कधीही भारतात पाऊल न ठेवलेल्या माणसाने देशाचे तुकडे केले होते !

१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन.

ब्रिटीश सत्तेच्या गुलामगीरीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि देशाने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. पण या स्वातंत्र्याला फाळणीच्या दुखाची किनार देखील होती.

१७ ऑगस्ट १९४७.

ही तीच तारीख होती ज्या दिवशी फाळणीच्या भळभळत्या जखमेवर ‘रेडक्लिफ रेषे’च्या माध्यमातून मीठ चोळण्यात आलं होतं. थोडक्यात काय तर याच दिवशी भारत आणि पाकीस्तान या दोन स्वातंत्र्य राष्ट्रांचं वेगळं अस्तित्व दाखवणारी आणि दोन्ही देशांचे भूप्रदेश वेगळे करणारी ‘रेडक्लिफ रेषा’ अस्तित्वात आली होती.

रेषेला ‘रेडक्लिफ रेषा’ असं का म्हणतात..?

भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमांची विभागणी करणाऱ्या या रेषेला ‘रेडक्लिफ रेषा’ हे  नांव ही रेषा खेचणाऱ्या ‘सिरील रेडक्लिफ’ या अधिकाऱ्याच्या नावावरून देण्यात आलं होतं. सिरील रेडक्लिफ यांच्याच नेतृत्वाखालील आयोगाने भारत-पाक सीमांच्या विभागणीची योजना तयार केली होती.

कोण होते सिरील रेडक्लिफ..?

सिरील रेडक्लिफ हे व्यवसायाने वकील होते.

३ जुलै १९४७ रोजी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीवर शिक्कामोर्तब केलं आणि पुढच्या काहीच दिवसात देशांच्या सीमा निश्चित करण्यासाठी  सिरील रेडक्लिफ यांना भारतात पाचारण करण्यात आलं होतं.

८ जुलै १९४७ रोजी रेडक्लिफ यांचं भारतात आगमन झालं.

खरं तर रेडक्लिफ हे त्यापूर्वी कधीही भारतात आले नव्हते, ना त्यांना भारताच्या भौगोलिक परिस्थितीची कसलीही कल्पना होती. शिवाय त्यांना त्यापूर्वी सीमा रेषांच्या विभागणीचा कसलाही अनुभव नव्हता. तरी देखील भारत-पाक सीमा विभागणीची एवढी महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती.

एवढ्या महत्वाच्या गोष्टीसाठी रेडक्लिफ यांना वेळ देण्यात आला होता अवघ्या एका महिन्याचा.

Screenshot 1

एका महिन्याच्या कालावधीत एवढ्या महाकाय देशाची विभागणी करणं हे काही खायचं काम नव्हतं. साहजिकच घाईगडबडीत हे काम झाल्याने त्यातून मोठा गोंधळ निर्माण होणार होता. झालंही अगदी तसंच. ९ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा रेडक्लिफ यांनी विभागणीची प्रक्रिया पूर्ण करून  त्याचा अंतिम मसुदा तयार केला, त्याला कसल्याही सर्वेक्षणाचा किंवा अभ्यासाचा आधार नव्हता.

अनेक प्रदेश असे होते की ज्यांचा अर्धा भाग भारतात तर अर्धा भाग पाकिस्तानात गेला होता. प्रदेशाचं सोडूनच द्या, अनेक घरे अशी होती की ज्यातील काही खोल्या भारतात तर काही काही पाकिस्तानात गेल्या होत्या. अशी ही विचित्र परिस्थिती होती. फाळणीनंतरचा जो रक्तपात झाला, त्याला या गोष्टी देखील बहुतांशी जबाबदार होत्या.

लाहोर पाकिस्तान का देण्यात आलं..?

लाहोर हे शहर पाकिस्तानला देण्यामागे देखील अतिशय रंजक किस्सा होता. प्रख्यात पत्रकार कुलदीप नय्यर यांनी एकदा इंग्लंडमध्ये रेडक्लिफ यांची भेट घेतली होती. त्यावेळी खुद्द सिरील रेडक्लिफ यांनीच हा किस्सा नय्यर यांना सांगितला होता.

बीबीसीशी बोलताना नय्यर यांनी हा किस्सा सांगितलाय. नय्यर म्हणतात की रेडक्लिफ यांनी त्यांना सांगितलं होतं की लाहोर पाकिस्तानला फक्त एवढ्याचसाठी देण्यात आलं होतं कारण पाकिस्तानात दुसरं कुठलंच मोठं शहर नव्हतं.

रेडक्लिफ यांच्याच भाषेत सांगायचं तर ते म्हणतात की, “सीमांच्या विभागणीसाठी माझ्याकडे फक्त १० ते १२ दिवसांचा वेळ होता. माझ्याकडे कुठल्याही जिल्ह्यांचे नकाशे नव्हते. फक्त या भागाची पाहणी करण्यासाठी एकवेळा मी विमानाने दौरा केला होता.

लाहोरमध्ये अनेक हिंदू लोकांच्या स्थावर मालमत्ता होत्या. त्यामुळे ते भारताला द्यायचं होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की पाकिस्तानला द्यायला दुसरं कुठलं मोठं शहरच नाहीये. मग मी लाहोर भारतातून उचलून पाकिस्तानला देऊन टाकलं. आता तुम्ही याला बरोबर म्हणा किंवा चूक पण त्यावेळी माझा नाईलाज होता”

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.