काँग्रेसमधला नेता ज्याने जवाहरलाल नेहरूंना पराभवाचं तोंड दाखवलं !

राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन.

स्वातंत्र्यसैनिक, प्रख्यात वकील आणि पत्रकार, भाषा अभ्यासक असणारे पुरुषोत्तम दास टंडन हे काँग्रेसमध्ये राहून पंडित जवाहरलाल नेहरूंचा खुलेपणाने विरोध करणारे राजकीय नेते म्हणून ओळखले जायचे.

पुरुषोत्तम दास टंडन यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि त्यांचं एकूणच भारतीय समाजाच्या घडणीतलं योगदान लक्षात घेऊन १९४८ साली त्यांना ‘राजर्षी’ या उपाधीने आणि ‘भारतरत्न’ या सन्मानाने देखील गौरविण्यात आलं होतं.

कोण होते पुरुषोत्तमदास टंडन..?

१ ऑगस्ट १८८२ रोजी तत्कालीन इलाहाबाद आणि आताच्या प्रयागराजमध्ये जन्मलेले पुरुषोत्तम टंडन यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. इलाहाबादच्या म्योर सेन्ट्रल कॉलेजमधून शिक्षण घेत असताना त्यांच्या क्रांतिकारी कृत्यांसाठी त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं.

काही दिवस इलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यासाठी त्यांनी वकिली बंद केली. १८९९ साली ते काँग्रेसमध्ये सक्रीय झाले आणि पुढे काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून उदयास आले.

१९१९ साली जालियानवाला बाग हत्याकांडाच्या अभ्यासासाठी काँग्रेसची जी समिती बनली, तिचे देखील ते सदस्य होते. १९९१ मध्ये गांधीजी गोलमेज परिषदेहून परतण्यापूर्वी देशातल्या ज्या मोठ्या नेत्यांना इंग्रजांनी अटक केली होती, त्यात जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबरच पुरुषोत्तमदास टंडन यांचा देखील समावेश होता.

हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्वाची भूमिका

हिंदी भाषेवर अतीव प्रेम असणारा आणि हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून दर्जा मिळवून देण्यासाठी झटणारा नेता म्हणून देखील टंडन यांना देशाच्या इतिहासात कायम लक्षात ठेवलं जाईल. त्यासाठीच त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील गौरविण्यात आलं होतं.

१९१० सालचं ‘हिंदी साहित्य संमेलन’ असेल किंवा १९१८ साली ‘हिंदी  विद्यापीठ’ आणि १९४७ सालच्या ‘हिंदी रक्षक दला’ची स्थापना असेल या गोष्टींचे कर्तेधर्ते तेच होते. हिंदींच्या समर्थनात उतरलेल्या टंडन यांच्यावर अनेक वेळा इतर भाषांचे विरोधी असल्याचा आरोप देखील लावण्यात आला होता.

हिंदी प्रती  त्यांचं प्रेम इतकं होतं की जेव्हा हिंदीच्या लिपीच्या मुद्द्यावर वाद उभा राहिला त्यावेळी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या देखील  विरोधात उभे राहिले होते.

….आणि नेहरूंचा पराभव झाला !

काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या टंडन यांचे जवाहरलाल नेहरू यांच्याशी मात्र अनेक मुद्यांवर मतभेद होते. त्याकाळात काँग्रेसमध्ये राहून खुलेपणाने नेहरूंना विरोध करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. एवढंच काय तर त्यांच्यामुळेच नेहरूंना पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं.

टंडन आणि नेहरू यांच्यात झालेल्या या प्रतिष्ठेच्या लढाईविषयी ज्येष्ठ पत्रकार इंदर मल्होत्रा यांनी  ए फस्ट प्रिन्सिपल्स  डीसॅग्रीमेंट’ या लेखात तपशीलवारपणे लिहिलंय

साल होतं १९५०. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक.

निवडणुकीसाठी ३ उमेदवार मैदानात होते. आचार्य कृपलानी, शंकरराव देव आणि पुरुषोत्तमदास टंडन. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापलेलं होतं. नेहरू-पटेल गटामध्ये चाललेल्या संघर्षात टंडन हे सरदार पटेल यांच्या गटात होते.

खरं तर नेहरूंच्या मते काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिघांपैकी कुणीच योग्य उमेदवार नव्हता. त्यामुळे नेहरूंनी टंडन यांना पत्र लिहून आपली उमेदवारी मागे घेण्याविषयी कळवलं होतं. परंतु टंडन यांनी त्यासाठी नकार दिला.

डावीकडून पुरुषोत्तम दास टंडन आणि जवाहरलाल नेहरू

टंडन यांना असलेला सरदार पटेल यांचा पाठींबा लक्षात घेता, ते निवडून येण्याची शक्यता अधिक असल्याने केवळ त्यांच्या पराभवासाठी म्हणून नेहरूंनी आचार्य कृपलानी यांना आपला पाठींबा जाहीर केला होता.

निवडणूक पार पडली. टंडन यांना पडले १३०६ मतं आणि कृपलानी यांना पडले १०९२ मतं. २०२ मातांसह शंकरराव देव तिसऱ्या स्थानावर राहिले. पुरुषोत्तमदास टंडन यांनी आचार्य कृपलानी यांचा पराभव करत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. नेहरूंसाठी हा पराभव फारच धक्कादायक होता.

हा पराभव नेहरूंना इतका जिव्हारी लागला होता की त्यांनी टंडन यांचा विजय हा ‘सांप्रदायिक शक्तींचा विजय’ असल्याचं सांगत त्यांनी ‘काँग्रेस वर्किंग कमिटी’मध्ये सहभागी व्हायला देखील नकार दिला होता. परंतु त्यानंतर ते वर्किंग कमिटीमध्ये सहभागी झाले.

देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना नेहरूंचे  काँग्रेसच्या अध्यक्षपदावरील टंडन यांच्याशी अनेक मुद्द्यावर मतभेद होतंच राहिले. त्यानंतर जुलै १९५१ साली  नेहरूंनी ‘काँग्रेस वर्किंग कमिटी’चा राजीनामा दिला.

नेहरूंच्या राजीनाम्याने वातावरण परत तापलं. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि सर्वानीच आपले राजीनामे द्यायचं ठरवलं. टंडन यांच्या नेतृत्वाखाली नेहरूंनी नवीन वर्किंग कमिटी स्थापन करावी असा  प्रस्ताव  वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी नेहरू यांच्यापुढे ठेवला.  नेहरूंनी वर्किंग कमिटीच्या सदस्यांचा हा प्रस्ताव देखील नाकारला.

त्यानंतर प्रकरण ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या बैठकीत चर्चेस आलं. त्यावेळी पुरुषोत्तम दास टंडन यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

हे ही वाच भिडू