म्हणून मेळघाटच्या ४ गावांमध्ये लसीकरण पूर्ण झालं तरी त्याचं देश पातळीवर कौतुक करावं लागतं

नुकतंच राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका लसीकरण मोहिमेचं तोंड भरून कौतुक केलेलं बघायला मिळालं. ही लसीकरण मोहीम होती आदिवासी पाड्यातील मेळघाटमधील. त्यानंतर हा लसीकरणाचा मेळघाट पॅटर्न सगळ्या राज्यात चर्चेला आला आहे. या पॅटर्नमधून सध्या इथल्या ४ गावांमध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे.

यानंतर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील राहुल गांधी यांच्या या ट्विटला रिप्लाय करत या कामाचं कौतुक केल्याबद्दल आभार मानले.

 

तसं पहिल्यांदा ऐकल्यावर वाटायला आणि दिसायला ४ हा आकडा खूप छोटा आहे. तुम्ही म्हणालं पण आमच्या इकडच्या अनेक छोट्या गावांमध्ये अशी लसीकरण पूर्ण झाली आहेत. मग तरीही ४ गावांच्या लसीकरणामध्ये असं काय विशेष आहे, राष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यासारखं या गोष्टीत असं काय आहे?

तर कौतुक आहे भिडूनों.

या ४ गावांमधील लसीकरण पूर्ण होणे म्हणजे बरंच काही विशेष आहे.

अमरावती, परतवाडा सोडून चिखलदरा-मेळघाटच्या रोडला लागलं की आपल्याला हिरवाई दिसायला सुरुवात होते. चिखलदऱ्याला जातानाचा घाट ओलांडला कि आपण विदर्भात आहोत असं वाटतचं नाही. कारण ५० किलोमीटरवर वातावरण पूर्ण बदललेलं असतं. अमरावतीमध्ये मरणाचा उकाडा तर चिखलदऱ्यामध्ये अगदी थंड वातावरण.

याच सोबत आणखी एक गोष्ट इथं वेगळी असते, ज्यामुळे आपण वेगळ्या जगात असल्याचं सतत जाणवत राहतं. ही गोष्ट म्हणजे इथलं आदिवासी जग. 

मेळघाटचा हा सगळा परिसर म्हणजे मुख्य प्रवाहापासून कोसो लांब असलेला भाग. अगदी रस्ते, वीज, पाणी यासारख्या प्राथमिक गरजा देखील अजून इथं पोहोचलेल्या नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर इथल्या धारणी तालुक्यातील परसोली ढाणा या गावाला आपला साधा पाणंद रस्ता स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर मिळणार आहे. नुकताचं त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

या सगळ्या बरोबरचं इथली संस्कृती, इथली भाषा हे देखील पूर्ण वेगळं आहे. आणि या सगळ्या उपेक्षित भागाला जोड आहे ती कमालीच्या निरक्षरतेची. त्यामुळेच वरच्यावर इथं अनेकदा अंधश्रद्धेतून लहान मुलाच्या पोटावर चटके दिलेल्या किंवा आणखी काही प्रकार केलेल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत असतात. लहान मुलांच्या कुपोषणाच्या बातम्या येत असतात.

तर अशा या मेळघाटमध्ये उत्पन्नाची साधन नसल्यामुळे अनेक कुटुंब स्थलांतरित करतात. हि कुटुंब परतात ती होळीच्या सणाला. यंदा देखील स्थलांतरित कुटुंब होळीच्या निमित्ताने घाटात परतली आणि या भागात कोरोनाचा शिरकाव झाला, हळूहळू हातपाय देखील पसरले.

या वाढत्या उद्रेकासोबत आरोग्य विभागाची चिंता देखील वाढायला लागली. त्यामुळे तपासणीसाठी सेमाडोह, बिहाली, चिखलदरा, डोमा या ठिकाणी आरोग्य विभागाची पथकं नेमण्यात आली. डोमाच्या सीमेवर पोलीस बंदोबस्तात येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवून तपासण्या चालू झाल्या. गावोगावी आरटीपीसीआर तपासणीचे कॅम्प लावण्यात आले.

या सगळ्यांमधून एप्रिलच्या शेवटाला आणि – मेच्या सुरुवातीला इथला पॉजिटिव्ह रुग्णांचा आकडा ६०० च्या घरात गेला. पण या सगळ्यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर एकमेव उपाय होता ते म्हणजे नियम पाळणं आणि वेगानं लसीकरण. 

पण हेच प्रशासनापुढचे सर्वात मोठे आव्हान होतं. कारण लसीकरणाकडे अगदी सुरुवातीपासूनच इथल्या लोकांनी पाठ फिरवली होती. लोकांनी भीती आणि गैरसमजामुळे लस घेण्यासाठी सरळ सरळ नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की दोन दोन लसी घेतलेल्यांचा पण  मृत्यू झाला आहे, मग लस घेऊन उपयोग तरी काय?

पण लसीकरण करणं तर गरजेचं होतं. त्यासाठी आशा सेविकांमार्फत इथली आकडेवारी मागवली गेली. किती जण १८ ते ४४ गटातील आहेत, किती जण ४५ ते ६० आणि ६० नंतरचे किती जण आहेत. 

आकडेवारीनुसार इथल्या शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय याठिकाणी तर लसीकरण सुरु केलं गेलं. पण त्यासोबतच इथल्या प्रशासनानं स्वतः लोकांपर्यंत पोहोचून लस देण्याचं ठरवलं. पण त्याआधी लोकांना लसीबद्दलचे गैरसमज दूर करुन, लसीच महत्व पटवून देणं गरजेचं होतं.

