या पोरींनी केलेला कहर तोंडात बोटं घालून पाहत बसावं वाटतं.
एवढा मोकळा वेळ मिळाल्यानंतर तो घालवायचा कुठे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल, पण काही भिडू लोकांनी अनेक नवनवीन किडे करायला सुरुवात केली. लॉकडाउन सुरू झाल्यापासून लोकांची सोशल मीडियावरची ऍक्टिव्हिटी प्रचंड वाढली.
अशातच काही भिडूनी एकत्र येत आठ दहा दिवसांपूर्वी ‘मराठी मीम मॉंक्स’ हा ग्रुप फेसबुकवर सुरू केला.
काही किमान अटी मान्य करून बाकी विचारधारा वगैरेचं फिल्टर न लावता ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं गेलं. इरसाल पोरं ग्रुपवर मीम पोस्ट करू लागले, त्यावर चर्चा होऊ लागल्या.
मीम या आधुनिक माध्यमाची ताकद इतकी आहे की ज्या लोकांनी एरवी स्वतःचं एखाद्या विषयावर मत मांडण्यासाठी वीतभर पोस्ट लिहिल्या असत्या त्यांनी एका मीम मधून आपलं मत मांडायला सुरुवात केली.
शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तर #राजर्षी या शीर्षकाखाली घेतलेल्या स्पर्धेत आलेले मीम प्रचंड गाजले.
यात एक गोष्ट उल्लेखनीय होती ती म्हणजे मीम बनवण्यात सोशल मीडियावरील पोरीही आघाडीवर होत्या.
ही गोष्ट लक्षात आल्यावर मराठी मीम मॉंक्स वाल्या भिडूना एक भन्नाट आयडिया सुचली. एक दिवस फक्त मुलींची मीम स्पर्धा घ्यायची, फक्त मुलींचे मीम ग्रुपवर घ्यायचे आणि त्यातून मीम बनवणाऱ्या पोरींना व्यक्त व्हायला स्पेस द्यायचा. ही स्पर्धा काल झाली.
#मीमर_पोरी हा हॅशटॅग वापरून सकाळपासून पोरोंनी ग्रुपवर मीम टाकायला सुरुवात केली.
दिवसभर ज्या प्रमाणात या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला त्याची कल्पना सुद्धा कुणी केली नव्हती. कालच्या एका दिवसात मराठी मीम मॉंक्स ग्रुपवर फक्त पोरींचे तब्बल 350 पेक्षा जास्त मीम पडलेत! अनेक विषयावर एरवी व्यक्त न होणाऱ्या पोरींनी या स्पर्धेला संधी समजत भन्नाट मिम्स बनवलेत.
अनेक मीम वादग्रस्तही ठरले. ‘बोल्ड’ कॅटेगरीत मोडतील असे बरेच मिम्स मोक्कार भाव खाऊन गेले. एकंदर स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता सोशल मीडियावरील मराठी पोरी मीम हे माध्यम अत्यंत प्रभावीपणे हाताळू शकतात हे दिसून आलंय.
कालच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या काही पोरींनी स्पर्धा झाल्यावर त्यांचे अभिप्राय मराठी मीम मॉंक्स टीमला कळवले, त्यातले काही अभिप्राय आणि सोबत त्यांचंच एक मीम…
तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. वाचा…
1. शीतल
आजकालचे बहुतांशी मीम्स पाहिल्यावर असं वाटतं की मुली या कायम पैशाच्या मागे, गोऱ्या रंगामागे धावतात. मुलींचं आयुष्य शॉपिंग, मेकअप, सुंदर मोठया पगाराची मुलं यांच्या मागेच जातंय असं या मीम्स मधून दिसतं. कुणी मुलीने आपली परखड मतं मांडली तर त्यावर फेक फेमिनिझमचा टॅग लावणारी मंडळी हजर होतात. पण वस्तुस्थिती ही नाहीये.
मुली आपल्या इच्छाबाबत, मतांबाबत कायम व्यक्त होत राहिल्या आहेत. आज या #मिमर_पोरी च्या निमित्ताने मुलींची बाजू मुलांना प्रकर्षाने दिसू लागलीय. त्यात विशेष काही नाही.
