आईनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताला आव्हान देणारा भारतीय गणितज्ञ हलाखीत जीवन जगतोय !

बिहारचे जगविख्यात गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह हे आज हलाखीचं जीवन जगताहेत. आपल्यापैकी अनेकांसाठी हे नाव नवीन असेल, परंतु कधीकाळी या गणितज्ञाच्या प्रतिभेला जग सलाम करत होतं. किंबहुना आज देखील त्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास केला जातो.

कोण आहेत वशिष्ठ नारायण सिंह…?

२ एप्रिल १९४२ रोजी बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर गावात वशिष्ठ नारायण सिंह यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. गणितात तर त्यांना सुरुवातीपासूनच फार रुची होती.

गणितात ते इतके हुशार होते की कॉलेजमध्ये असताना आपल्या शिक्षकांच्या चुका ते लक्षात आणून देत असत. त्यांच्या याच हुशारीमुळे पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांना शेवटच्या वर्षाची परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती.

पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या हुशारीने प्रभावित झालेले  कॅलीफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक जॉन कैली त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत घेऊन गेले. अमेरिकेत पी.एच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांना नासामध्ये संशोधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नासामध्ये देखील अनेकजण त्यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होते.

नासामाधल्या कामादरम्यान त्यांच्याबद्दलचा एक किस्सा असा सांगितला जातो की काम करत असताना एकवेळा नासाचे ३१ कॉम्प्युटर अचानक बंद पडले होते. त्यावेळी त्या कॉम्प्युटर्सवर कुठलेतरी गणिती कॅल्क्युलेशन सुरु होते. पण वशिष्ठ नारायण सिंह यांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं, कारण त्यांनी आपलं उत्तर कॉम्प्युटरपूर्वीच काढलं होतं.

थोड्या वेळाने जेव्हा कॉम्प्युटर पूर्ववत सुरु झाले आणि कॉम्प्युटरवरचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले त्यावेळी आजूबाजूचे संशोधक तोंडात बोट घालून त्यांच्याकडे बाघायचेच बाकी होते कारण कॉम्प्युटरने काढलेलं उत्तर आणि वशिष्ठ नारायण सिंह यांनी काढलेलं उत्तर अगदी तंतोतंत जुळत होतं.

वशिष्ठ नारायण सिंह यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या जगप्रसिद्ध सापेक्षवादाच्या सिद्धांताला देखील आव्हान दिलं होतं. त्यांच्या या आव्हानामुळे जगभरातील गणितज्ञ आश्चर्यचकित झाले होते. एवढचं नाही तर गणितातल्या गौस थेअरीला देखील त्यांनी आव्हान दिलं होतं.

काही काळ नासामध्ये घालवल्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबई आणि आयएसआय कोलकाता येथे देखील प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. पण काही काळानंतर त्यांना सिजोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रासलं.

या आजारामुळे त्यांच्या एकूण वर्तनात बदल झाला. छोट-छोट्या गोष्टींवरून ते चिडचिड करू लागले. त्यांच्यामते काही सहकारी प्राध्यापकांनी त्याचं संशोधन स्वतःच्या नावे प्रकाशित केलं, त्यामुळे त्याची मानसिक स्थिती अजूनच बिघडली. मध्यंतरी तर ते अचानक गायबच झाले आणि मग काही दिवसांनी बिहारमधील एका गावात लोकांना ते सापडले.

तेव्हापासून ते आता आपल्या घरातच असतात. त्याचे बंधू त्यांची काळजी घेतात. सरकारने त्यांच्या उपचाराकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकले नाहीत, असा आरोप त्यांचे कुटुंबीय करतात.

गेल्या कित्येक वर्षांपासून सिजोफ्रेनियाशी लढत हलाखीचं जीवन जगणाऱ्या वशिष्ठ नारायण सिंह यांच्या आयुष्यावर प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक प्रकाश झा लवकरच एक चित्रपट बनवणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. प्रकाश झा यांची मुलगी प्रीती सिन्हा आणि विनय सिन्हा हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.