अंदमानातील सेंटीनेली लोकांना भेटून जिवंत परतलेली महिला संशोधक !

अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाउ यांची अंदमान निकोबार बेटावरील सेंटीनेली प्रजातीच्या आदिम संस्कृतीतील लोकांनी बाण मारून हत्या केल्याची घटना होऊन आता साधारणतः पंधरवाडा उलटलाय. असं असलं तरी स्थानिक पोलिसांना अजूनपर्यंत तरी त्यांचा मृतदेह जप्त करता आलेला नाही.

सेंटीनेली लोकांशी संपर्क करणंच शक्य नसल्याने मृतदेहाच्या शोधार्थ गेलेल्या पोलिसांना रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या धाडसी संशोधक महिलेविषयी जाणून घेणं औचित्यपूर्ण ठरेल, जीने अगदी तरुण असताना सेंटीनेली लोकांशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे त्यांच्याशी संपर्क करून त्या जिवंत परतल्या होत्या.

सेंटीनेली आदिम लोकांशी संपर्क करणाऱ्या या धाडसी संशोधक होत्या मानववंश शास्त्रज्ञ डॉ. मधुमाला चटोपाध्याय. साधारणतः २७ वर्षांपूर्वी त्यांनी अंदमान बेटावरील या आदिम लोकांशी संपर्क केला होता आणि त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून या आदिम काळातील लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास केला होता.

madhumala
अंदमानातील जारवा समुदायातील महिला आणि मुलांसोबत मधुमाला चटोपाध्याय

डॉ.मधुमाला चटोपाध्याय यांनी सेंटीनेली लोकांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा केलेला अभ्यास ‘ट्राइब्स ऑफ कार निकोबार’ या पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशित करण्यात आलेला आहे. शिवाय सेंटीनेलीज व्यतिरिक्त अंदमानमधील जारवा प्रजातीतील लोकांशी देखील त्यांनी संपर्क साधला आणि मैत्रीचे संबंध बनवले. त्यांच्या या प्रवासाबद्दल सुदीप्तो सेनगुप्ता यांनी ‘मधुमाला चटोपाध्याय- अॅन अॅन्थ्रोपॉलोजिस्टस मोमेंट ऑफ ट्रुथ’ या लेखात अतिशय सविस्तरपणे लिहिलंय.

कोण आहेत डॉ.मधुमाला चटोपाध्याय…?

डॉ.मधुमाला चटोपाध्याय या मानववंश शास्त्रज्ञ असून त्या सध्या केंद्र शासनाच्या सामाजिक कल्याण मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

४ जानेवारी १९९१ रोजी भारत सरकारच्या मानववंशशास्त्र सर्वेक्षणासाठी आपल्या टीमसोबत एम.व्ही. तारमुगली या जहाजातून नॉर्थ सेंटीनेली बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या.  भारत सरकारच्या या अभियानात १३ जणांच्या टीमचा समावेश होता. मधुमाला या त्या टीममधल्या प्रमुख मानववंश शास्त्रज्ञ होत्या.

सेंटीनेलीज लोकांकडून टीमने भेट म्हणून दिलेल्या नारळांचा स्वीकार

१३ जणांची टीम ज्यावेळी बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचली त्यावेळी त्यांनी आपल्या जहाजातून सेंटीनेली लोकांसाठी पाण्यात नारळ टाकायला सुरुवात केली. टीमने पाण्यात टाकलेल्या नारळांचा या लोकांनी स्वीकार केला त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात नारळ टाकण्यात आली. सेंटीनेलीज लोकांनी नारळांचा स्वीकार करणं, ही या टीमसाठी मोठीच उपलब्धी होती.

ज्यावेळी टीमकडील नारळ संपली त्यावेळी या टीमने काही वेळानंतर परत नारळांची व्यवस्था केली आणि पाण्यात नारळ फेकण्यात आली. दुसऱ्या वेळी जेव्हा ही टीम नारळ घेऊन परत आली त्यावेळी देखील या लोकांनी त्यांचं स्वागत केलं. काही लोकं ‘नारीयाली, जाबा जाबा’ असं ओरडली. सेंटीनेलीज लोकांच्या भाषेचा अभ्यास असलेल्या मधुमाला यांना पटकन लक्षात आलं की ते आपल्या इतर लोकांना ओरडून सांगताहेत की अजून नारळ आली आहेत.

