देशातील पहिला दिवाळखोरीत निघालेला उद्योजक…!!!

कधीकाळी तो पैशांमध्ये लोळला होता. लक्ष्मीची नाना रूपं त्याने बघितली होती. पण १९८७ साली ज्यावेळी कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली त्यावेळी जामिनाच्या पैशाची जुळवाजुळव करायला देखील त्याला दारोदार भटकावं लागलं होतं.

कारण हा माणूस त्यावेळी जागतिक पातळीवरील पहिला दिवाळखोर भारतीय माणूस ठरला होता.

‘करोडपती व्यवसायिकापासून ते दिवाळखोर’ या राजिंदर सिंग सेठीयाच्या प्रवासाची सुरुवात होते १९७७ साली. याचवर्षी सेठीयाने  ‘इजल कमोडीटीज’ नावाच्या कंपनीची सुरुवात केली होती. १९७८ साली कंपनीची उलाढाल होती १ कोटी रुपयांची. १९८२ येता-येता ती जवळपास १०० कोटींच्या घरात पोहोचली होती. या काळात सेठीयाने लंडन आणि नायजेरियातील बँकांमधून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं.

rs1 2
India Today

कंपनी व्यवस्थित सुरु होती तोपर्यंत सर्वकाही ठीकठाक सुरु होतं. १९८३ पर्यंत कंपनीची उलाढाल ६०० कोटींपर्यंत गेली होती. परंतु याचवर्षी मुहाम्मदू बुहारी यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने नायजेरियामध्ये सरकार उलथवून लावलं आणि सैन्याने सरकारचा ताबा घेतला. याचा जबरदस्त झटका इजल कंपनीला बसला. व्यवसाय घटायला लागला आणि कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे कंपनीवरचा आर्थिक बोजा वाढत चालला होता. कर्जवसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू झाला होता.

१९८४ सालच्या सुरू होता होता लंडनमधील कोर्टाने सेठियाविरुद्ध अटक वॉरंट जाहिर केल होतं. अटकेपासून वाचण्यासाठी सेठियाने लंडनमधून स्पेनमध्ये पळ काढला होता. तोपर्यंत कर्जदार बँकांनी आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी एक योजना तयार केली होती, ज्यातून ५० कोटींपर्यंत रक्कम उभारणं शक्य होतं. आरबीआयने देखील या योजनेला मंजुरी दिली होती. परंतु ज्यावेळी ही योजना लंडनमधील कोर्टात सादर करण्यात आली त्यावेळी कोर्टाने ती स्वीकारण्यास नकार दिला.

१९८४ सालच्या शेवटापर्यंत सेठियाने कर्जाची रक्कम उभारण्यासाठी भारतीय बँकांशी बोलणी सुरू केलेली होती आणि जगभरातील इतर बँकांशी देखील तो बोलत होता. परंतु कुठल्याच प्रयत्नांना यश येत नव्हतं. शेवटी फेब्रुवारी १९८५ साली ज्यावेळी सेठिया भारतात परतला तेव्हा सीबीआयने दिल्लीत त्याला अटक केली.

आरोप होते फसवणूक आणि खोटा पासपोर्ट जवळ बाळगण्याचे.

जवळपास २ वर्षे दिल्लीतील तिहार जेलमध्ये घालवल्यावर शेवटी १९८७ च्या फेब्रुवारी महिन्यात त्याला जामीन मंजूर झाला.

shobh
चार्ल्स शोभराज

असं सांगतात की ज्यावेळी सेठिया तिहार जेलमध्ये सजा भोगत होता, त्याचवेळी कुप्रसिद्ध बिकिनी किलर चार्ल्स शोभराज देखील तिहारमध्येच होता. परंतु सेठिया जेलमध्ये आल्यानंतर काही दिवसातच शोभराजने जेलमधून धूम ठोकली होती.

सेठिया आणि शोभराज यांचे चांगले संबंध होते आणि सेठियानेच शोभराजला पळून जायला मदत केली असा आरोप देखील सेठियावर झाला होता. शोभराज तिहारमधून पळून जाण्याचा प्रकरणात पोलिसांनी ज्यांना आरोपी म्हणून जाहीर केलं होतं त्यात सेठियाचं देखील नांव होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.