शोले मध्ये त्याला एकच डायलॉग होता पण गब्बरच्या हाकेमूळं त्याला स्टार बनवलं.

त्याच खरं नाव ब्रिजमोहन मकिजानी.

कराचीच्या सिंधी कुटुंबात तो जन्मला. वडीलांच्या ट्रान्सपोर्ट बिझनेसमुळे मोहन च शिक्षण लखनौला झाले. स्वातंत्र्यानंतर त्याचं अख्ख कुटुंब भारतात शिफ्ट झालं. या ब्रिजमोहनचं लहानपणापासून क्रिकेटर होण्याच स्वप्न होतं. खेळायचाही चांगलं. कोणीतरी त्याला सांगितलं की क्रिकेटमध्ये करीयर करायचं आहे तर मुंबईमध्ये जा. तिथे चांगली कोचिंग मिळेल म्हणून मोहन मुंबईला आला.

पण इथल्या कॉलेजमध्ये आल्यावर क्रिकेट राहिलं मागे आणि त्याला मुंबईच्या सिनेमाच्या मायानगरीने मोहून टाकलं.

कॉलेजच्या नाटकात काम करत असताना शबाना आझमींच्या आईने म्हणजे शौकत कैफी यानी त्याला सांगितलं की अभिनयातच करीयर कर. मग मोहनने फिल्मालया नावाच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथून बाहेर पडल्यावर देव आनंद यांचे बंधू दिग्दर्शक चेतन आनंद यांच्याकडे असिस्टंट म्हणून नोकरी सुरु केली.

कॉलेजच्या काळापासून नाटकात छोटेमोठे रोल करतच होता. आता चेतन आनंदच्या सिनेमात सुद्धा अडल्यानडल्या वेळी चेहऱ्यावर मेकअप ओढून उभं राहू लागला. कधी बस मधला प्रवासी कधी तर कधी किडनपरमधला एक गुंड.

अस करता करता त्याला थोडे मोठे रोल मिळू लागले. त्याला ओळख मिळाली अमिताभच्या सिनेमात. 

सत्तरच्या दशकातला तो काळ म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टीतील स्थित्यंतर होतं. खेडोपाड्यातील सिनेमा आता शहरी बनत होता. सिनेमातील व्हिलन हा गावाकडचा ठाकूर नाही तर मुंबईमधला स्मगलिंग करणारा डॉन असायचा. या डॉनच्या अवतीभोवती स्टायलिश सूटबूट घालणारे मधूनच इंग्लिश शब्द वापरणारे साथीदार असायचे. तो पर्यंत मोहन मकीजानीचसुद्धा रुपांतर इंग्लिश मॅक मोहन मध्ये झालेलं. या स्टायलिश गुंडांच्या टोळीत मॅक मोहन सहज खपून गेला.

जंजीर, मजबूर पासून सुरु झालेला हा प्रवास पुढे बराच काळ टिकणार होता.

अशातच एक दिवस बातमी आली की जीपी सिप्पी एक महत्वाकांक्षी सिनेमा बनवत आहेत. यात धर्मेंद्र, अमिताभ, संजीवकुमार, हेमामालिनी, जया भादुरी अशी तगडी स्टार कास्ट होती. सलीम-जावेदनी एक टिपिकल डाकूपट लिहिला होता. शुटींग बेंगलोरजवळच्या एका गावात होणार होतं. खूप मोठ युनिट असणार होतं. मॅकला सुद्धा त्यात रोल मिळाला.

सिनेमाचं नाव होतं शोले!!  

मॅकच्या रोलच नाव होतं सांभा. डाकू गब्बरसिंगच्या टोळीतील एक गुंड. डोंगरात लपलेल्या गब्बरच्या अड्ड्याचा एका महाकाय शिळेवर बसून पहारा देणारा पहारेकरी. रोल चांगला होता, पैसे चांगले होते. सिनेमा हिट होणार खात्री होती म्हणून मॅकने रोल स्वीकारला.

रमेश सिप्पींनी सिनेमा बनवताना कोणतीही तडजोड केली नाही. बेंगलोरमध्ये अडीच वर्षे शुटींग सुरु होतं. तिथले सेट, कलाकारांचा खर्च अस करता करता जवळपास साडेतीन कोटींच बजेट खर्च करून साडे चार तासांचा चित्रपट तयार झाला. त्याकाळी सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढल. एवढा महाप्रचंड खर्च कधीच भरून निघणार नाही. शिवाय चार तास बसून कोण सिनेमा पाहिलं.

