एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणारा पहिला भारतीय !

एव्हरेस्ट 

जगातलं सर्वात उंच शिखर. कुठल्याही शिखराने आपल्या उंचीचा अभिमान मिरवावा इतकी या शिखराची उंची. ८ हजार ८४८ मीटर.

जगभरातला कुठलाही गिर्यारोहक असूद्यात, एव्हरेस्ट सर करणं हे त्याचं स्वप्न असतंच. आजघडीला अनेक भारतीयांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावलाय. पण प्रत्येक वेळी हे यश सेलिब्रेट करण्यासारखंच असतं, त्याचं अप्रूप कधीच कमी होत नाही इतकी ही खडतर मोहीम.

एव्हरेस्टचं सर करण्याचं यश आपण सेलिब्रेट तर करतो पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीयाविषयी माहित असतं. आज आम्ही तुम्हाला सांगतोय त्याच माणसाविषयी ज्याने सर्वात आधी एव्हरेस्टवर सर्वप्रथम तिरंगा फडकाविला.

कर्नल अवतार सिंह चिमा.

२० मे १९६५.

हाच तो दिवस होता, जेव्हा कर्नल अवतार सिंह चिमा यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवताना इतिहास आपल्या नावे केला आणि प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली.

१९ सदस्यांच्या टीमने त्यावेळी एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र त्यातले फक्त ९ जन ही मोहीम फत्ते करू शकले. या टीमचं नेतृत्व करत होते मनमोहन सिंह कोहली. यशस्वीरीत्या एव्हरेस्ट सर केलेल्या या ९ जणांपैकी कर्नल अवतार सिंह चिमा आणि शेर्पा नवांग गोंबू सर्वात आधी एव्हरेस्टवर पोहोचले होते.

या यशस्वी चढाईमुळे शेर्पा नवांग गोंबू यांनी एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा यशस्वी चढाई करणारा जगातील पहिला गिर्यारोहक होण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. १९६५ सालच्या भारतीय आर्मीच्या चढाईपूर्वी एका अमेरिकन अभियानातून नवांग गोंबू यांनी एव्हरेस्ट मोहीम पूर्ण केली होती.

अवतार सिंह चिमा आणि नवांग गोंबू यांच्यानंतर २२ मे रोजी सोनाम ग्यात्सो आणि सोनाम वांग्याल, २४ मे रोजी सीपी वोहरा आणि आंग कामी आणि २९ मे रोजी हरी पाल सिंह अहलुवालिया, हरीश रावत आणि फू दोरजी हे एव्हरेस्टवर पोहोचले होते.

९ जणांच्या टीमने एव्हरेस्टची यशस्वीपणे चढाई करणं हा देखील त्यावेळी एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढची जवळपास १७ वर्षे त्यांच्याच नावावर होता.

त्यापूर्वी  भारतीय आर्मीने १९६० आणि १९६२ साली एव्हरेस्ट चढाईचे २ अयशस्वी प्रयत्न केले होते, परंतु पहिल्या प्रयत्नात ७०० फुटांचं अंतर बाकी असताना तर दुसऱ्या प्रयत्नात ४०० फुटांचं अंतर बाकी असताना खराब वातावरणामुळे भारताला या मोहिमा उरकत्या घ्याव्या लागल्या होत्या.

मात्र मे १९६५ साली भारताने एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आणि देश जगभरातील एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला. कर्नल चिमा यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ‘अर्जुन’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आलं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.