1938 साली पिक्चरमध्ये स्विमसूट वापरायचं धाडस एका मराठी हिरोईनने दाखवलं होतं

जगाच्या पाठीवर काही सुंदर शोध लागले असतील तर त्यात या बिकिनीचा वरच्या क्रमांकावर नंबर लागतो. यावर कित्येक जणांना कवी कल्पना सुचल्या, किती जणांची झोप उडवली, किती जणांना वेडं केलं याची तुलना नाही.

जगातली सर्वात मादक गोष्ट काही असेल तर ती म्हणजे बिकिनी!

बिकिनीचा शोधच एक रोमँटिक कल्पना वाटते. खरं तर अशा प्रकारचे वस्त्र हजारो वर्षांपासून वापरलं जात याचे पुरावे सापडतात. आपल्या इथे खजुराहो सारख्या मंदिरावर मुर्त्या अशीच कंचुकी वगैरे वापरलेल्या दिसतात.

पण मधल्या काळात जग खूप मागे गेलं. जास्तीत जास्त कपडे वापरणे म्हणजे सभ्य अशी व्याख्या बनत गेली. यातून सौन्दर्य दृष्टी कमी होत गेली.

स्विमसूट आणि बिकनी. खरं तर महिला वर्गासाठी पोहण्याच्यासाठीची सोय. पण जर्मनी असो कि परभणी जगाच्या कानाकोपऱ्यात जा तुम्ही किती पण सत्यवानाचे अवतार असा पुरुष असा किंवा स्त्री असा बिकिनीच दर्शन झालं की हृदयाचा एक ठोका तरी चुकतोच.

पिक्चरमध्येच नाही तर रियल लाईफमध्ये आता हे सगळ कॉमन झालय. पण स्क्रीनवर बिकिनी दिसली कि हॉलिवूड मधले मातापिता देखील आपल्या पोरांच्या बाळ मनावर विपरीत संस्कार होऊ नयेत म्हणून चॅनेल बदलतात. मग बॉलिवूडची गोष्टच लांब राहिली.

अजून पण एखाद्या नटीने इंस्टाग्रामवर बिकिनीवाला फोटो टाकला तर आपली मीडिया झपाटल्यासारखं त्यावर चार दिवस बातम्या टाकत राहतात. आपण पण शिव्या घालतो आणि क्लिक करून करून वाचत राहतो.

अहो आपल्या लाडक्या सईने पुण्यामध्ये थोडासा बोल्ड टाईपचा ड्रेस परिधान केला तर आमच्या कोथरुडकरांनी ती बिकिनीवर रस्त्यावर आली म्हणून गजहब केला. तिच्या नावाने बोटे मोडली, चेष्टा केली.

एकूण काय एकविसाव्या शतकाच्या एकविसाव्या वर्षी देखील बिकिनी, स्वीमसूटचं फॅड, त्या बद्दलचे टॅबू कमी होताना दिसत नाहीत. असं असताना एक वांड नटी या भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये होऊन गेली ज्यांनी जवळपास ९० वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर स्विम सूट मध्ये अवतरल्या होत्या. विशेष म्हणजे त्या मराठी होत्या. एका मध्यमवर्गीय कुटूंबातल्या होत्या.

त्या अभिनेत्रीच नाव मीनाक्षी शिरोडकर, साल होतं १९३८, सिनेमाचं नाव ब्रम्हचारी

११ ऑक्टोबर १९१६ ला गोव्यातील पेडणेकर या कोकणी कुटुंबात मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव रतन असं होतं. सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटूंब. लहान वयातच मीनाक्षी यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांना नृत्याची देखील खूप आवड होती.

१९३५ मध्ये मीनाक्षीने ऑल इंडिया रेडियोच्या रेडीओ नाटकात काम करायला सुरुवात केली.  त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांचं लग्न झालं.  १९३६ मध्ये त्यांचं डॉ.शिरोडकर यांच्याशी लग्न झाले. रेडिओवर चांगलंच नाव झाल्यामुळे मीनाक्षी यांना सिनेमासाठीच्या देखील ऑफर येऊ लागल्या.

पांडुरंग नायकांनी तिला चित्रपटात काम करण्याची विचारलं होतं. मीनाक्षीने आधी नकार दिला होता, पण नंतर आपल्या नवऱ्याच्या म्हणण्यावरून ती तयार झाली.

