मोहम्मद सलाह – इजिप्तमधील फुटबॉल क्रांतीचा नायक…!!!
८ ऑक्टोबर २०१७. २०१८ च्या फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील इजिप्त विरुद्ध काँगो सामना. हा सामना म्हणजे इजिप्तसाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती. सामना जिंकून १९९० नंतर प्रथमच वर्ल्ड कपमध्ये पात्रता मिळविण्याची इजिप्तला सुवर्णसंधी, पण त्याच वेळी सामना गमावला किंवा अनिर्णीत जरी राहिला तर थेट घरचा रस्ता पकडावा लागण्याची भीती. इजिप्तच्या फुटबॉल चाहत्यांच्या नजरा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील आपला स्टार खेळाडू मोहम्मद सलाहवर खिळलेल्या. आणि असूही का नयेत कारण मोहम्मद सलाहच तो खेळाडू होता, ज्याने इजिप्तला आत्तापर्यंतची वाट दाखवली होती. या सामन्यापूर्वी सलाहने ३ गोल आणि २ गोलसाठी असिस्ट अशी कामगिरी नोंदवत चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली होती.
सामना सुरु झाला आणि मैदान सलाहच्या नावाच्या घोषणांनी दुमदुमून गेलं. सामन्याच्या ६२ व्या मिनिटाला गोल करत सलाहने परत इजिप्तच्या आशा उंचावल्या, पण अजून बरंच नाट्य बाकी होतं कारण सामन्याच्या ८६ व्या मिनिटाला काँगोच्या संघाने इजिप्तची गोलपोस्ट भेदली आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. आता इजिप्तचे चाहते परत निराशेच्या गर्तेत. निर्धारित ९० मिनिटात स्कोअर बोर्ड १-१ अशी बरोबरी दाखवत होता. शेवटी रेफ्रींनी ५ मिनिटांचा ‘इंज्युरी टाईम’ देण्याचा निर्णय घेतला. हा वेळ संपायला देखील फक्त एक मिनिट बाकी आणि बरोबरी कायम. अशा परिस्थितीत इजिप्तला पेनल्टी मिळाली. स्ट्रायकर होता अर्थातच मोहम्मद सलाह. आता परत प्रार्थना सुरु झाल्या होत्या. सलाहच्या नावाचा नामजप सुरु झाला. सलाहने बॉल मारला, तो गोल कीपरला चकवत थेट काँगोच्या गोलपोस्टमध्ये जाऊन धडकला. मैदानात इजिप्तच्या चाहत्यांचा एकच जल्लोष. इतिहास घडला होता, काँगोचा २-१ असा पराभव करत १९९० नंतर प्रथमच इजिप्त विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
मोहम्मद सलाह. ‘इजिप्शियन किंग’ या नावाने जगप्रसिद्ध असणारा हा फुटबॉलर गेल्या दोन ते अडीच वर्षात जागतिक फुटबॉलच्या क्षितिजावर तेजस्वीपणे तळपतोय. इजिप्त आणि संपूर्ण मध्य-पूर्व आशियात सलाहचं जे क्रेझ आहे, त्याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकते. सध्या इजिप्तमध्ये भिंतीवरील पोस्टरपासून ते रमजानच्या सजावटीपर्यंत जिकडे तिकडे फक्त सलाहच बघायला मिळतोय. २०११ च्या ‘अरब स्प्रिंग’नंतर अस्थिर झालेल्या इजीप्शियन लोकांना जल्लोषाची जी काही संधी मिळू लागलीये, त्यामागे असलेलं नांव म्हणजे मोहम्मद सलाह. आजघडीला इजिप्तचा जागतिक पातळीवरील चेहरा म्हणून तो समोर आलाय. या सगळ्यांचा परिणाम असा की, इजिप्तमधील सरकार असो किंवा सरकारविरोधी कारवायांमध्ये समाविष्ट असणाऱ्या मुलतत्ववादी संघटना असोत सगळ्यांनाच सलाह प्रिय वाटतो.
इजिप्तमध्ये असलेलं सलाहचं वेड हे काही फक्त तो आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्टार खेळाडू आहे म्हणून नाही, तर स्टार होऊन देखील इजिप्तच्या मातीशी असलेलं नातं तो विसरलेला नाही म्हणून देखील आहे. सलाहचं वेगळेपण हे की तो काही जागतिक फुटबॉलमधल्या इतर स्टार खेळाडूंसारखा नावाजलेल्या क्लबमधून तयार झालेला नाही तर त्याच्यातला फुटबॉलर इजिप्तच्या मातीत बहरलाय. हीच माती त्याला इजिप्शियन लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडून ठेवते. इजिप्तमधील जनता ज्या आर्थिक-सामाजिक-राजकीय परिस्थितीत वाढते त्याच परिस्थितीत तो लहानचा मोठा झालाय. म्हणूनच तो सगळ्यांना आपल्यासारखाच वाटतो.
सलाहची क्रेझ फक्त इजिप्त आणि मध्य-पूर्व आशियातच आहे असं नाही तर ‘इंग्लिश लीग’मध्ये तो लिव्हरपूलच्या संघाकडून खेळत असल्याने युरोपियन फुटबॉल चाहत्यांच्या देखील तो गळ्यातला ताईत बनलाय. लिव्हरपूलचे चाहते तर अलीकडे आपल्या संघाच्या जगप्रसिद्ध ‘यु विल नेव्हर वॉक अलोन’ या घोषणेबरोबरच अजून एक घोषणा देऊ लागलेत.
ती घोषणा म्हणजे-
If he is good enough for you, he is good enough for me.
If he scores another few, then I will be Muslim too.
होय, सलाहच्या वेडापायी त्याच्या चाहत्यांची मुस्लीम धर्म स्वीकारण्याची देखील तयारी दर्शवलीये.
येत्या काही दिवसात सुरु होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इजिप्तचा संघ कशी कामगिरी नोंदवेल…? त्यात सलाह करिष्माई कामगिरी करू शकेल की नाही…? या प्रश्नांची उत्तरं यथावकाश मिळतीलच, पण इथपर्यंत पोहोचण्याचा इजिप्तचा प्रवास निश्चितच संघर्षपूर्ण राहिलाय. हा प्रवास थोडासा सुकर करण्यात मोहम्मद सलाहने मोठी भूमिका बजावलिये, आणि म्हणूनच सध्या तो इजिप्शियन लोकांसाठी ‘डार्लिंग’ बनलाय.