पण मुलींनी ज्या प्रकारे आपल्या राजकीय, सामाजिक, लैंगिक सडेतोड विचारांना विनोदाची फोडणी देत व्यक्त केलंय ते पाहून दिवसभर मज्जा आली. या फोडणीचा ठसका बऱ्याच जणांना लागला असेल तर त्यात आनंदच आहे.
2. ओजस्वी
जग हे judgemental आहे, त्यात बाई चा जन्म म्हणजे जेमतेम जगणं. आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा निडरपणे खुलून बोलणं स्त्रीसाठी कठीणय. मराठी मीम मॉंक्स या ग्रुप/पेज ने जे आज #मिमर_पोरी चा ट्रेंड चालवला, त्या मुळे मी व माझ्यासारख्या इतर अनेक मुलींना मन भरून मीम बनवायचा चान्स मिळाला, मग ते वेज असो वा नॉन वेज.
बरेच संवेदनशील मुद्दे मीम्स च्या माध्यमातून प्रकाशात आलेले बघून चांगलं वाटलं. मुलींच्या भन्नाट विचारांना मोकळं व्हायला प्लॅटफॉर्म दिल्या बद्दल खूप आभार.
3. सबुरी
मी जेव्हा फेसबुकवर येते तेव्हा meme पाहून माझा वेळ हसण्यात निघून जातो. कुठेतरी अनेक गोष्टींवर sarcastic पद्धतीने अशी टिप्पणी असते की ते अधिक आवडतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नेहमी मनात राहतात. अडकून, गोंधळून, कोणाशी बोलावं कळत नसल्याने किंवा बऱ्याचदा बोलायला कारण नसल्याने. पण हसायला कारण लागत नाही.
म्हणूनच meme बनवायला कारण लागत नाही. ही आजची भाषा आहे, ज्याला शब्दांची गरज नाही फक्त एखादी गोष्ट तिचे पैलू त्यातले विरोधाभास समजून घेण्याची गरज असते. विशेष म्हणजे meme मुळे स्वतः लाच पाहिले हसू येतं. मला हसू येतं, व्यक्त होता येतं, म्हणून मी हे बनवते.
4. सिद्धी बोबडे
फेसबुकवर असलेल्या मराठी मीम्स मॅक्स पेजने मुलींसाठी आजचा दिवस खास ठेवला होता.
मिमर_पोरी हॅशटॅग वापरून मुली मीम्स शेअर करत होत्या. त्यात फ्लर्ट, क्रश, क्रिकेट match, लग्नपासून ते महिलांची मासिक पाळी, त्याचा ऑर्गसम, सेक्स education पासून ते घर कॉलेज समाज राजकारण सिनेमा सर्वच विषयावर मुलींनी तुफान मीम्स केले.त्याच्या मीम्स मधून मुली बिनधास्त व्यक्त होत होत्या.
5. नेहा राणे
सोशल मीडिया खूप डेमोक्रॅटिक माध्यम मानल जात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत, अगदी काही देशातल्या,सत्ता उलथवण्यात, निवडणुकीत ह्या माध्यमांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, यापुढेही राहिल. भारतात मात्र कोणतीही स्त्री व्यक्त होताना troll होणार हे साधारण ग्रुहीतच धरते. मग त्यातही वेगवेगळे प्रकार येतात ते पार sexual harassment पर्यंत जातात.
भारतात गढूळ झालेल राजकीय वातावरण आणि तितक्याच पटीत वाढलेली toxic masculinity ह्यामुळे स्त्रिया व्यक्त होताना स्वतःवर बंधन घालू लागल्या. महाराष्ट्रात बदलेल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद यावर उमटले पण काही ठराविक प्रमाणात.
आज बर्याच जणींनी खर्या अर्थाने ग्रुपच्या limited reach मध्ये का होईना boundaries push केल्या हे बघून आनंद झाला. मीमर पोरींनो रोज अशाच दर्जेदार मीम्स बनवा.
