भाजपने काश्मीरच्या सत्तेला लाथ या दोन अधिकाऱ्यांच्या जीवावर मारली ?
“जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाया आत्ता अधिक कठोरपणे करण्यात येतील.”
चार वर्ष पीडीपी बरोबर संसार केल्यानंतर भाजपला सुचलेलं हे ‘शहा’णपन. आत्ता भाजप वर्षाभराच्या अंतरात काश्मीरमध्ये काय करुन दाखवणार आहे. त्यावर २०१९ च्या निवडणुकांचे मुद्दे रंगतील हे आसेतू हिमालय कोणीही सांगू शकतं.
पण मुद्दा हा आहे की भाजप हे कशाच्या जीवावर करणार ? यातच अशा दोन अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत की त्यांच नाव काढलं तरी अनेकांची टरकते. एका अधिकाऱ्याने चक्क विरपन्नचा खातमा केला तर दूसऱ्या अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल जातं.
जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून बीव्हीआर सुब्रमण्यम तर काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांचे सल्लागार म्हणून के. विजय कुमार यांच्याकडे हि जबाबदारी देण्यात आली.
बीव्हीआर सुब्रमण्यम –
बीव्हीआर सुब्रमण्यम हे १९८७ सालच्या छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी असून काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी काश्मीरचे माजी मुख्य सचिव भारत भूषण व्यास यांची जागा घेतली.
काश्मीरमध्ये रुजू होण्यापूर्वी गेल्या ३ वर्षांपासून ते छत्तीसगडच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर त्यांना तडकाफडकी काश्मीरमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नक्षलग्रस्त भागातील धडाकेबाज कामगिरीसाठी ते ओळखले जातात. सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत नक्षलग्रस्त भागात केल्या गेलेल्या कारवाईत ३०० नक्षलवादी मारले गेले आहेत तर १००० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात २००४ ते २००८ दरम्यान सुब्रमण्यम यांनी पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेलं आहे. तसच दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाचे संयुक्त सचिव म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. २००८ ते २०११ या काळात ते जागतिक बँकेत कार्यरत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भाजप सरकारने देखील त्यांना पंतप्रधान कार्यालयाचे संयुक्त सचिव म्हणून कायम ठेवलं होतं. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये त्यांच्यावर छत्तीसगडच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
के. विजय कुमार –
ऑक्टोबर २००४ मध्ये कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा खातमा करण्यात आला. यासाठी ‘ऑपरेशन कोकून’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेचं नेतृत्व करणारे अधिकारी म्हणजे के. विजय कुमार.
याच मोहिमेवर २०१३ साली कन्नडमध्ये ‘अट्टहास’ आणि तेलगुमध्ये ‘वाना युद्धम’ नावाचे चित्रपट देखील प्रदर्शित झालेले आहेत. या चित्रपटात ‘अर्जुन सरजा’ या अभिनेत्याने के. विजय कुमार यांच्यावर आधारलेलं पात्र साकारलं आहे.
के. विजय कुमार हे १९७५ सालच्या तामिळनाडू केडरचे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. तणावग्रस्त परिस्थितीत अनेक मोहिमा यशस्वीपणे हाताळण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
१९९९ साली ज्यावेळी कारगिलचं युद्ध झालं त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील बीएसएफचे महासंचालक म्हणून के.विजय कुमार हेच काम बघत होते. २०१० साली ज्यावेळी दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी ७५ लोकांची हत्या घडवून आणली त्यानंतर त्यांची नियुक्ती सीआरपीएफचे महासंचालक म्हणून करण्यात आली.
पुढे डिसेंबर २०१२ साली भारत सरकारने त्यांची नियुक्ती केंद्रीय गृह खात्याचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून केली.