सरकारी नोकरीत असलेल्या मेळघाटच्या हत्तींना पगार, सुट्ट्या इतकच काय पेन्शन पण आहे !!

आज मकर संक्रांत. ऑफिस सुटून घरी जायचा टाईम झालाय. व्हॉट्सअप्प वर गोड बोलायचे अजीर्ण मेसेज स्क्रोल करत पुण्यामुंबईत नोकरीला आलेला खंडेराव बसलाय.

त्याला आईच्या हातच्या गुळपोळीची आठवण येत असल. सांच्याला गल्लीत वाटायला जात असलेल्या तिळगुळाची आठवण येत असल पण भविष्याच्या चिंतेन त्याला घेरलंय. घराच्या इएमआयने पछाडलाय. पेपर मध्ये येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याच्या सातवा कि आठवा वेतन आयोगाच्या बातम्या ऐकून कावलाय.

अशा सगळ्या भिडूसाठी एक खास कडू माहिती.

विदर्भात मेळघाट नावाच जंगल आहे हे तुम्ही शाळेत शिकलाच असाल. तिथ वाघ असतेत. तर आजचा विषय वाघांचा नाही तर हत्तींचा आहे.

मेळघाट व्याघ्रप्रकल्पात तिथ आलेल्या पर्यटकांना फिरवायला चार हत्तींची अपॉइन्टमेंट झालेली आहे. बर हे हत्ती तस म्हटल तर आठवडाभर राब राब राबतात. पर्यटकांना आपल्या पाठीवर घेऊन अख्खं जंगल पालथं घालतात.

वेळप्रसंगी रस्त्यात कोसळलेले झाड बाजूला काढतात. जंगलातली मोठी मोठी लाकडे वाहून आणतात. आता एवढ काम करत आहेत म्हटल्यावर आपल मायबाप सरकार त्यांना साप्ताहिक सुट्टी देते.

इथ पर्यंत ठीक आहे. पण या हत्तींच्या बाकीच्या फॅसीलिटी बघितला तर तुम्ही पण चक्रावून जाल.

सदर हत्ती नामक प्राण्यांना जंगलातील इतर कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वेतन आयोगाच्या नियमानुसार दर आठवड्याला एक सुट्टी असतेच पण शिवाय वर्षातून एकदा सलग ३० दिवसांची रजा मिळते. (तुम्हाला आहे का सुट्टी? )

या हत्तींनी काय खावं यासाठी एक डायट रजिस्टर बनवलेला आहे. प्रत्येक हत्तीने रोज काय खाल्ल? किती वाजता खाल्लं याची नोंद केलेली असते.

या हत्तींना खाण्यासाठी दिवसाला दहा किलो आटा, एक किलो गुळ, एक पाव तेल, एक पाव मीठ हे रेशन शासनाकडून पुरवलेल असत. या रेशन मधून त्यांना दररोज पोळ्या बनवल्या जातात. मग संध्याकाळच्या जेवणात हत्ती गुळपोळी फस्त करतात.

जेवण झाल कि त्यांना मोकळ सोडल जात. त्यानंतर जंगलात मस्त पैकी चारा चरत फिरतात आणि बरोबर नाश्त्याच्या वेळेला परत गुळपोळी खायला हजर !!

(आता आपल्याला संक्रांतीला गुळपोळी खायला मिळेना आणि ते हत्ती बघा. )

वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना रिटायरमेंट दिली जाते. या रिटायर झालेल्या हत्तीला पेन्शन मिळते. 

पेन्शन म्हणजे काय तर आधी मिळत होता त्याच्या निम्मा आहार हत्तींना मरेपर्यंत शासनाकडून दिला जातो. तेव्हा त्यांना कोणतेही काम लावले जात नाही. वेतन आयोग बदलला कि हत्तींच्या निधीमध्येसुद्धा वाढ होते.

आता तुम्ही या हत्तींवर जळत असाल. तर हत्तींना जे मिळतंय त्यासाठी ते डिझर्व्ह करतात.

मेळघाटच्या या जंगलात हत्ती राबतातसुद्धा भरपूर. वन्यजीवसंवर्धन आणि पर्यटनविकास यासाठी गेले काही वर्ष सरकार भरपूर प्रयत्न करत आहे. वाघांची संख्या वाढावी यासाठी जंगलात हे हत्ती आणि त्यांचे कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत आहेत.

त्यामुळे हत्तींवर जळू नका, आपल्या बॉसला हा लेख वाचायला द्या, कामगार कायद्यांची आठवण करून द्या. मार्क्स म्हणून कोणी तरी सांगून गेलाय जगभरातल्या कामगारानो आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन आवाज उठवा.

आणि मेळघाटच्या हत्तीसारख पेन्शन खा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.