फक्त ६ हजार रुपयांत तयार झाली होती पहिली मराठी कार

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार १९७५ साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती.

ही कार ‘मीरा’ या नावाने ओळखली जात असे आणि ती कार बनवली होती एका मराठी माणसाने.

इचलकरंजीच्या शंकरराव कुलकर्णी यांनी. 

shankarraos 1971 final
मीरा कार सोबत शंकरराव कुलकर्णी

विसाव्या शतकाच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच नवीन औद्योगिक गोष्टींना सुरवात झाली होती. अशाच एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शंकरराव कुलकर्णींचा जन्म झाला. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी कागदोपत्री शिक्षणाला आठवीत असताना रामराम ठोकला आणि वय वर्ष १६-१७ असताना किर्लोस्करवाडीची वाट धरली.

ज्या वयात मुलं शिकत,खेळत असतात अशा वयात किर्लोस्करसमूहात शंकर कुलकर्णी पॅटर्नमेकर म्हणून काम करू लागले. त्याचबरोबर तिथे सिलेंडरहेड बनवण्याचे तंत्र शिकून घेतले. किर्लोस्करमध्ये त्यांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. शिवाय कामाचा मोबदला म्हणून अठरा रुपये महिना  मिळत होते.

तिथे काम केल्यावर पाच वर्षांनी परत ते इचलकरंजीला परत आले आणि किर्लोस्करवाडीला केलेल्या कामाच्या जोरावर स्वतःची

कुल्को इंजिनीरिंग वर्क्स’ ही कंपनी सुरु केली.

इचलकरंजीचे संस्थानिक घोरपडे सरकार यांच्या कानावर या उद्योगी तरुणाची कीर्ती पडली. त्याने पंचगंगा नदीवर गावाला पाणी सप्लाय करणाऱ्या जॅकवेलची मोटर दुरुस्त करून दाखवली होती.

याचं बक्षीस म्हणून कुल्को इंजिनिअरिंगला संस्थान तर्फे 6000 स्क्वेअरफूट जागा बक्षीस देण्यात आली.

कुल्को स्थापन झाल्यावर व्यवसायामध्ये शंकररावांना हळूहळू यश मिळत गेले. व्यवसाय वाढीसाठी आणि इतर अभियांत्रिकीची माहिती घेण्यासाठी परदेश दौरे करायला सुरवात केली.

1949 साली जर्मनी मध्ये युरोपचे मोठे ऑटोमोबाईलचे प्रदर्शन भरले होते

तिथे विविध चार चाकी गाड्या शंकररावांना पाहायला मिळाल्या. त्यात त्यांना ‘बी.एम.डब्लू-६००’ आणि ‘गोगोमोबिल’ ह्या २ गाड्या खूप आवडल्या होत्या.
भारतात परतल्यावर त्यांंच्या डोक्यात एखादी भारतीय बनावटीची कार तयार करावी असा विचार आला.

नुकताच आपला देश स्वतंत्र झाला होता. भारतात तयार केलेली एकही कार बाजारात नव्हती. १९५०-५१ च्या आसपास शंकरराव आणि त्यांचे काही सहकारी कामानिमित्त गोव्याला गेले होते. गोव्यात त्यांनी ‘माझदा’ कार विकत घेतली आणि ते कार घेऊन इचलकरंजीला निघाले.

माझदा कार पाहून ते एवढे प्रभावित झाले की लगेचच त्यांनी हचबॅककार च्या कल्पना कागदावर उतरवायला सुरवात केली.

माझदा टू सीटर गाडी होती आणि त्याचे इंजिन ‘एअर कुलिंग’ वर चालणारे होते. शंकरराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘फोर सीटर’ असलेली आणि इंजिन ‘वाटर कुलिंग’ वर असलेली गाडी तयार करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी गाडीचे डिझाईन कागदावर उतरवले.

कारचे पहिले प्रोटो-टाईप मॉडेल पाईप आणि पत्र्यांचा वापर करून बनवण्यात आले होते. पहिल्या प्रोटो-टाईप नंतर शंकरराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कार कशी असेल ह्याची संकल्पना पुरेपूर आली.

