नागपूरच्या या माणसाने आत्तापर्यन्त आत्महत्या करणाऱ्या १,००० माणसांचा जीव वाचवलाय.

साधारणतः २००८ सालची घटना असेल.

नागपुरातील गांधीसागर तलावात सचिन मेश्राम नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने जी चिट्टी मागे सोडली होती, त्यात त्याने लिहिलं होतं,

“प्रिय जगदीश, तलावातून माझा मृतदेह बाहेर काढण्यासाठी धन्यवाद. कृपया माझा मृतदेह माझ्या मोठ्या मुलाकडे सुपूर्द करावा आणि त्याला माझे अंत्यसंस्कार विधी पार पडायला सांगावे”

खरं तर जगदीश हे काही सचिन यांचे नातेवाईक किंवा मित्र नव्हते. मित्र सोडा सचिन यांची जगदीश यांच्याशी तोंडओळख देखील नव्हती. असं असतानाही सचिन यांना पूर्ण खात्री होती की जगदीश हे आपला मृतदेह तलावातून बाहेर काढतील.

नेमके आहेत कोण हे जगदीश आणि एका अनोळखी माणसाला त्यांच्यावर इतका  विश्वास कसा आहे की मृत्यूपूर्वीचं आपलं शेवटचं पत्र हा माणूस त्यांच्यासाठी लिहितो..?

आहेत कोण हे जगदीश..?

महाराष्ट्राच्या उप-राजधानीचं शहर असणाऱ्या नागपूरमध्ये एक असा माणूस राहतो ज्याने आतापर्यंत तलावात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १००० पेक्षा अधिक लोकांचा जीव वाचवलाय.

एवढंच नाही तर गांधीसागर तलावातून कुजत पडलेल्या २००० पेक्षा अधिक मृतदेहांना त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने बाहेर काढलंय. विशेष म्हणजे या गोष्टी ते स्वयंप्रेरणेने कुठल्याही मोबदल्याशिवाय करतात.

त्यांच्या या सामाजिक जाणीवेतून सुरु केलेल्या कामाची दखल ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने देखील घेतली आहे. जगदीश खरे असं त्यांचं नाव.

नागपुरातील गांधीसागर तलाव हा ‘आत्महत्येचा तलाव’ म्हणूनच कुप्रसिद्ध आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार प्रत्येकवर्षी जवळपास १०० पेक्षा अधिक लोक या तलावात आत्महत्येचा प्रयत्न करतात. या तलावत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जेवढ्या लोकांना वाचवता येईल, तेवढ्या लोकांना वाचवण्याचा जगदीश यांचा प्रयत्न असतो.

२०१० साली नागपूर महापालिकेने या कामासाठी त्यांना ४००० रुपये मानधन द्यायला सुरुवात केली होती. मात्र २ वर्षानंतर हा करार संपल्यानंतर मात्र तो करार नव्याने लागू करण्यात आला नाही. जगदीश यांचं काम मात्र सुरूच राहिलं.

“पालिकेकडून पैसे मिळणं बंद झाल्यानंतर अनेकांनी आपल्याला हे काम बंद करण्याचा सल्ला दिला होता, मात्र आपण हे काम पैश्यासाठी करत नसून त्यातून आपल्याला खूप समाधान मिळतं म्हणून करतो”

अशी प्रतिक्रिया जगदीश यांनी ‘द हिंदू’शी बोलताना दिली होती.

मित्राच्या आत्महत्येने हादरलेल्या जगदीशने घेतला लोकांना वाचवायचा वसा

१९९४ साली रामू भजनवाले या जगदीश यांच्या मित्राने गांधीसागर तलावात उडी टाकून आत्महत्या केली होती. आपल्या मित्राच्या आत्महत्येची बातमी जेव्हा जगदीश यांना समजली त्यावेळी ते पुरते हादरून गेले.

अतिशय दुखी झालेल्या जगदीश यांनी तेव्हाचपासून अशा प्रकारे आत्महत्या करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असं ठरवलं आंनी तेच आपलं जीवनध्येय्य बनवलं. अनेक सामाजिक संघटनांनी जगदीश खरे यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने देखील त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना त्यांना ५ लाख रुपयांची मदत केली होती.

अक्षय कुमार कडून मिळालेली ही मदत सुद्धा खरे यांनी स्वतःसाठी न वापरता त्यातून एका अँम्ब्युलंसची खरेदी केली. ही अँम्ब्युलंस नागपूरमधील गणेशपेठ पोलीस स्टेशनसमोर २४ तास उभी असते. या अँम्ब्युलंसमधून ते मृतदेह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतात. याशिवाय रस्त्यांवरील अपघातातील जखमींना देखील हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याचं काम निशुल्कपणे करतात.

जगदीश यांच्या या कामात त्यांच्या पत्नी जयश्री खरे या नेहमीच त्यांच्यासोबत राहिल्या आहेत, पण इतर नातेवाईकांना मात्र त्यांचं हे काम आवडत नाही. नातेवाईकांपैकी अनेकजण त्यांची या कामासाठी हेटाळणी करतात, पण त्याच्याशी जगदीश यांना काहीच देणं-घेणं नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं या वृत्तीने त्यांनी हे असिधाराव्रत स्वीकारलेलं आहे.

माध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांनुसार जगदीश यांनी २०१७ साली झालेली नागपूर महापालिकेची निवडणूक देखील लढवली होती, मात्र मतदारांनी त्यांच्या झोळीत फक्त ४४० मतांचं दान टाकलं, ही शोकांकिकाच म्हणावी लागेल.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.