‘चौधरी चहावाले’ ज्यांची नरेंद्र मोदींनी गेल्या महिनाभरात दोन वेळा आठवण काढलीये !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहा यांचं वेगळंच नातं आहे. पंतप्रधानांनी स्वतःचा उल्लेख अनेकवेळा ‘चहावाला’ असा करून झालाय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच चहा विकला होता की नाही हे त्यांनाच माहित, पण ‘चहा’ आणि ‘चहावाला’ यांच्याशी असलेलं आपलं नातं सांगायची कुठलीच संधी नरेंद्र मोदी सोडत नाहीत हे देखील तितकंच खरं.

आपल्या चहावाल्याच्या प्रतिमेचा मोदींना किती राजकीय फायदा लाभ मिळाला आणि विरोधी काँग्रेसला त्याचा कसा फटका बसला हे इथे वेगळं सांगायलाच नको. मोदींनी आता अजून एकदा आपलं हे ‘चहास्त्र’ बाहेर काढलंय. लोकांनाही ‘चाय पे  चर्चा’ करण्यासाठी चहा आणि चहावाल्याचाच विषय मिळालाय.

कालपासून अजून एक ‘चहावाला’ खूप चर्चेत आहे. खुद्द पंतप्रधानांनीच साधारणतः गेल्या महिनाभराच्या काळात २ वेळा त्यांचा उल्लेख केल्याने लोक आता या नंदुरबारच्या या चहावाल्याला शोधताहेत. नेमके आहेत कोण हे चौधरी चहावाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांच्याशी काय नातं आहे..?

नेमकं प्रकरण काय आहे..?

काल शिर्डी दौऱ्यात देखील मोदींनी नंदुरबारमधील  ‘चौधरी चहावाले’ यांचा उल्लेख केला आणि परत एकदा ते चर्चेत आले. झालं असं की शिर्डी दौऱ्यावर आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान घरकुल योजने’ अंतर्गत काही लाभार्थ्यांना घराचं वाटप केलं. त्यानंतर मोदींनी गमतीने या लाभार्थ्यांकडे आपल्याला मिठाई खाऊ घालण्याची मागणी केली.

लाभार्थी बहुतेक नंदुरबार जिल्ह्यातले असावेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना नंदुरबारला येण्याचं निमंत्रण दिलं. नंदुरबारला आल्यानंतर तिथली फेमस मिठाई पंतप्रधांना देण्यात येईल असं लाभार्थी म्हणाले. नंदुरबारचा उल्लेख आला आणि पंतप्रधांनांनी आपल्या नंदुरबारशी असलेल्या आठवणी जागवल्या.

आपण पूर्वी अनेकदा नंदुरबारला यायचो त्यावेळी ट्रेनमध्ये चौधरींचा चहा  प्यायचो, असं पंतप्रधानांनी सांगितलं. त्यामुळे ‘चौधरी चहावाले’ पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेत.

दरम्यान ही काही पहिलीच वेळ नाही की जेव्हा मोदींनी चहावाल्या चौधरींची आठवण काढलीये. साधारणतः महिनाभरापूर्वी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांशी बोलताना देखील मोदींनी त्यांची आठवण काढली होती. ‘अजूनही नंदुरबारमध्ये चौधरींचा चहा मिळतो का…?’ असा प्रश्न पंतप्रधानांनी अंगणवाडी सेविकांना विचारला होता.

आहेत कोण चौधरी चहावाले..?

चौधरी चहावाले आपल्या कडक आणि स्वादिष्ट चहासाठी प्रसिद्ध आहेत. नंदुरबारमध्ये असलेलं त्यांचं चहाचं दुकान अतिशय प्रसिद्ध आहे. नंदुरबारच्या चौधरी गल्लीत राहणारे रामदास चौधरी हे गेल्या ४१  वर्षांपासून ते ‘सुरत ते नंदुरबार’ दरम्यानच्या ‘हावडा एक्स्प्रेस’ ट्रेनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतात.

नंदुरबार ते सुरत आणि परत सुरत ते नंदुरबार असा त्यांचा चहा विक्रीचा दररोजचा दिनक्रम आहे. पिळदार मिशांसाठी प्रसिद्ध असणारे चौधरी हे ‘मुछवाले चौधरी की चाय’ म्हणून चहा विकताना ट्रेनमधील अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात.

चहा विक्रीच्या या व्यवसायात त्यांना कुटुंबियांची देखील मदत मिळते. याच व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण होते. चहाच्या चवीमध्ये बदल होऊ नये म्हणून चौधरी स्वतःच चहा बनवतात. पंतप्रधान पदावर विराजमान होण्यापूर्वी आपल्या राजकीय दौऱ्यांसाठी जेव्हा मोदी ट्रेनमधून प्रवास करत त्यावेळी ते न चुकता चौधरींचा चहा पीत असत.

चौधरींच्याच मते पंतप्रधानांना त्यांचा चहा खूप आवडतो आणि पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकामुळे त्यांना आपल्या कामात उर्जा मिळाल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलंय. शिवाय आपल्याला चहा विक्रीचा परवाना उपलब्ध करून देण्याची मागणी देखील त्यांनी पंतप्रधानांकडे केलीये.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Dinesh Pawar says

    बोल भिडू या पेज च्या माध्यमातून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार लेख तथा किस्से वाचायला मिळतात. या लेखात जास्तकरून पश्चिम महाराष्ट्रातील लेख पहावयास मिळतात, पहिल्यांदाच खान्देशातील किस्सा वाचावयास मिळाला.!

Leave A Reply

Your email address will not be published.