कसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता…!!!

सध्याच्या परिस्थितीत निवडणुका म्हणजे पैसा हे समीकरणच झालंय. पैश्याशिवाय कुठलीही निवडणूक लढवणं केवळ अशक्य कोटीतली गोष्ट. अगदी ग्राम पंचायतीच्या सदस्यत्वाची निवडणूक जरी असेल तर ती जिंकण्यासाठी देखील पाण्यासारखा पैसा ओतला जातो आणि मग निवडून आल्यानंतर तो पैसा वसूल केला जातो.

शिवाय ही गोष्ट देखील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि मतदार या सर्वांसाठी इतकी सामान्य झाली आहे की पैश्याशिवाय निवडणूक लढवण्याचा कुणीच विचार करू  शकत नाही. समजा तसा प्रयत्न कुणी केलाच तर पराभवाची खात्री नक्कीच देता येऊ शकते.

अशा या राजकीय संस्कृतीत उत्तर प्रदेशात एक नेता असा आहे की जो कसलाही प्रचार न करता आणि पैसा खर्च न करता चार वेळा आमदार झालाय, असं कुणी तुम्हाला सांगितलं तर कदाचित त्यावर विश्वास ठेवणं तुम्हाला जड जाईल.

पण ही गोष्ट अगदी खरी असून उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे आमदार आलमबदी आझमी हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात अतिशय साधे आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ४ वेळचे आमदार असले तरी ते एका छोट्याश्या घरात राहतात आणि आपल्या दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करतात. विधानसभेत जाण्यासाठी देखील ते राज्य परिवहन सेवेच्या बसचा वापर करतात. त्यांच्याकडे स्वतःची गाडी देखील नाही.

alambadi

आझमगढच्या निजामाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी असणाऱ्या आलमबदी यांनी २०१७ च्या मोदी-योगी लाटेत सुद्धा आपला करिष्मा कायम राखत बहुजन समाजवादी  पार्टीच्या माजी मंत्री राहिलेल्या चंद्रदेव राम यादव यांचा १८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला आणि ते चौथ्यांदा आमदार झाले.

कसलीही धनसंपत्ती जवळ नसलेला हा माणूस निवडणुकीत कार्यकर्त्यांना नेमका कसा सांभाळतो हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. याचं उत्तर ते असं देतात की,

“कार्यकर्त्यांची गरजच काय आहे. कार्यकर्ता वैगेरे गोष्टीवर माझा विश्वासच नाही. माझी जनता हेच माझे कार्यकर्ते. मतदारसंघात केलेलं काम आवडलं तर मत देतील, नाही तर नाही देणार”

निवडणूक असो किंवा नसो आलमबदी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपल्या मतदारसंघात असतात. लोकांना भेटतात, त्यांचे प्रश्न जाणून घेतात आणि ते सोडविण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करतात. २००३ साली मुलायम सिंह उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना त्यांनी आलम बदी यांना बोलावून घेतलं होतं आणि आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ठ होण्याविषयी सुचवलं होतं. पण आलम बदी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.

मतदारसंघातील लोकांनी आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, मग मंत्री होऊन काय करू..? असा सवाल करत त्यांनी मंत्री पदाची ऑफर नाकारली. पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा या दुष्टचक्रात अडकलेल्या राजकीय संस्कृतीत त्याचं हे वागणं अपवादात्मकच.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. Arvind says

    Another example VITTHALRAO NAIKE
    KALAMNURI MLA Dist.Hinholi (MH)

Leave A Reply

Your email address will not be published.