अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी तिच्या ताटातील एक कण उचलला आणि म्हणाले,” पदक हीच मुलगी जिंकणार “

इंफाळपासून शेकडो मैल दूर नोंगपोक काकचींग गाव आहे. त्या गावातील एक दहा वर्षाची चुणचुणीत मुलगी आपल्या मोठ्या भावासोबत लाकडे गोळा करण्यासाठी जायची. सहा भावंडांमध्ये ती सर्वात लहान. तर भाऊ तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. त्यांने लाकडाची मोळी बांधली पण त्याला ती उचलता आली नाही.

मदतीस आजूबाजूला कोणीही नव्हतं. भावाची झालेली घालमेल त्या छोट्या बहिणीच्या लक्षात आली. लाकडाची मोळी तिने मात्र सहज उचलली. भावालाही आश्चर्य वाटले. घरापर्यंतचे दोन किलोमीटर अंतर तिने सहज पार केले.

संपूर्ण गावात या गोष्टीची चर्चा झाली.

तिची आई म्हणाली, आज आपल्याकडे बैलगाडी असती तर तुला लाकडे वाहण्याचे कष्ट पडले नसते. त्या बैलगाडीने तिच्या डोक्यात घर केले. तिने आईला विचारले किती रुपयांचे असते बैलगाडी? प्रचंड गरिबीत जगणार्‍या त्या कुटुंबाच्या प्रमुखांनी सांगितले, 

आपण आयुष्यभर मेहनत केली तरी एवढे पैसे उभे करता येणार नाहीत. 

मग मात्र त्या छोट्या मुलीने निर्धारच केला, आपल्या आयुष्यभराचा ध्येयचं ठेवलं की एक बैलगाडी घ्यायची.

गावातल्या काही शहाण्या लोकांनी तिला वेटलिफ्टिंग हा वजन उचलण्याचा क्रीडा प्रकार आत्मसात करण्यास सांगितले. पण गावात वेटलिफ्टिंग सरावाची सोय नव्हती वेटलिफ्टिंगची लांबलचक सळी घेण्याची ऐपत नव्हती, तर तर इतर आयुध कुठून येणार? आयुध आणल्यानंतर चांगला खुराक कोण देणार? प्रश्न फक्त वाढत होते.

तिच्या गावापासून ६० किलोमीटर अंतरावर होतं खुमन लंपक स्पोर्टस कॉंपलेक्स होतं. तिथे वेटलिफ्टिंग सरावाची सोय होती. डोक्यात बैलगाडी होती. रोज साठ किलोमीटरच अंतर ती रेल्वेने पार करायची. एक दिवस परतीच्या रेल्वेगाडीला फार उशीर झाला. त्यामुळे तिने त्याचं गावात थांबण्याचा निर्णय घेतला.

त्या गावात तस तिला ओळखणार कोणीच नव्हतं. त्यामुळे रात्र गावातल्या कुठल्यातरी देवळात काढावी आणि उद्या सराव करून लवकर आपल्या गावी परत जावे असा विचार तिने केला. चालताना एक अर्धवट बांधकाम झालेलं तिला दिसलं, त्यावर फलक होता ‘आर्य समाज मंदिर’

ती तिथे गेली. मंदिरात एक पुजारी बाबा होते, त्यांना तिने हाक मारली. म्हणाली,

बाबा माझी गाडी आज आली नाही, रात्रभर देवळात राहण्याची परवानगी मिळेल का?

पुजारी बाबा म्हणाले,

बेटी देवळात एकच खोली आहे दुसरी अर्धवट बांधलेल्या अवस्थेत आहे, त्यावर छत देखील नाही.

ती छोटी मुलगी म्हणाली, मला ती खोली चालेल. त्या बाबांनी परवानगी तर दिली पण त्या खोलीत गेल्यानंतर तिथे मातीचा ढिगारा, काही लोखंडी तुळया वगळता काहीच नव्हते. थोड्या वेळा नंतर पाऊस सुरु झाला.

टोकियो ऑलिम्पिकच्या दिशेने संघर्षमय प्रवासाची त्यादिवशी सुरुवात झाली.

त्या मुलीने खाली पडलेल्या लोखंडी तुळया उचलल्या आणि छतावर रचायला लागली. जवळच पडलेली एक ताडपत्री तिला दिसली. ती त्या तुळयांवर टाकली. खाली पडलेले रेती माती भरून तिने ताडपत्रीवर टाकली. पावसाचा जोर वाढला पण आता मात्र त्या मुलीला चिंता वाटत नव्हती. 

दुसऱ्या दिवशी त्या पुजारी बाबांनी त्या छप्पर पाहिले. त्यांनाही आश्चर्य वाटले. जेव्हा त्या छोट्या मुलीला लोखंडाच्या जड तुळ्या उचलून ते उभे केलयं हे कळताच त्यांना आश्चर्य वाटले.

मदतीचा पहिला हात तेथे पुढे आला. त्या पुजारी बाबांनी तिला त्या घरात राहण्याची परवानगी दिली. तिने घराच्या भिंती शेणाने सारवून घेतल्या, गोठ्यातील कामाची जबाबदारी उचलली. ती मुलगी आता ११ वर्षांची झाली होती पण वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा १५ व १७ वयोगटातील मुलींची करायची आणि विजेतीही व्हायची. 

ज्युनिअर चॅम्पियन झाली, वेटलिफ्टिंग बारची गरज निर्माण झाली. त्या पुजारी बाबांनी ती गरजही पूर्ण केली. धार्मिक पुस्तके बाबा तिला वाचायला द्यायचे व ती त्यांना ऐकवायची. त्या पुजारी बाबांनी त्यापेक्षाही बहुमूल्य भेट दिली. त्या मुलीला मणिपूर स्टार कुंजीरांनी देवी हिची भेट त्यांनी घडवून आणली. 

