कोरोनाच्या लढाईत सर्वात महत्वाचा ठरलेला ‘मेडिकल ऑक्सिजन’ नेमका कसा तयार करतात?

देशात कोरोनानं पुन्हा एकदा पाय पसरवले आहेत. काल सर्वोच्च अशी २ लाख पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. राज्या -राज्यांमधून देखील घाबरवून टाकणारे आकडे समोर येतायतं. त्यातचं कुठे बेडसाठी वेटिंग, रेमडिसीवरचा तुटवडा तर कुठे ऑक्सिजनची कमतरता.

रुग्णाच्या जीवासाठी सगळ्यात महत्वाच्या असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय म्हणून सध्या राज्यात हवेतुन ऑक्सिजन घेवून तो रुग्णापर्यंत पोहचवण्याच्या प्रयोगाच्या चर्चा आहेत. मात्र त्याआधी आजपर्यंत हा मेडिकल ऑक्सिजन रुग्णापर्यंत कसा पोहचतो हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. त्यासाठी देखील एक मोठी प्रक्रिया आहे आणि ती अनेकांना माहित नसते.

नाकावर ऑक्सिजनच्या पाईप लागल्यावर अनेकदा सोबत असलेल्या माणसाच्या डोक्यात विचार येतोच की हा ऑक्सिजन नेमका कसा तयार करतं असतील? तो कुठून येत असेल? तर या सगळ्यांची माहिती सांगणाराच हा लेख.

तसं तर ऑक्सिजन हवा आणि पाणी या दोन्ही घटकांमध्ये उपलब्ध असतो. हवेत १०० टक्के पैकी २१ टक्के ऑक्सिजन आणि ७८ टक्के नायट्रोजन असतो. तर १ टक्के हायड्रोजन, नियोन, कार्बन डायऑक्साईड असतो. तर पाण्यात असलेल्या ऑक्सिजनची मात्रा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. १० लाख मॉलिक्युलमधील ऑक्सिजनचे फक्त १० मॉलिक्युल असतात. त्यामुळेच पाण्यात मनुष्याला श्वास घ्यायला येत नाही.

तर मेडिकल ऑक्सिजन बनवण्याच्या सगळ्यात पहिल्या टप्यात प्लांटमध्ये हवेतुन वर सांगितलेल्या सगळ्या गॅसमधून ऑक्सिजन बाजूला काढला जातो. त्यासाठी एअर सेप्रेशपन तंत्रज्ञानाचा वापर करतात. म्हणजे काय तर हवेला कॉंप्रेस केलं जातं, आणि फिल्टर करुन त्यातील नको असलेले घटक काढून टाकले जातात. पुढे या फिल्टर झालेल्या हवेला थंड केलं जातं.

यानंतर त्या हवेला डिस्टिलं केलं जातं. त्यामुळे ऑक्सिजन बाकी गॅसपासून वेगळं होतं आणि याच प्रक्रियेदरम्यान ऑक्सिजनच लिक्विडमध्ये परिवर्तन होतं आणि त्याला एकत्र केलं करतात.

आजकाल ऑक्सिजन बनवण्याची अजून एक पद्धत आली आहे. यात एक पोर्टेबल मशिन येतं. ज्याला रुग्णाजवळ ठेवलं जातं. ही मशिन हवेतुन ऑक्सिजन वेगळं करुन रुग्णापर्यंत पोहचवतं.

तर या लिक्विड ऑक्सिजनला मोठ्या कॅप्सुलसारख्या टँकमध्ये भरुन हॉस्पिटलपर्यंत पोहचवलं जातं. आणि हॉस्पिटलमधील पाईपद्वारे त्याला रुग्णांपर्यंत पोहचवलं जातं. पण सगळ्याचं ठिकाणी या पाईपची व्यवस्था नसते. त्यावर उपाय म्हणून वापरले जातात ऑक्सिजनचे सिलेंडर. या सिलेंडर्समध्ये ऑक्सिजन भरलं जातं आणि ते थेट रुग्णाच्या बेडजवळ पोहोचवलं जातं.

बरेचदा हे सिलेंडर हॉस्पिटल्सचे स्वतःचे असतात. पण जे हॉस्पिटल्स लहान असतात ते असे ऑक्सिजन सिलेंडर भाड्याने घेतात. कारण एक तर त्यांची मागणी देखील कमी असते आणि हे मोकळे लोखंडी सिलेंडर महाग देखील असतात. भारतात खूपच कमी कंपन्या अश्या सिलेंडरचं उत्पादन करतात. गुजरात मधील रामा नावाची कंपनी सर्वात मोठी सिलेंडर बनवणारी कंपनी आहे.

त्यामुळेच असे ऑक्सिजन सिलेंडर भरुन तो हॉस्पिटलला विकणारे देखील व्यापारी आहेत. या एका सिलेंडरचा व्हॉल्युम असतो ७ क्युबिक मीटर आणि प्रेशर असतं १४० किलो. याची साधारण किंमत असते ३०० रुपये. यावर जीएसटी आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वेगळाच.

दि. प्रिंटच्या एका रिपोर्टनुसार भारतात मेडिकल ऑक्सिजनच्या १० ते १२ मोठ्या कंपन्या आहेत. आणि ५०० पेक्षा जास्त छोटे गॅस प्लांट कार्यरत आहेत. कोरोना काळात यामध्ये लक्षणीय वाढ झाली होती. गुजरातची आयनॉक्स एयर प्रोडक्ट्स भारतात मेडिकल ऑक्सिजन बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. यानंतर दिल्ली स्थित गोयल एमजी गॅसेस, कोलकत्याचे लिंडे इंडिया आणि चेन्नईमधील नॅशनल ऑक्सिजन लिमिटेड अश्या कंपन्यांची नावं आहेत.

भारतात दररोज मेडिकल ऑक्सिजनची सर्वसाधारण मागणी ही जवळपास २ हजार मेट्रिक टन इतकी आहे. तर याची उत्पादन क्षमता ६ हजार ४०० मेट्रिक टन. त्यामुळे याचा उपयोग अन्य उद्योगांमध्ये देखील केला जातो. मात्र कोरोना काळात मागणी वाढल्यामुळे अन्य उद्योगांना पुरवला जाणारा ऑक्सिजन बंद करत तो केवळ रुग्णांसाठी राखीव ठेवला आहे. सोबतच अनेक नवीन प्लांट उभे केले जातं आहेत.

याकाळात वाढत्या किंमती लक्षात घेत सरकारनं ऑक्सिजन प्राईज कॅपिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सप्टेंबर २०२१ पर्यंत कंपन्या निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने तो विकू शकतं नाहीत.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइजिंग अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची एक्स फॅक्टरी किंमत १५.२२ रुपये क्युबिक मीटर प्रमाणे ठरवली आहे. विक्रेत्याला या किंमतीपेक्षा एक पैसा सुद्धा जास्त दराने विक्री करता येत नाही. मात्र त्यावरचा जीएसटी वेगळा द्यावा लागतं असल्यामुळे दर आपोआपचं वाढतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.