भारतात रंगीत टीव्ही आणणारे वसंतराव साठे.
आज आपण जेव्हा घरामध्ये LCD आणि LED बाबत चर्चा करत असतो तेव्हा आपणाला हे पटणं देखील अवघड होवून जाईल की भारतात रंगीत टिव्ही आणण्यासाठी एक मराठी नेता रात्रदिवस राबत होता. माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कारभार पाहत हा व्यक्ती विरोध करणाऱ्या संघ, समाजवादी, कम्युनिष्टच काय तर खुद्द आपल्या पक्षातल्या व मंत्रालयातल्या लॉबीला देखील टक्कर देत रंगीत टिव्ही आणण्यासाठी झपाटून गेलेला.
ही गोष्ट आहे कॉंग्रेसचे नेते वसंत साठे यांची.
वसंत साठे कलरफुल्ल माणूस. त्यांच्याच लिखाणातून उतरलेलं एक वाक्य म्हणजे, “जब तक सुरज चांद रहैंगा इंदिरा तेरा नाम रहैंगा..”
वसंत साठेंचा जन्म झाला नाशिकमध्ये झाला. पुढे ते नागपुरला स्थलांतरित झाले. आणि कट्टर विदर्भवासी म्हणून ओळखले जावू लागले. सन १९७२ मध्ये ते अकोला मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आले. त्यानंतर आलेल्या आणिबाणीच्या काळात ते इंदिरा गांधीचे एकनिष्ठ म्हणून गणले जावू लागले. या आणिबाणीचा उल्लेख विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व असा केला होता. यामागे देखील वसंत साठे असल्याचं सांगितलं जातं. इंदिरा गांधीची हूकुमशाही पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. जनता पक्षाच्या या सुवर्णकाळात व इंदिरा गांधीच्या कठिण काळात वसंत साठे इंदिराजींच्या पाठीमागे एकनिष्ठपणे उभा राहिले. जनता सरकार कोसळलं आणि नव्याने आलेल्या इंदिरा सरकारमध्ये वसंत साठे माहिती व नभोवाणी मंत्री झाले.
याच दरम्यान भारतात पहिल्या आशियाई खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. खेळाच्या नियोजनासाठी भारत सज्ज होत होता. त्यावेळी भारतात या सामन्यांच प्रक्षेपण रंगीत दूरचित्रवाणीवरुन व्हावं अस मत पुढं आलं. खुद्द इंदिरा गांधीना देखील तसच वाटत होतं पण हे रंगीत टिव्ही येणार कसे हा महत्वाचा प्रश्न होता.
माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कारभार पाहणारे वसंत साठे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ती माहिती पाहून त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की, एक प्रचंड मोठ्ठी लॉबीच भारतात रंगीत टिव्हींचा विरोध करत आहे. यात ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्हीचे व्यापारी देखील होते, कॉंग्रेसचे बड्डे मात्तब्बर पण होते आणि रंगीत साम्राज्यवादाची भिती दाखवणारे संघापासून ते कम्युनिस्टांपर्यन्त सर्वच कार्यरत होते.
या सर्वच गोष्टीचा अंदाज घेवून साठेंनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत रंगीत टिव्हीचा प्रस्ताव मांडला. तेव्हा दूरदर्शनच्या साध्या मनोऱ्यावरुन रंगीत प्रक्षेपण करता येणार नाही अस सांगण्यात आलं. त्यासाठी विशेष उपकरणाची आवश्यकता होती. साठेंनी चौकशी करुन दिल्लीतल्या अमेरिकन अॅम्बेसितून ते उपकरण मागवलं. रात्री अकरा नंतर त्याची चाचणी घेण्यात आली. ती पुर्ण यशस्वी झाली आणि साठेंनी अधिकाऱ्यांचा पहिला शब्द खोटा ठरवलां.
लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन रंगीत टीव्ही ठेवून हे प्रक्षेपण इंदिरा गांधींना दाखवण्यात आलं.
तोच नविन प्रश्न समोर आलां, तो म्हणजे हे रंगीत प्रक्षेपण देशभर दाखवणं शक्य नाही. त्यासाठी देशभरात खांबाखांबावर स्वतंत्र अॅंन्टिना कसा बसवणार हा प्रश्न पुढे आला. तेव्हा दूरदर्शनच्या अॅन्टिना मोठ्ठे आकाराचे व सिमेंटचे असत त्याचं पुर्ण देशभर जाळ निर्माण करण अशक्य होतं. साठेना हे अशक्य असल्याचं सांगण्यात आलं. साठेंनी लगेच शोध घेतला व अॅल्युमिनियमचे देखील अॅन्टिने असतात अस अधिकाऱ्यांना प्रांजळपणे सांगितलं..
वसंत साठे रंगीत टिव्ही साठी झटत असताना विरोधकांनी त्यांना बदनाम करण्याचा हरएक प्रयत्न चालवला होता. साठे आणि एका पत्रकार महिलेचे संबध असून त्यांच्या लग्न होणार आहे अशा बातम्या दिल्लीच्या राजकिय वर्तूळात पेरण्यात आल्या. त्यांची बदनामी करण्याची उच्च पातळी अशी होती की, वसंत साठेंच्या लग्नपत्रिका देखील छापण्याचे उद्योग काही जणांनी केले.
पण साठे हरले नाहीत शेवटी तो दिवस उजाडलाचं जेव्हा वसंत साठेंच्या प्रयत्नांना यश आलं आणि भारतातील आशियाई सामने कलरफूल झाले…