तिने मराठी चित्रपट, मराठी रंगमंचावरून सिनेमा क्षेत्रात पाउल ठेवलं. १९३६ साली मीनाक्षीने नुकताच सिनेमात एन्ट्री केली होती. तिचा पहिला मराठी चित्रपट होता ब्रम्हचारी. या चित्रपटाचे लेखक प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे होते. अत्रे हौशी होते आणि बिन्दास्त वागायचे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका म्हणून हा सिनेमा बनवला होता.

त्यासाठी काळजीपूर्वक त्यांनी स्टारकास्ट निवडली होती. रतन पेडणेकर-शिरोडकरच्या मोठ्या डोळ्यांना सूट होईल “मीनाक्षी” नाव ठेवलं.  

मास्टर विनायक या सिनेमाचे हिरो होते. स्टोरी थोडक्यात सांगायचं म्हणजे औदुंबर हा एक तरुण आणि सामान्य युवक असतो. एक दिवस तो देशभक्त जटाशंकर यांनी दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी जातो. जटाशंकर आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्व, शिस्त आणि ब्रह्मचर्य याचे महत्त्व विशारद करतात. या भाषणा वरून औदुंबर प्रेरित होऊन आचार्य चंडीराम यांच्या संघटनेत सहभागी होतो. तो आपल्या लैंगिक वासनांचा त्याग करतो आणि चित्रपट कलाकारांच्या पोस्टर्स आपल्या घरातून काढून टाकतो.

दरम्यान तो किशोरी नावाच्या एका युवतीशी त्याचा संपर्क होतो आणि येथेच त्याच्या ब्रह्मचर्याची सत्त्वपरीक्षा घडते. किशोरी औदुंबरला अनेकदा मोहात पाडते पण औदुंबर तिचा मोह बाजूला सारून स्वतःला सांभाळतो. 

किशोरी म्हणजे आपल्या मीनाक्षी शिरोडकर या औदूंबर उर्फ मास्टर विनायक यांना मोहात पाडण्यासाठी पडद्यावर साकारलेलं गाणं म्हणजे यमुना जळी खेळू खेळ वसंता. यात एका तळ्यात नाजूक मीनाक्षी शिरोडकर स्विमिंग कॉच्युम घालून उतरतात. आणि आपले संघशक्ती युगे युगे म्हणणारे मा.विनायक ब्रम्हचर्य सांभाळण्याचा प्रयत्न करत असता.

हे गाणं आणि तो सिन त्याकाळी तुफान गाजला. लोकांनी मीनाक्षी शिरोडकर यांच्यावर टीका देखील केली. पण आचार्य अत्रे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. मीनाक्षी शिरोडकर थोड्याच दिवसात फेमस झाल्या.

अनेकांना या क्षेत्रात नाव कमवायला वर्षानुवर्षे  वाट बघायला लागते, पण मीनाक्षी कमी वेळातच स्टार  बनली होती. मराठी बरोबरचं बॉलीवूडमध्येही तिनं आपली छाप  सोडली. देवता, झूला, जवानी, संगम, अमानत,  मुजरिम आणि पाकिजा अश्या कित्येक चित्रपटांत तिने जबरदस्त अभिनय केला. आपल्या पहिल्या चित्रपटाचे अभिनेते मास्टर विनायक यांच्या सोबतच मीनाक्षीने ब्रान्डीची बाटली (१९३९), घर कि राणी (१९४०), अमृत (१९४१ ), आणि मजे बाल (१९४३) काम केले.

चित्रपटांबरोबर मीनाक्षी थिएटर सुद्धा करायची. १९५० मध्ये मुख्य भूमिकांतनं रिटायड झाल्यानंतर ती नाटकाकड वळाली आणि नूतन संगीत नाटक मंडळीशी जोडली गेली. १९५० ते ७५  या दरम्यान मीनाक्षीने संगीत नाटकाबरोबरचं  मृच्छकटिक, मानपमान, संशयकॉल, सौभद्र अशा एकापेक्षा एक नाटकात काम करून  आपल्या  अभिनयाने चाहत्यांना वेड लावल.

३ जून १९९७ साली मीनाक्षी शिरोडकर यांचा मृत्यू झाला. मीनाक्षी नंतर त्यांच्या दोन्ही नाती नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर बॉलीवूड स्टार आहेत. दोघींनी चित्रपटश्रुष्टीत  आपल्या आजीसारखं नाव कमवल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.