बैलगाडी खरेदीनंतरचे दुसरे स्वप्न त्या मुलीला त्या दिवसापासून पडायला लागले. आपणही कुंजीरांनी देवी प्रमाणे विश्वविजेते वेटलिफ्टर होण्याचे स्वप्न ती पाहायला लागली. त्यानंतर तिला ऑलिम्पिक सहभागाचे स्वप्न पडले.

रिओ ऑलिम्पिकला ते साकारलेही, पण गुडघा ऐन स्पर्धेदरम्यान दुखावला आणि पदकाच्या जवळपास येऊनही वजन उचलता आला नाही. ते भंगलेलं स्वप्न टोकियो ऑलिम्पिकला साकार झाले. मीराबाई चानू हे नाव भारतीय वेटलिफ्टिंग च्या इतिहासात शनिवारी सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.

त्याआधी विश्व अजिंक्यपद, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यशाची शिखरे तिने पादाक्रांत केली होती. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तिला पंधरा लाख रुपयांचे बक्षीस दिले. पद्मश्रीने सन्मानीत झाली. मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून तिने सर्वप्रथम बैलगाडी खरेदी केली. बक्षिसाच्या रकमेतील १ लाख पुजारी बाबांना आर्य समाज मंदिराच्या डागडूजीसाठी गुरुदक्षिणा म्हणून दिले.

या पुजारी बाबांनी तिच्या वेटलिफटिंगच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यास मदत केली होती. त्यापेक्षाही मोठी देशभक्तीची प्रेरणा त्या बाबांकडून मीराबाईकडून मिळाली होती.

2017ची विश्व अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा कॅलिफोर्नियात होती. स्पर्धेआधीचे स्नेहभोजन सुरु झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हजर होते. हॉटेलच्या पंचपक्वानावर ताव मारत होते. त्या राष्ट्राध्यक्षांचे लक्ष मीराबाई कडे गेले कारण ती त्यापैकी काहीही खात नव्हती. तिच्या हातात जुनी थाळी होती व त्यामध्ये तिने भारतातून आणलेला तांदळाचा भात होता.

असं का? हा प्रश्न राष्ट्राध्यक्षांनी हॉटेल व्यवस्थापनाला विचारला. आपला देश त्या मुलीला चांगली थाळी न देऊ शकण्याइतका गरीब आहे का? का तिला अस्पृश्यासारखी वागणूक दिली जाते?

उत्तर मिळाले मीराबाई जेथे जेथे जाते तेथे आपल्या देशातील तांदूळ घेऊन जाते स्वतः शिजवते व खाते

असं का हा प्रश्न राष्ट्राध्यक्षांनी आता मीराबाई ला विचारला होता. 

मीराबाई म्हणाल्या, माझ्या देशाचे अन्न खाण्यासाठी देव देवताही आतुर असतात म्हणूनच मीही आमच्या देशाचे अन्न खाते. 

राष्ट्राध्यक्ष म्हणाले,

 धन्य आहे,तु जेथे जन्मले ती भूमी तो देश. मी भारतात आलो तर नक्कीच तुझ्या गावचे दर्शन घेईन.

मीराबाई म्हणाली त्यासाठी एवढे कष्ट करण्याची गरज नाही. येथेच आमच्या गावाचे दर्शन घडविते, असं म्हणत तिने आपल्या पोतडीतून माती बाहेर काढली, डोक्याला लावली आणि राष्ट्राध्यक्षांच्या पुढे करत म्हणाली,

या मातीत आमच्या देशभक्तांचे रक्त मिसळले आहे. ही पावन माती माझ्या गावची माझ्या देशाचे आहे.

राष्ट्राध्यक्ष म्हणाले कुठे शिकलीस हे सारं हे शिक्षण?

मीराबाई म्हणाली,

कुठल्या शाळेत, विद्यापीठात मिळत नाही असं सेन्टेन्समला आर्यसमाजाच्या पुजारी बाबांकडून ही शिकवण मिळाली. त्या पुजारी बाबांना मी सत्यार्थप्रकाश वाचून ऐकवायची. त्यामुळे मला देशप्रेमाची प्रेरणा मिळाली असे म्हणत मीराबाईने आपल्या बागेतून सत्यार्थप्रकाश याची एक प्रत काढून राष्ट्राध्यक्षांना दिली.

राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या अधिकाऱ्यांकडे प्रत दिली आणि त्याचे संशोधन आणि भाषांतर करण्यास सांगितले.

मीराबाईने तोपर्यंत आपल्या ताटातील भात संपवला होता. त्यावेळी भाताचा एक शिल्लक कण राष्ट्राध्यक्षांना दिसला. त्यांनी तो उचलला व तोंडात टाकला. त्यांच्या तोंडून एकच वाक्य आले उद्याचे सुवर्णपदक हीच मुलगी जिंकणार… ती राष्ट्रभक्तीने एवढी प्रेरित झाली आहे.

मीराबाईने सुवर्णपदक जिंकले. नवा इतिहास रचला. हा उच्चांक, विश्व चॅम्पियनशिप यापलिकडचे तिचे यश आहे. आदर्श आहे, जो कोणत्याही पदकांपेक्षा अधिक चमकदार आणि तेजस्वी आहे.

  • विनायक दळवी
विनायक दळवी, हे गेली चाळीस वर्षे कार्यरत असणारे जेष्ठ क्रिडापत्रकार आहेत.
1 Comment
  1. Akshay says

    Interesting,and inspiring story of Mirabai chanu.

Leave A Reply

Your email address will not be published.