पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे भाजपचे दलित खासदार…!!!

२०१९ ची लोकसभा  निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतशी सत्ताधारी भाजपमधील नाराजांची संख्या वाढताना बघायला मिळतेय. २०१४ साली प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या भाजपची सार्वत्रिक निवडणुक पूर्वीची आणि नंतरचीही प्रतिमा ही प्रामुख्याने मुस्लीम विरोधी पक्ष अशी होती. परंतु २०१९ येता-येता ती दलित-विरोधी पक्ष अशी होऊ लागल्याचं चित्र निर्माण झालंय. गेल्या ४ वर्षात मोदींच्या नेत्वृत्वाखालील भाजप सरकारला आपल्या दलित विरोधी भूमिकांमुळे अनेक प्रसंगी दलित समाजाच्या रोषास सामोरे जावं लागलंय. आता तर खुद्द भाजपमधीलच ५ दलित खासदारांनीच पक्ष आणि पंतप्रधान मोदींविरुद्ध बंडाचं निशाण फडकावत आपली नाराजी व्यक्त केलीये. जाणून घेऊयात कोण आहेत ही खासदार मंडळी आणि त्यांनी कुठल्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलंय….

सावित्रीबाई फुले

लखनऊ रॅलीदरम्यान सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले या उत्तर प्रदेशातील बहारीच येथील भाजप खासदार. अतिशय गरीब आणि संघर्षपूर्ण परिस्थितीतून आलेल्या सावित्रीबाई  या २०१४ साली प्रथमच खासदार झाल्या. १९९८  साली बसपा सोडल्यानंतर २००० साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्या भाजपमध्ये सक्रीय आहेत. २००२ आणि २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला आणि २०१४ साली त्या खासदार झाल्या. सत्ताधारी पक्षाच्या खासदार असूनही दलित समाजासंदर्भातील सरकारच्या अनेक निर्णयाविरोधात त्या सातत्याने दलित समाजाच्या वतीने भूमिका घेत आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून वाढलेल्या दलित अत्याचाराच्या घटनांबद्दल तसेच आरक्षणासंदर्भातील सरकारच्या भूमिकांमुळे त्यांच्यात आणि सरकारमध्ये संघर्ष बघायला मिळतोय. नुकतंच उत्तर प्रदेश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात बदल केला त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत नावात बदल करण्याचा विरोध केला. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी लखनौ येथे निषेध रॅलीदेखील काढली होती. आपली खासदारकी गेली तरी चालेल पण आपण या मुद्यावर सरकारशी लढू, असं त्या या रॅलीत म्हणाल्या.

उदित राज

Twitter/Udit Raj

उदित राज हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि उत्तर-पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत. भारतीय महसूल सेवेत काम केलेल्या राज यांनी २००३ साली नोकरीचा राजीनामा देऊन ‘भारतीय जस्टीस पार्टी’ची स्थापना केली. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कॉंग्रेस सरकारमध्ये महिला बालविकास राज्यमंत्री राहिलेल्या कृष्णा तीरथ यांचा पराभव करत ते प्रथमच लोकसभेवर निवडून गेले. भाजपमधील महत्वाचे दलित नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित समाजाने पुकारलेल्या भारत बंद नंतर त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचारात वाढ झाली असून  त्याविरोधात सरकारकडून कुठलीही आश्वासक पाऊले उचलली जात नाहीत, असं सांगत त्यांनी नुकतीच केंद्र सरकारवर टीका केलीये. सरकारने गेल्या चार वर्षात दलित समाजासाठी काहीही केलं नसल्याची तक्रार देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केलीये. दलित समाजात सरकारविषयी चीड वाढत चालली असल्याची माहिती आपण सरकारला अडीच वर्षापूर्वीच दिली होती असंही त्यांनी म्हंटलय.

डॉ. यशवंत सिंग

डॉ. यशवंत सिंग यांचे पत्र/ANI

२००२ ते २०१२ या कालावधीत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिलेले डॉ. यशवंत सिंग हे २०१४ साली नगीना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. राष्ट्रीय लोक दल ते भाजप व्हाया बहुजन समाज पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. ७ एप्रिल रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सरकार विरोधात आपली नाराजी व्यक्त केली. गेल्या ४ वर्षात केंद्र सरकारने दलित समाजासाठी काहीही केलं नसल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला. सरकारने निवडणुकीपूर्वी दलित समाजाला दिलेल्या आश्वासनांची देखील त्यांनी पंतप्रधानांना आठवण करून दिली. नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी दलित समाजाला आरक्षण आणि अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकारकडून कसलीही ठोस भूमिका घेतली जात नाही, हे क्लेशदायक असल्याचं त्यांनी पत्रात म्हंटलय.

 छोटेलाल खरवार

छोटेलाल खरवार यांचे पत्र

उत्तर प्रदेशातील रॉबर्टगंजचे खासदार असणाऱ्या छोटेलाल खरवार यांनी नुकतंच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोदींकडे तक्रार केलीये. आपल्या समस्या घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो असता मुख्यमंत्री आपल्याला भेटले तर नाहीच उलट जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आलं, रिव्हाल्वरचा धाक दाखवून आपल्याला तेथून हाकलून देण्यात आलं. पोलिसांनी याविरोधातील तक्रार लिहून घेण्यास देखील नकार दिला, असंही  खरवार यांनी पत्रात म्हंटलय. एका खासदाराची तक्रार जर पोलीस लिहून घेत नसतील तर दलित समाजातील सामान्य माणसाची काय अवस्था, असा प्रश्न देखील त्यांनी माध्यमांना सामोरे जाताना उपस्थित केलाय. दलित आणि आदिवासींच्या आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती खरवार यांनी पंतप्रधानांना केलीये.

अशोक दोहरे  

अशोक दोहरे यांचे पत्र

उत्तर प्रदेशातील इटावा मतदारसंघाचे खासदार अशोक दोहरे यांनी देखील पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सरकारवर हल्ला चढवलाय. भारत बंद दरम्यान जाणीवपूर्वक दलित समाजावर हल्ले करण्यात आले, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. पोलिसांकडूनही दलित समाजातील निर्दोष लोकांना त्रास  देण्यात येत असून जातीवाचक शिवीगाळ करण्यात येतेय, घराच्या बाहेर काढून लोकांना मारहाण करण्यात येतेय. सरकारी यंत्रणेकडून मात्र या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय, असं दोहरे आपल्या पत्रात्त म्हणतात. या पत्रानंतरही शांत न राहता भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लखनौ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोहरे यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे असं सांगितलंय की आपण फक्त आंबेडकरी विचारधारा मानतो, त्यापलीकडे आपल्याला कुणाच्याही समर्थांची गरज नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.