कारच्या निर्मितीसाठी सीएट टायर्स मधून टायरचा सप्लाय आला. ओगले ग्लास्वर्क्स मधून काचांचा सप्लाय आला. लुकास मधून इलेक्ट्रिक वस्तूंचा सप्लाय झाला.

बाकी इतर सर्व पार्ट इचलकरंजीला बनवले गेले होते. गाडीला भारतात सर्वात प्रथम रबर सस्पेन्शन लावण्यात आले होते.

कार बनवत असताना त्यात crank आणि इंजिनला लागणारे जे काही अवघड पार्ट होते ते सर्व कुल्को मध्ये शंकरराव आणि त्यांच्या टीमनी इचलकरंजीमध्येच लेथ आणि पारंपारिक मशिनच्या मदतीने तयार केले होते.

यात एकही इंजिनियर नव्हता. सर्वजण सातवी पर्यंत शिकलेले होते.

गाडी बनवत असताना पहिल्या तीन ट्रायल मध्ये थोड्या अडचणी आल्या होत्या.मात्र त्यातून मार्ग काढत नंतर त्यांना अडचण जाणवली नाही.

अवघ्या 6 हजार रुपयांमध्ये ही कार तयार झाली.

पहिल्या गाडीचे R.T.O पासिंग झाले आणि त्याला नंबर मिळाला MHK1906.

गाडीला काय नाव द्यावे ह्या विचारात शंकरराव होते.१९६५ ला त्यांना पहिली नात झाली आणि त्यांना गाडीला काय नाव द्यावे ह्याचे उत्तर मिळाले.

आपल्या नातीच्या नावाने त्यांनी गाडीचे बारसे केले ‘मीरा’.

IMG 20170516 165902499 scaled

मीराकार ची तांत्रिक माहिती:-

१.१८-२० KM Average.
२.भारतातले पहिले रबर सस्पेन्शन ज्याचा उपयोग चाकांचे आयुष्य वाढवण्यासाठी होतो.
३. ५ सिटर आणि सिंगल वायपर. रेअर इंजिन आणि थ्री डोअर.
४.तासाला वेगाची मर्यादा:- 60-80 KMPH.

इचलकरंजीच्या रस्त्यावर तर शंकरराव कार केव्हापासूनच चालवत होते, परंतु व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथं ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती.

brocher

मीरा कार मध्ये शंतनूराव किर्लोस्कर,शंकरराव चव्हाण, मोहन धारिया अशा प्रतिष्ठीत लोकांनी प्रवास देखील केला होता.

कारच्या मास-प्रोडक्शन साठी जयसिंगपूर नगरपालिकेने शंकररावांना जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना महाराष्ट्र सरकारची परवानगी देखील मिळाली होती.पण त्यांना केंद्रातून परवानगी नाकारण्यात आली

शिवाय त्याच काळात सुजुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरु करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना केंद्र सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली.

संजय गांधींच्या मारुतीला स्पर्धा नको म्हणून हे घडलं अस अनेकांचं मत आहे.

त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. अनेक आर्थिक अडचणींना देखील शंकररावांना सामोरं जावं लागलं.

Appa12

त्यावेळी जर शंकररावांना केंद्र सरकारची परवानगी मिळाली असती तर एका मराठी मोटार कंपनीने भारतावर राज्य केलं असतं.

कोल्हापूर-इचलकरंजीचा पूर्ण पट्टा ऑटो-हब म्हणून एव्हाना कधीच विकसित होऊन जगाच्या नकाशावर आला असता.

शंकररावांनी इचलकरंजी शहरात इंजिनीरिंग क्षेत्रात केलेली पायाभरणी अजिबात वाया गेली नाही. आज इचलकरंजीमधून जगात आणि भारतात टू-व्हीलरच्या आणि फोर व्हीलरच्या इंजिन साठी लागणारे काही महत्वाचे पार्ट तयार करून पाठवला जातो.

शंकरराव कुलकर्णी ह्यांच्या नावाने ‘इचलकरंजी इंजिनीरिंग असोसिएशन’ ही नवीन संस्था इचलकरंजी शहरात २०१६ला स्थापन झाली आहे. तिथे अभियांत्रिकी व्यवसायासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन केले जाते.

  • भिडू कौशिक श्रोत्री – 9921455453

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.