारावी सुद्धा तिथल्याच देवगिरी कॉलेजमध्ये झाली. आई नाट्यक्षेत्रात होती. त्यामुळे अभिनयाच बाळकडू घरातून मिळाल होतं. बारावीत असताना मयुरी आईसोबत मुंबईला गेली. तेव्हा त्यांची भेट मातब्बर दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झाशी झाली.

मयुरी पाहताच सईदला तिच्यातील टॅलेंट जाणवल. तिला आपल्या  नसीम या सिनेमात एक रोल दिला.

बोर्डाच वर्ष अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल म्हणून मयुरीने हा रोल नाकारला. पण तिच्या आईवडीलानी आग्रह केला. सईद अख्तर मिर्झा म्हणजे समांतर फिल्म इंडस्ट्रीमधील मोठ नाव. अनेक जागतिक स्तरावरचे पुरस्कार त्यांच्या नावावर होते.

सईद मिर्झानी बनवलेल्या सिनेमातून मयुरीच पदापर्ण होणार असेल तर शाळेचा अभ्यास काही काळ बाजूला पडला तरी चालेल अस मयुरीच्या आईने तिला समजावलं.

बाबरी मशीद पाडल्यानंतर सुरु झालेले हिंदू मुसलमान दंगे या संवेदनशील विषयावर बनवलेल्या नसीम या सिनेमाच्या टायटल रोल मध्ये मयुरी होती. या सिनेमाच समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

मयुरीच देखील कौतुक झाल. इतक्या कमी वयात एवढा विलक्षण समजुतीने तो नसीमचा रोल निभावला याबद्दल जेष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी तीच कौतुक केलं.

त्यांनीच तिला पुढचा टीनेज लव्हस्टोरीवाला मसाला सिनेमा ऑफर केला. तोच हा घर से निकलते ही वाला “पापा केहते है.”

घर से निकलते ही मुळे मयुरी घरा घरात पोहचली. तोवर तिची बारावीची परीक्षा होऊन रिझल्ट देखील आला होता. तिची निवड आयआयटी कानपूरमध्ये झाली होती. पण सिनेमाच्या करीयरकडे लक्ष देता यावं म्हणून मयुरीने आर्ट्स निवडल.

विश्वसुंदरी ऐश्वर्या सारख्या दिसणाऱ्या मयुरी कांगोला बरेच सिनेमे ऑफर झाले. पण दुर्दैवाने हे सगळे फ्लॉप झाले. तरी त्यातल्या त्यात चांगला चालला तो म्हणजे होगी प्यार की जीत. तिच्या निरागस चेहऱ्यामुळे तिला कायम कॉलेजकुमारी टीनेज मुलीचेच रोल मिळत होते. यामुळे चांगले लीड रोल मिळालेच नाही. तो पर्यंत ओरिजिनल ऐश्वर्या देखील सिनेमात आली होती.

मयुरी स्पर्धेतून मागे पडली. तिने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला.

डॉलर बहु, कुसुम, किट्टी पार्टी, क्या हादसा क्या हकीकत असे अनेक सिरीयल येऊन गेले. पण अपेक्षित यश मिळाल नाही. याच काळात तीच आदित्य धिल्लो नावाच्या एनआरआयशी लग्न झाल.

लग्नानंतर ती अमेरिकेला शिफ्ट झाली. सिनेमात काम करणे तिने थांबवलं. मात्र घरी बसणेने हा तिचा स्वभाव नव्हता. न्यूयॉर्कच्या एका प्रतिष्ठीत कॉलेजमधून आपल राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. तिथे तिने मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीएची डिग्री घेतली. यानंतर व्यवस्थित कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी पकडली.

अमेरिकेत तुम्ही कोण आहात, तुमचा वशिला काय, तुम्ही किती मोठे सेलिब्रिटी होता याने काहीही फरक पडत नाही. तिथे फक्त तुमची प्रोफेशनल योग्यता पाहिली जाते.

मयुरीने तिथे ३६०i या कंपनीत असोसिएट मिडिया मनेजर म्हणून जॉब सुरु केला. दिवसेंदिवस तिथे प्रगती करत वरच्या पोजिशन जात गेली. मधल्या काळात तीने आपल्या फिल्म इंडस्ट्रीच्या करीयरला पूर्णपणे विसरून टाकलं. आपण भल आपली नोकरी भली.

यच दरम्यान तिला एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर तिने व तिच्या नवऱ्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या सासू सासऱ्यांच्या जवळ गुरगावला ते शिफ्ट झाले. तिथे पर्फोर्मिक्स नावाच्या एका फ्रेंच कंपनीत तिने डायरेक्टरच्या पदावर काम सुरु केल.

एकेकाळी मोठ्या पडद्यावर चमकल्यावर आता कमी ग्लॅॅॅमरस रोलमध्ये लोकांच्या प्रसिद्धीपासून दूर नोकरीच्या आयुष्यात ती खूष होती.

तिथे काही वर्ष काम केल्यावर मयुरीला गुगलच्या भारतीय युनिटची इंडस्ट्रीहेड म्हणून नेमणूक झाली. 

गेल्यावर्षी गुगल सारख्या जगातल्या सर्वोत्तम आयटी कंपनीच्या हेड पदी ती गेल्याची बातमी आल्यावर सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.

आपल्याकडे असा गैरसमज आहे की ज्याला शिक्षणातल काही कळत नाही तो सिनेमात जातो. हिरो हिरोईन हे अॅकेडमिकली मोठी अचिव्हमेंट करू शकतात यावर भारतात तरी कोणाचा विश्वास नव्हता. विशेषतः एखादी हिरोईन मंत्रीपदावर जरी गेली तरी लोक तिला मुर्खात काढण्यासाठी उत्सुक असतात.

मयुरी कांगोने हा गैरसमज मोडून काढला.

आज मयुरी एक वर्किंग मदरची भूमिका निभावत आहे.   बरेच जण तिला कंपनीत भेटतात. त्यांना ती आठवते. स्वतःच्या मेहनती तिने स्वतःच नाव बनवलं आहे. सिनेमात स्ट्रगल करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीला तिचा सल्ला आहे की हे क्षेत्र बेभरवशाच आहे त्यामुळे इथ येणाऱ्याने आपल शिक्षण पूर्ण करून मगच याव.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.