बंदुक, पिस्तुल माहितीय पण बोअर, कॅलिबर आणि एमएम म्हणजे काय रे भिडू?

आमच्या गल्लीत एक चंद्या म्हणून आमचं एक मित्र आहे. दहावीत दोन वेळा नापास झाल्यावर त्याच्या बापानं त्याची शाळा सोडवली आणि आपल्या पेढीवर कामाला लावलं.

तसं आमचं चंद्या आहे डेड पसली पण बाता लई मोठ्या मोठ्या मारत. म्हणजे पलीकडच्या चाळीतल्या फायटर नाना पासून ते कराचीत लपलेल्या दाउद इब्राहीमच्या सगळ्या स्टोऱ्या त्याला माहित असतात. थोडी ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही त्याच्याकडे अधूनमधून आशीर्वाद घेत असतो.

बऱ्याचदा आपण बातम्यांमध्ये ३२ बोअरची पिस्तुल किंवा ३२ कॅलिबर बोअरची पिस्तुल जप्त करण्यात आली असा नेहमीच उल्लेख वाचतो. जेव्हा जेव्हा बंदुक किंवा पिस्तुलचा वापर किंवा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा बोअर, एमएम आणि कॅलिबर शब्द असतातच पण आपल्याला त्याचा अर्थ काही माहित नसतो.

आता खास अंडरवर्ल्डच्या खबरी असणाऱ्या आणि कालीगंगा रोज वाचणाऱ्या चंद्याकडे या शब्दांची इत्यंभूत माहिती असणार हे भिडूला ठाऊक होतं. एकदिवस त्याच्या पेढीवर एक खास बनवलेला मसाला पान घेऊन त्याच्या भेटीला गेलो. पान बघितल्यावर गडी खुश झाला आणि एखाद्या ओलंपिक गोल्डमेडलीस्ट नेमबाजांप्रमाणे एक एक गोष्ट उलगडून सांगू लागला.

चंद्या म्हणाला बंदुकीचं ज्ञान मिळवण्यासाठी सगळ्यात पहिला बोअर म्हणजे काय हे कळायला पाहिजे.

कुठल्या ही पोकळ पाईपच्या “आतल्या” डायमीटरला बोअर असे म्हणतात. दहावी नापास चंद्या इंजिनियरिंग करून स्पर्धापरीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या या भिडूला डायमीटर म्हणजे सांगत होता.

कुठल्याही पोकळ पाइपला नेहमी दोन डायमीटर असतात एक आतला आणि एक बाहेरचा म्हणजेच जर ती पाईप खूपच पातळ असेल तर त्याचा आतला आणि बाहेरचा डायमीटर बऱ्यापैकी सारखा असतो. तेच जर ही पाईप जड असेल तर बराच फरक दिसून येतो.

हे फक्त बंदुक किंवा पिस्तुलच्या नळी पुरत मर्यादित नसून कुठल्या ही सिलेंड्रीकल आकाराच्या वस्तू बाबत हे लागू होते. म्हणूनच आपण पाण्यासाठी जो बोअर मारतो त्याच्या पाण्याला देखील बोरिंगचे पाणी असेच आपण म्हणतो. पिस्तुल, बंदूकच नव्हे तर तोफेच्या आतल्या डायमीटरला देखील बोअर असेच म्हणतात.

चंद्या आता एकदम रंगात आला होता. त्याला आता बंदुकीची तंद्री लागली होती.

“आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कि हा पिस्तुलचा आतला डायमिटरच इतका महत्वाचा का आहे? तर याच कारण अगदी सोपं आहे. कुठल्या बंदुकीत किती जाडीची गोळी बसू शकते हे यावरूनच ठरते कारण जितके मोठे बोअर, तितकीच मोठी गोळी. म्हणूनच हे बोअर म्हणजेच बंदुकीच्या नळीचा आतला डायमीटर महत्वाचा आहे. “

चंद्या ने आता कॅलीबर म्हणजे काय? असा प्रश्न मला विचारला. आपलं तेवढ कॅलीबर नव्हत. त्याला म्हटलं तूच सांग.

कुठल्या ही बंदुकीचा बोअर मोजण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे कॅलीबर आणि दुसरी मिलीमीटर. तर यात एक रोमांचक गोष्ट आहे ती म्हणजे जितका एकाद्या बंदुकीच्या बोअरचा व्यास असेल तितकाच त्या बंदुकीच्या गोळीच्या बाहेरच्या भागाचा व्यास असतो.

इंच आणि कॅलिबर मध्ये काहीच फरक नसतो, या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. म्हणजेच एक इंच आणि एक कैलीबर एकसारखे असतात, म्हणजे आपण जे बातमीत ३० कॅलिबर वाचतो त्याचाच अर्थ ३० इंच असा ही होतो.

44 स्पेशल किंवा 38 मॅग्नम,अशा नावाच्या बंदुकी देखील आहेत यात कॅलिबर शब्द सायलेंट ठेवण्यात आला आहे. यात अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे सुरवातीला बंदुक बनवताना आतले डायमीटर न मोजता बाहेरचे मोजले गेले होते. त्यामुळेच 38 कॅलिबर पिस्तुलचा बोअर ०.३८  इंच नसून ०.३५७  इंच असतो. अशा काही गोष्टींमुळे फक्त नावावरून बंदुकीचा अंदाज लावता येत नाही त्यासाठी त्या बंदुकीचे मॅन्यूअल वाचावेच लागते.

बापरे म्हणजे चंद्यान बंदुकीच मॅन्यूअलदेखील वाचलेलं की काय? त्याच्या बद्दलचा रीस्पेक्ट वाढला.

चंद्या म्हणाला उसके बाद आता है मिलीमीटर.

बंदुकीची गाडी विनाकारण हिंदीवर घसरू पाहत होती. त्याला मराठीवर आणला.

“आता दुसरे एक साधन मोजण्यासाठी वापरले जाते ते म्हणजे एमएम अर्थात मिलिमीटर. तर यावरून तु एक अंदाज लावू शकतोस तो म्हणजे जर एखाद्या बंदुकीचा बोअर जर ५.५६मिलीमीटर असेल तर याचा अर्थ त्या बंदुकीच्या नळीचे आतले माप देखील ५.५६ मिलीमीटरचीच असते आणि त्यात उपयोग केल्या जाणऱ्या गोळीचा व्यास देखील ५.५६ इतकाच असतो.”

चंदूचं नॉलेज ऐकून सर्वात आधी तर मला त्याचा रिस्पेक्ट वाटला. तेवढ्यात त्याच्या बापाने त्याला मारवाडी भाषेत एक खणखणीत शिवी देऊन हिशोबात घातलेला घोळ सुधारायला बोलावलं. त्याचा बाप म्हणाला,

“लेकाहो सुधरा. खेळण्यातल्या बंदुकीचा आवाज ऐकून चड्डी ओली करता आणि बसून बंदुकीच्या बोअर कॅलीबरचं कसलं मोजमाप काढता? “

बरोबरचं आहे म्हणा त्यांचं!!

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.