तर ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये अमिताभ बच्चनच्या जागी आपल्याला राजीव गांधी दिसले असते…

बिग बी अमिताभ बच्चन यांना सिनेमात एस्टॅब्लिश होण्यासाठी मोठ्या संघर्षमय काळातून जावे लागले. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या १९६९ सालच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांचा रूपेरी पडद्यावर प्रवेश जरी झाला असला, तरी त्यांना चित्रपटात भूमिका मिळणे खूप दुरापास्त झाले होते. तसेच त्यांच्या चित्रपटांना यश देखील मिळते नव्हते.

बऱ्याचदा त्यांना चित्रपटासाठी साईन केले जायचे; परंतु काही काळानंतर त्यांना सिनेमातून काढून त्यांच्या जागी दुसरा नायक घेतला जायचा. सगळीकडून अपयश, अवहेलना आणि अपमान यांचा सामना ते करत होते.

याच संघर्षमय काळातील अमिताभ बच्चन यांचा हा किस्सा आहे.

‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटात अन्वर अली या हास्य अभिनेता मेहमूदच्या भावाने देखील एका हिंदुस्तानीची भूमिका केली होती. मुंबईच्या संघर्षमय काळात अन्वर अलीच्या घरीच अमिताभ राहत असे. अमिताभ बच्चन मुंबईमध्ये रोज निर्मात्यांचे दरवाजे खटकवत होते. आश्वासनं मिळत होती. स्वप्न रचली जात होती पण काही दिवसात ती विस्कटली पण जात होती.

अन्वर अलीचा भाऊ मेहमूद त्यावेळी त्याच्या ‘बॉम्बे टू गोवा’ या सिनेमाच्या तयारीत होता. या सिनेमात भूमिका मिळावी म्हणून बच्चन यांचेही प्रयत्न सुरू होते.  

अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांची लहानपणापासूनची मैत्री होती. राजीव गांधी त्यावेळी  राजकारणात नव्हते, ते वैमानिक म्हणून ‘Indian Airlines’ मध्ये कार्यरत होते. एकदा मुंबईत आले असता ते अमिताभ बच्चन यांना भेटायला अन्वर अलीच्या छोट्या फ्लॅटमध्ये आले. 

दोन मित्रांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली. गप्पाटप्पा झाल्या आणि दोघे झोपी गेले. रात्री उशिरा मेहमूद अन्वर अलीच्या फ्लॅटवर आला. त्यावेळी मेहमूदला ड्रग्ज घ्यायचे व्यसन लागले होते. ड्रिंक्स देखील खूप घ्यायचा. त्यामुळे अर्थातच तो शुद्धीत नव्हता. 

मेहमूद आपल्या आगामी ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाची स्टारकास्ट त्या काळात फायनल करत होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना ही भूमिका आपल्याला मिळावी असे खूप वाटत होते. त्यासाठी त्यांनी  अन्वर अलीच्या मार्फत मेहमूदच्या कानावर देखील ही गोष्ट घातली होती. 

त्या रात्री जेव्हा मेहमूद अन्वर अलीच्या  फ्लॅटवर आला त्यावेळी बेडरूममध्ये राजीव गांधी झोपले होते. मेहमूदने त्यांना बघितले आणि अन्वरला तिथल्या तिथे म्हणाला “हा इथे झोपलेला तरुण माझ्या पुढच्या सिनेमाचा नायक असेल. त्याला पाच हजार रुपये ऍडव्हान्स देऊन त्याला बुक करून टाक.” 

ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर घडत होती. आपल्या डोळ्यादेखत आपला ड्रीम रोल निसटून चालला होता. मेहमूदला अन्वर अली म्हणाला “पण आपण हा रोल अमिताभ बच्चन यांना द्यायचे ठरवले आहे!” 

त्यावर मेहमूद म्हणाला “हो ठरवले आहे, पण दिला कुठे? हा जो तरुण झोपला आहे तो किती हँडसम आहे गोरापान  आहे!  मी यालाच ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील हिरोची भूमिका देणार आहे.

मेरी अगली फिल्म का हिरो ये छोकरा होगा!” 

त्यावर अन्वर अली मेहमूदला म्हणाला, “आप जानते है ये लडका कौन है?” मेहमूदने नकारार्थी मान डोलावली. 

अन्वर अली म्हणाले, “आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हा मुलगा आहे. राजीव गांधी. हा सिनेमात अजिबात काम करणार नाही. कारण तो वैमानिक म्हणून काम करत आहे!”

पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा आपल्या फ्लॅटमध्ये झोपला आहे, हे ऐकून मेहमूदची उतरली आणि त्याने सॉरी म्हणत ही भूमिका अमिताभना द्यायचं कबूल केले. अमिताभ यांनीही रवी कुमारच्या भूमिकेत लोकांची मनं जिंकली आणि सुपरस्टार होण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.