6. दीक्षा दिंडे
तर आजचा दिवस होता मराठी मीम मोंक्स ग्रुपमध्ये राडा केलेल्या #मिमर्स_पोरींचा. अत्यंत कमी शब्दात आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे मिम्स. तसंच आज काहीसं घडलं.
कित्येकांच्या मनातील खदखद, चारचौघात- स्वतःच्या वॉलवर न बोलले गेलेले विषय, taboo समजल्या जाणाऱ्या गोष्टी आज मुली मोकळेपणाने मांडत होत्या, बोलत होत्या. हे सगळं झालंय ते एका स्पर्धेच्या मार्फत त्यांना मोकळीक म्हणून मिळालेल्या safe space मुळे.
सोशल मीडिया जिथं वैचारिक आव आणून लिहणारे पण पोरीच्या इनबॉक्सात कसं लाळ गाळतात, किंवा तीन नुसतं सेक्स एवढंच लिहलं की त्याच्या चारित्र्यचे आराखडे बांधतात, अशा वातावरणात फक्त मोजक्या काही पोरींनी एकत्र येऊन त्यांच्या वातावरणात निषिद्ध मानलेल्या विषयांवर दिलखुलास हसवणारे मिम्स सादर करणे हे कमालीचं आहे.
मुलींकडून काय पांचट-तुपकट मिम्स येतील या अविर्भावात असलेले सगळे जेव्हा Sex, orgasm, सामाजिक परिवर्तन, जातीव्यवस्था इ वर मिम्स पाहतात, तेव्हा त्यांनाही या पोरींनी केलेला कहर तोंडात बोटं घालून पाहत बसावं वाटतं.
स्त्रीची लैंगिकता ही आपल्याला वगळून झिरो आहे किंवा तिची प्रजननक्षमता आमच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ह्या गृहितकावरंच सगळा पुरुषी माज आहे. तिच्या शिराराची मालकी, शुद्धता, व्हर्जनिटी, पवित्रता/ अपवित्रता तिथून येते. हे नीतिमत्तेचे बुरखे आपण सगळेच नकळत पांघरून असतो त्यामुळे हे खूप खोलवर रुजलेलं आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही.
अशा वेळी एखादी स्त्री, पुरूषसत्ताक वर्चस्वाला आव्हान देत ह्या शुद्धतेला फाट्यावर मारत ‘माझं शरीर’ म्हणून पिरियडस्, ऑर्गझम, सेक्स, लैंगिकता ह्या विषयावर बिनधास्त बोलायला लागते तेव्हा खऱ्या अर्थानं पुरूषसत्तेला धोका निर्मण होत असतो.. कारण इथं स्त्री त्याच्या *मालकत्वाच्या मेल इगोला* समोरासमोर कोलत असते..
मुलींसाठी स्पर्धा एक दिवसाची जरी असली, त्यांचा वावर ग्रुप मध्ये रोज असतोय, बहुदा आजच्या प्रकरणामुळे तो वाढेलही. कित्येक दिवस वेसणाने बांधलेल्या असलेला वर्ग आज स्वतःहून स्वतःला मोकळं करू पाहतोय. आपल्या प्रत्येकामध्ये कुठे न कुठे ही पुरुषसत्ताक संस्कृतीची मुळे रुतून बसलेली आहेत,
परंतु अशा स्पर्धा, असं समोर येऊन, महिला वर्गाने बोलणं म्हणजे हा मुळांना, या संस्कृतीला आणि तिच्या रक्षकांना दिलेलं एक आवाहनचं आहे. एक स्त्रीच स्वतःला मुक्त करू शकणारे, कारण तिच्याच जीवावर/ संस्कारांनी पुढची पिढी उभी राहणारे..
लिंक्स
ग्रुप: https://www.facebook.com/groups/1138862413159110/
तर हे होते कालच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या काही पोरींचे अभिप्राय. आज या स्पर्धेचा निकाल मराठी मीम मॉंक्स टीम जाहीर करणार आहे. तोवर तुमच्यासाठी विनर कोण हे कमेंट्समध्ये सांगा!
- आशिष शिंदे