शेवटी रमेशजीनां कठोर निर्णय घ्यावा लागला. एडिटिंगच्या कात्रीला धार देणे. एडिटरनी कट करून सिनेमा साडेतीन तासावर आणला. त्यात सेन्सॉरबोर्डाने आणखी कट सुचवले. असे करता करता सिनेमा १९८ मिनिटाचा बनला.

रमेश सिप्पींचे प्रोड्युसर वडील खुश झाले, डिस्ट्रीब्यूटर्स खुश झाले. फक्त एकच माणूस नाराज होता, तो म्हणजे मॅकमोहन  

मॅकचा सांभाचा मूळ रोल तसा मोठा होता. पण आता तो फक्त एका डायलॉग पुरता उरला.  मॅकमोहनने रमेश सिप्पींच्या सोबत भांडण काढले की माझा पूर्ण रोल कापून टाका.रमेश सिप्पी त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाले,

 “ मॅक, जितना मै काट सकता था, मैने काटा. जितना सेंन्साॅर काट सकता था, सेंन्साॅरने काटा. अब कुछ नही हो सकता. मगर एक बात जान लो अग्र ये फिल्म चली तो लोग तुम्हारा नाम कभीभी नही भूलेंगे ”

शोले रिलीज झाला. काही कारणांनी तो सुरवातीला चालला नाही. मॅकमोहननेसुद्धा रागाच्या भरात “शोले” पाहिला नाही.

पण एक दिवस तो रस्त्यातून जात असताना लोक थांबून “सांभा” म्हणून हाका मारू लागले तेंव्हा त्याला आश्चर्य वाटले. हे कसे काय घडले ?

एके दिवशी शोले रिलीज झालेल्या  मिनर्व्हा थिएटरच्या संध्याकाळच्या ६ च्या शोला आपल्या बायका पोरांना घेऊन गेला. इंटर्व्हलमध्ये प्रेक्षकांनी त्याला घेराव घातला. “सांभा सांभा “ च्या आरोळ्यांनी थिएटर दणाणून गेल. गोंधळ तर इतका वाढला की पोलिसांना बोलवून मॅकमोहनची फन्सच्या गर्दीतून सुटका करण्यात आली.

रमेश सिप्पींचे शब्द खरे ठरले. मॅकमोहन ने हिंदी, इंग्लिश, स्पनिश, मराठी, कन्नड, तामिळ अशा शेकडो सिनेमात काम केले. यातले बरेच सिनेमे सुपरहिट झाले. पण इतक्यावर्षानी देखील त्याची प्रेक्षकांसाठीची ओळख सांभा अशीच राहिली.

मॅकमोहनच्या या यशात गब्बरसिंगचा सिंहाचा वाटा आहे. त्यानेच आपल्या खास शैलीत संपूर्ण सिनेमात अरे ओ सांभाची जी हाक दिलेली आहे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. गब्बरच्या हाकेला सांभा एकदाच ओ देतो आणि आपला एकमेव डायलॉग म्हणतो,

“पुरे पचास हज्जार”

संपूर्ण जगभरात मॅकमोहनचा सांभा हे एकमेव पात्र असेल जे फक्त तीन शब्दांच्या डायलॉगनी अजरामर झाले. एकेकाळचा ब्रिजमोहन सिनेमातला मॅकमोहन घराघरात सांभा म्हणूनच फेमस राहिला. 

काही वर्षांपूर्वी झोया अख्तरच्या लक बाय चान्स मध्ये मॅक शेवटचा दिसला. त्या सिनेमात तो स्वतःच्याच भूमिकेतच होता. एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये तो पाहुणा म्हणून गेलेला असतो. तिथे भाषण देतो की रोल केवढाही असो आपल्या मेहनतीने तो प्रेक्षकांच्या मनात घर करता येते वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर शोलेचा डायलॉग देखील म्हणतो, पुरे पचास हजार.

ते त्याचे सिनेमास्क्रीनवरचे शेवटचे शब्द ठरले. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.