….नाहीतर मधुमाला यांचा देखील जीव गेला असता !

दुसऱ्या वेळी ज्यावेळी नारळ टाकण्यात आली, त्यावेळी एका मुलाने टीमच्या जहाजाला आपल्या हाताने स्पर्श केला. इतरही लोक जहाजाच्या जवळ आले. परंतु या सर्वांपासून दूर असलेल्या एका माणसाने मधुमाला यांच्यावर बाण सोडला. या माणसाने सोडलेल्या बाणामुळे कदाचित मधुमाला यांचा जीवच गेला असता, परंतु बाण सोडणाऱ्याच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका सेंटीनेली महिलेने त्याला धक्का दिल्याने त्याचा निशाणा चुकला आणि मधुमाला यांचा जीव थोडक्यात वाचला.

या हल्ल्यातून बचावल्यानंतर देखील मधुमाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो निर्णय घेतला, तसा निर्णय घेण्यासाठी सिंहाचं काळीजच हवं. टीम थेट आपल्या जहाजातून पाण्यात उतरली. मानववंश शास्त्रासाठी ही एक ऐतिहासिक घटना होती. कारण या टीमने आता सेंटीनेलीज लोकांशी थेट संपर्क केला होता. मधुमाला आता नारळ पाण्यात टाकत नव्हत्या, तर आपल्या हातांनी या लोकांना त्या नारळ देत होत्या. सेंटीनेली लोकांशी संपर्क साधण्याची ही मोहीम यशस्वी ठरली होती.

ही टीम परतल्यानंतर साधारणतः दीड महिन्याने मधुमाला या परत एकदा दुसऱ्या एका टीमसोबत नॉर्थ सेंटीनल बेटावर गेल्या. यावेळी देखील सेंटीनेली लोकांनी त्यांचं स्वागत केलं. एवढंच नव्हे, तर ही लोकं नारळ मिळविण्यासाठी त्यांच्या जहाजावर देखील चढली. विशेष म्हणजे यावेळी मात्र ना त्यांच्यावर बाण रोखला गेला, ना हल्ला झाला.

सेंटीनेलीजशी संपर्क साधनं ही ऐतिहासिक कामगिरी का ठरते..?

सेंटीनेली लोकांनी स्वतःला संपूर्ण जगापासून वेगळं ठेवलंय. साधारणतः ५० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून भारतात आलेल्या या आदिम काळातील लोकांचा बाह्य जगाशी त्यांचा कसलाही संपर्क नाही. त्यामुळेच जगाच्या इतिहासातील सर्वात प्राचीन आदिम लोकांचा समूह समजल्या सेंटीनेली लोकांशी संपर्क करून जिवंत परतणं ही मोठी कामगिरी ठरते.

सेंटीनेलीज लोक आपलं वेगळं अस्तित्व, आपली संस्कृती जगापासून वेगळं राहूनच जपू इच्छितात. कुठल्याही बाह्य व्यक्तीने नॉर्थ सेंटीनेली बेटावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाच तर, त्याचं स्वागत बाणांच्या वर्षावाने केलं जातं.

मानवाच्या बाह्य हस्तक्षेपाकडे ते लोक त्यांच्या संस्कृतीवरील आक्रमण म्हणून बघतात. त्यामुळे कुणी तसा प्रयत्न केलाच तर आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी हे लोक संबंधित व्यक्तीवर हल्ला करतात. अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाउ देखील अशाच हल्ल्यात मरण पावला.

भारत सरकारने देखील या लोकांचा रहिवास असलेलं नॉर्थ सेंटीनल बेट हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करताना सेंटीनेली ही संरक्षित प्रजाती म्हणून घोषित केलीय. त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क साधण्यास कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. केवळ काही अपवादात्मक परिस्थितीत मानववंश शास्त्राज्ञांनाच सरकारच्या परवानगीने अभ्यासासाठी म्हणून या बेटावर जाणे शक्य आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.