यातूनच कोरकू भाषेतून जनजागृती करण्याच्या कल्पनेचा जन्म झाला.

धारणीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,

कोणत्याही साथीच्या रोगाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणं ही गोष्ट देखील तेवढीच महत्वाची असते. आता मेळघाटातील लोकांची साथ आम्हाला मिळवायची असेल तर, इथल्या बांधवांना आवश्यक ती माहिती पोहोचवायची असेल तर आमच्याकडे एकचं माध्यम होतं ते म्हणजे कोरकू भाषा.

कोरकू ही आदिवासी बांधवांची मुख्य भाषा. त्यामुळे आम्ही याचं माध्यमाचा उपयोग करायचा ठरवला. यातून छोट्या छोट्या व्हिडीओंच्या मालिका बनवण्यात आल्या. या माध्यमातून साथीचं संक्रमण, आजाराची माहिती, लक्षणं, त्यावर घ्यायची काळजी, आवश्यक उपचार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीकरणाचं महत्व हे सगळं पटवून देण्यात येऊ लागलं.

याकामी मेळघाटचे सुपुत्र असलेले आणि एम.बी.बी.एस., एम.डी. डॉ. दयाराम जावरकर, सोबत वैद्यकीय अधिकारी, मेडिकल स्टाफ यांची खूप मदत झाली. ते स्वतः व्हिडीओच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष जावून संवाद साधू लागले. या जनजागृती सोबत पोस्टर, होर्डिंग सुद्धा लावण्यात आल्याचं सेठी सांगतात.

आता या सगळ्याचे परिमाण काय झाले? 

तर मेळघाटचा भाग हा साधारण ३७९ गावांचा. हळू हळू या जनजागृतीमुळे गावांमध्ये लसीकरण सुरु झाल्यावर सकारात्मक प्रतिसाद दिसून यायला लागला. आरोग्य केंद्रांवर तर लस उपलब्ध होतीच पण या सोबतच महाराष्ट्रात इतर ठिकाणी कुठे नसेल पण प्रशासनानं इथं डोअर टू डोअर लसीकरणाला सुरुवात केली. नियोजन करून प्रत्येक दिवशी २ अशी गावं घेण्यात येऊ लागली. लसीकरणाचे कॅम्प सुरु केले.

IMG 20210614 WA0011

प्रशासनाकडून या डोअर टू डोअर लसीकरण धोरणाला एवढं महत्व दिलं की अगदी गावच्या कट्ट्यावर आणि पारावार जरी लोक बसली असली तरी त्यांना लस दिली जावू लागली. त्यामुळे सुरुवातीला चिचघाट, बाहदरापूर, रुईफाटा या गावांमध्ये लसीकरण मोहिमेनं आघाडी घेतली.

IMG 20210614 WA0012

अखेरीस एक वेळ अशी आली की, ज्या गावांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती तिथलं मे च्या पंधरवड्यात ४५ वर्षावरील १०० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं. आता अलीकडेच काकीदारा या गावामधील देखील लसीकरण पूर्ण झालं आहे.

मात्र अजूनही ८० टक्के लसीकरण बाकी

मिताली सेठी पुढे बोलताना म्हणतात,

एवढ्या प्रयत्नानंतर देखील आतापर्यंत या भागात आम्ही केवळ १९ ते २० टक्केचं लसीकरण करू शकलो आहे. पण हे काम देखील आम्हाला तेवढ्याच सावधगिरीनं करावं लागत आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. कारण एकाला जरी लसीमुळे काही झालं तर आमच्या आता पर्यंतच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरेल.

जर झालेलं लसीकरण आकडेवारीत सांगायचं म्हंटलं तर चिखलदऱ्यामध्ये ६ हजारच्या आसपास पहिला डोस तर २ हजार ५०० जणांना पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस घेतल्याचं लसीकरण झालं आहे. तर धारणीमध्ये ७ हजारच्या आसपास पहिला आणि तेवढ्याच दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

मेळघाटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल देशमुख ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,

हे लसीकरण आणि त्यासाठी सुरु असलेलं कौन्सलिंग हे अजूनही सुरुचं ठेवणार आहोत. सध्या नवसंजीवनी योजनेतून प्रत्येक आरोग्य केंद्रातील काऊन्सलर्स यांच्याकडून हे काम सुरु आहे. यात रुग्णांना हॉस्पिटल, कोव्हिड केअर सेंटरमध्ये ऍडमिट होण्यासाठी तयार करणं, लस घेण्यासाठी तयार करणं अशा गोष्टी केल्या जात आहेत.

डॉ. देशमुख सांगतात, इथं दारु पिण्यासाठी सोडून प्रत्येक गोष्टीसाठी कौन्सलिंग करावं लागतं. अगदी सुरुवातीला हा असा आजार आहे इथपासून ते मास्क घाला, नियम पाळा या प्रत्येक गोष्टीसाठी कौन्सलिंग करावं लागलं होतं. त्यामुळेच इथं काम करणं हे आव्हानात्मक आहे. 

अशा सगळ्या परिस्थितीमुळे आणि आव्हानात्मक कामामुळे भिडूनों, इथल्या ४ गावांमध्ये जरी लसीकरण पूर्ण झालं तरी ते खूप महत्वाचं ठरतं. आणि त्यासाठी प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांना दाद द्यायला हवी. म्हणूनच त्यांचं राष्ट्रीय पातळीवर देखील कौतुक करावं लागतं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.